कोल्हापूर : राज्यात शक्तीपीठ या विषयांमध्ये आम्ही भूसंपादन करणार नाही हे सरकारने ठरवले आहे. त्यामुळे हा विषय संपला आहे. काही लोक आंदोलन चालू ठेवायची असं मत मांडत आहेत. मात्र याला काही अर्थ नाही, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.

कोल्हापूर असेल किंवा राज्यात कुठेही महायुतीतल्या कोणत्याही पक्षाने कमी काम केले नाही असा ठपका ठेवलेला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ठपका ठेवलेला नाही. संघाचे करोडो स्वयंसेवक आहेत, त्यातील एकाने मत मांडलं म्हणजे ते संघाचे मत नाही, असे स्पष्टीकरण पाटील यांनी केले.

हेही वाचा : कोल्हापुरात तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा

पवारांनी काय केले ?

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी दिलेले आरक्षण सरकार गेल्यानंतर न्यायालयात टिकले नाही, यावेळी आपण अभ्यास करून दहा टक्के आरक्षण दिले असून गेल्या वेळी ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारण्यात आल्या आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राजकारणातील ५०वर्षे पूर्ण झाली आहेत. ते राजकारणाच्या केन्द्र बिंदूमध्ये होते. मग त्यांनी मराठा आरक्षण संदर्भात निर्णय का घेतला नाही, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.

राजकारण्यांना भस्म व्हाल!

राजकिय स्वार्थापोटी समाजाचे तुकडे तुकडे पाडले जात आहेत. राजकारण्यांनो आगीत तेल टाकण्याचे काम करू नका, तुम्ही देखील यात भस्म व्हाल, असा इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा : कोल्हापूर: तिलारी घाट ३१ ऑक्टोबर अखेर अवजड वाहतुकीसाठी बंद

खुट मारल्यामुळे…

आरक्षणासाठी आपण सगळे भांडू, चर्चा करू पण कोणीही आत्महत्या करू नका. जातपडताळणीमध्ये पैसे खाऊन जातीच प्रमाणपत्र दिले जाते. रक्ताच्या नात्यातली कोणालाही जात पडताळणी करण्याची गरज नाही. पण यामध्ये काही खुट मारून ठेवली आहे. वडिलांच्या मुलग्याला तातडीने प्रमाणपत्र दिले पाहिजे, मात्र ३ आठवड्याची नोटीस लावली जाते ती कशासाठी, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : विश्रांतीनंतर कोल्हापुरात पावसाचे आगमन; दमदार पावसाची प्रतीक्षा

मोदींनी पिकाला बरा भाव दिला

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय म्हणावं आणि त्यांनी काय निर्णय घ्यावा हा माझा विषय नाही. त्यांना वाटलं असेल की पुन्हा एनडीएमध्ये जाऊ नये . पण राजकारणामध्ये आज आपण जे बोलू तेच उद्या करू याची गॅरंटी नसते. दिशाभूल करून खोटे नरेटिव्ह सेट करून मत मिळवण्याचा प्रयत्न झाला पण हे फार काळ चालत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या मालाला बरा भाव मिळवून दिला त्यांचे आभार मानत असल्याचे पाटील यांनी सांगितले. २०२० साली पदवीधर निवडणूक झाली. त्यामध्ये साडेसात हजार पदवीधर नसलेले मतदार सापडले होते. या संदर्भात सुप्रीम कोर्टात निर्णय चालू आहे. आमच्या बाजूने निर्णय येऊ शकतो, असा दावा पाटील यांनी केला.