कोल्हापूर : राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी रविवारी शेकडो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करत शाहू महाराज यांना पाठिंबा दर्शवला. देशातील वाढत चाललेली हुकूमशाही रोखण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देत असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या नेत्यांवर नाराज असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी आज राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातील तीन हजार कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करून शाहू महाराज यांना पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा…“मी महायुतीचाच! मोदींना पंतप्रधान करण्यासाठी लढणार”, बंडखोर आमदार प्रकाश आवाडे यांचा पवित्रा

महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचे सहकारी असणारे ए वाय पाटील हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या जिल्हा नेतृत्वावर नाराज होते. भाजपमधील काही नेत्यांनी देखील ए. वाय. पाटील यांना महायुतीच्या प्रचारासाठी सक्रिय होण्याची विनंती देखील केली होती. मात्र आज त्यांनी आपली नवी राजकीय भूमिका स्पष्ट नवीन राजवाड्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार यांच्या उपस्थितीत जाहीर केली.

यावेळी बोलताना ए वाय पाटील यांनी देशातील संविधान बदलते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संविधान वाचवण्याबरोबरच सुरू असलेली हुकूमशाही रोखण्यासाठी शाहू महाराजांना पाठिंबा दिला असल्याचं सांगितलं. राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातून शाहू महाराजांना मोठं मताधिक्य देऊन निवडून आणू अशी ग्वाही देखील पाटील यांनी दिली.

हेही वाचा…महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन

मताधिक्याची खात्री

आमदार सतेज पाटील यांनी विकासाची सुरुवात खऱ्या अर्थाने ज्या राधानगरी तालुक्यातून झाली तिथूनच आता आम्हाला ए वाय पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा पाठबळ मिळत असल्याने विजयाचं मताधिक्य आम्हाला मिळेल असं सांगत ए वाय पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचे आभार मानले.

हेही वाचा…मुख्यमंत्री शिंदे आज पुन्हा कोल्हापुरात; मंडलिक, माने यांचा अर्ज भरताना प्रकाश आवाडेंची उपस्थिती!

एवाय काँग्रेसच्या वाटेवर

काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराजांनी ए वाय पाटील यांनी त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसह दिलेला पाठिंबा नक्कीच परिवर्तन घडवणारा असेल अशी भावना व्यक्त केली. दरम्यान व्यासपीठावर शाहू महाराजांनी ए वाय पाटील यांची गळाभेट घेऊन त्यांच्या गळ्यात काँग्रेसचा मफलर घातला . त्यामुळे ए वाय पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची भूमिका स्पष्ट केली नसली तरी अप्रत्यक्षरीत्या प्रवेश केला असल्याची जोरदार चर्चा या ठिकाणी सुरू होती .