लैंगिक अत्याचार आणि जमीन बळकावल्याचा आरोप असलेला संदेशखाली येथील तृणमूल काँग्रेसचा फरार नेता शेख शाहजहानला ५५ दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली. बंगाल पोलिसांनी आज पहाटे पश्चिम बंगालमधील २४ उत्तर परगणा जिल्ह्यातील मिनाखा येथून त्याला अटक करण्यात आली. आता त्याला बशीरहाट न्यायालयात नेण्यात आले. कोलकाता उच्च न्यायालयाने तृणमूल नेत्याला त्वरित पकडण्याचा आदेश पोलिसांना दिल्यानंतर तीन दिवसांनी ही अटक झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

५५ दिवसांच्या शोधानंतर अखेर अटक

५५ दिवसांनंतर बंगाल पोलिसांनी २४ उत्तर परगणा जिल्ह्यातील मिनाखा येथील घरात लपून बसलेल्या शेख शाहजहानला शोधून अटक केली. ५ जानेवारीला ईडी अधिकाऱ्यांचे पथक संदेशखाली भागातील त्यांच्या निवासस्थानी होते तेव्हापासून ते फरार होते. अनेक दिवसांपासून पथकाची नेत्याच्या हालचालींवर नजर होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्याला मध्यरात्री अटक करण्यात आली होती. काहींच्या मते तृणमूल नेत्याला पहाटे ३ वाजता अटक करण्यात आली होती. मिनाखाचे उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ) अमिनुल इस्लाम खान यांच्या म्हणण्यानुसार, शाहजहानला अटक करण्यात आली असून तृणमूल नेत्याला बसीरहाट येथे नेण्यात आले आहे, असे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणाले. २६ फेब्रुवारीला कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, “त्यांना अटक न करण्याचे कोणतेही कारण नाही.” सार्वजनिक सूचना जारी करण्यासही न्यायालयाने अधिकाऱ्यांना सांगितले, असे शेख शाहजहानविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू झाल्याची माहिती देणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये सांगण्यात आले.

काही महिलांच्या गंभीर आरोपानंतर संदेशखाली येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

अटकेवर तृणमूल आणि भाजपा नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप

शाहजहानला अटक झाल्यानंतर काही वेळातच तृणमूल काँग्रेसने राज्य पोलिसांच्या कारवाईची प्रशंसा केली. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला सांगितले की, “कायदेशीर अडचणींमुळे त्यांना सुरुवातीला अटक करता आली नाही. मात्र, त्यांना अटक करण्याच्या न्यायालयाच्या आदेशानंतर पश्चिम बंगाल पोलिसांनी आपले काम केले.” तृणमूल काँग्रेसचे शंतनु सेन म्हणाले, “आम्ही पार्थ चॅटर्जी आणि ज्योतिप्रिया मल्लिक यांच्यावर कारवाई केली होती. त्याचप्रमाणे शिबू हाजरा आणि उत्तम सरदार यांच्यावरही कारवाई केली होती आणि आता शेख शाहजहानला अटक करण्यात आली आहे. एका बाजूला आरोपी नेते भाजपाशासित राज्यांमध्ये खुलेआम फिरतात आणि दुसरीकडे आमचे प्रशासन तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांविरुद्ध पुरावे असल्यास त्यांना सोडत नाही. भाजपाने तृणमूल काँग्रेसकडून शिकायला हवे, असे सेन म्हणाले.

परंतु, भाजपाने ही अटक ठरवून केली असल्याचा दावा केला आहे. पश्चिम बंगाल भाजपाच्या अध्यक्षा सुकांता मजुमदार यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला सांगितले की, “भाजपाच्या सततच्या आंदोलनामुळे या सरकारला शेख शाहजहानला अटक करणे भाग पडले.” भाजपाचे प्रदेश प्रवक्ते समिक भट्टाचार्य म्हणाले, “तृणमूल काँग्रेस आणि राज्यातील पोलिस दोषींना संरक्षण देण्याचा प्रयत्न करत होते. ही अटक ठरवून करण्यात आली आहे,” असे भट्टाचार्य म्हणाले.

या अटकेपूर्वी भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी दावा केला होता की, शाहजहान शेख याला राज्य पोलिसांनी मंगळवारपासून सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे. शाहजहान शेख यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबरोबर करार केला होता आणि त्यांना पोलिस पंचतारांकित सोयी-सुविधा देत असल्याचा आरोपही अधिकारी यांनी केला होता.

संदेशखालीत शहाजहानची दहशत

कोलकातापासून १०० किलोमीटर अंतरावर सुंदरबन किनार्‍यावर संदेशखाली हा परिसर आहे. अनेक दिवसांपासून संदेशखाली परिसरातील वातावरण तापले आहे. संदेशखालीतील महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शाहजहान यांच्यावर जमीन बळकावण्याचा तसेच लैंगिक शोषणाचा आरोप करत आहेत. त्यांना ‘बेताज बादशाह’ असे टोपणनाव मिळाले. त्यांच्यावर यापूर्वी २०१९ मध्ये तीन भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येसह अनेक गुन्हे दाखल आहेत.

तृणमूल नेत्यांविरोधात महिला रस्त्यावर उतरल्या. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

संदेशखाली परिसरातील महिलांनी आरोप केला होता की, तृणमूल काँग्रेसचे पुरुष त्यांना रात्री उशिरा बैठकीच्या नावाखाली रिसॉर्ट्स, पक्ष कार्यालये किंवा शाळेच्या इमारतींमध्ये बोलावतात. एका महिलेने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला तिच्याबरोबर घडलेल्या दूरव्यवहाराबद्दल सांगितले, “मीटिंगच्या नावाखाली रात्री १० वाजता बोलावणे याला काय म्हणायचे? ते त्यांना हवे तेव्हा आम्हाला स्पर्श करतात, साडी ओढतात. मी बऱ्याच वेळा यातून गेले आहे आणि मी एकटी नाही.”

महिलांनी केलेल्या या आरोपांनंतर राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस यांनी १२ फेब्रुवारीला संदेशखालीला भेट दिली. त्यांनी संदेशखालीतील परिस्थिती धक्कादायक असल्याचे सांगितले आणि जाहीर केले की, “पीडित महिलांसाठी राजभवनाचे दरवाजे खुले आहेत. त्यांना शक्य असल्यास त्या राजभवनात येऊन राहू शकतात.” यासह त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला अहवाल सादर केला आणि न्यायालयीन चौकशीची मागणी केली.

हेही वाचा : श्रीकृष्णाची द्वारका खरेच पाण्याखाली आहे का? दंतकथा आणि पुरावे काय सांगतात? वाचा सविस्तर…

इतरांनीही संदेशखालीला भेट दिली आणि या भागात कायदा व सुव्यवस्था नसल्याचा आरोप केला. परंतु, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हे दावे फेटाळून लावले आणि भाजपाने संदेशखालीमध्ये हिंसाचार भडकावण्यासाठी लोकांना आणल्याचा आणि आदिवासी (एसटी) विरुद्ध अल्पसंख्याक (मुस्लीम) असा संघर्ष दाखवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How police arrest sheikh shahajahan after 55 days of search rac