कोल्हापूर : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यात शिवसेनेचा झंझावात होणार आहे. पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्र्यांच्या रूपाने आम्ही पाहू इच्छित आहे, असे मत माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. राज्यात पुन्हा एकदा शिवसेनेचे सरकार येईल. महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत, अशी आमची इच्छा आहे, असेही खोतकर म्हणाले. उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, कोल्हापुरात शिवसेनेचे महाअधिवेशन आजपासून प्रारंभ होत आहे. या अधिवेशनात अनेक राजकीय आणि निवडणुकांसंदर्भातील विषयांवर चर्चा होणार आहे. सर्व निवडणुकींबद्दल तसेच निवडणुकीचे व्यवस्थापन कार्यकर्ते आणि पुढाऱ्यांनी कसे करावे याबाबत सर्वात महत्त्वाची चर्चा होणार आहे.

सामंत पुढे म्हणाले, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी या सर्व गोष्टींवर समजूतदारपणे विचार करणे गरजेचे आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचे सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्या संदर्भातला राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द झालेला आहे. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे हे सकारात्मक पाऊल आहे, असे ते म्हणाले. वैभव नाईक यांनी रवींद्र चव्हाण यांची भेट का घेतली हे मला माहिती नाही. नक्की त्यांच्या मनात काय चाललंय हे ओळखणारं डिटेक्ट मशीन अजून काही तयार झालेले नाही. परंतु अनेकांच्या मनात अजून चलबिचल सुरू आहे. अनेक जण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांच्या संपर्कात आहेत, असे ते म्हणाले. माधव भंडारी यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. ही भाजप अंतर्गत नाराजी आहे. त्यामुळे माझ्यापेक्षा भाजपनेतेच याबद्दल समर्पक उत्तर देऊ शकतील, असे स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिले आहे.

हेही वाचा : कोल्हापुरात शिवसेनेच पहिले महाअधिवेशन उद्यापासून; जय्यत तयारी

यावेळी माजी मंत्री विजय शिवतारे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी २०१९ ला काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाताना कोणालाही विश्वासात घेतले नाही, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यासारखे निर्णय घेतले. जर त्यावेळी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत आमदार खासदार, नेते उपनेते उपस्थित असते तर त्यावेळी जोरदार विरोध झाला असता आणि हे सरकारच अस्तित्वात आले नसते कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणत काँग्रेस सोबत जावं लागलं तर पक्षाचं दुकान मी बंद करेन पण काँग्रेस सोबत जाणार नाही. काँग्रेसची पंचसूत्री गाढा असं म्हणणाऱ्या शिवसेना प्रमुखांच्या विचारांची पायमल्ली उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांनी काँगेसशी जुळवून घेतलं आणि हिंदुत्वाच्या विचारांच्या पक्षांना सोबत येण्यासाठी स्वतः त्यांनी दरवाजे बंद केल्याचं शिवतारे म्हणाले.