कोल्हापूर : देशभरात भाजपचा डंका वाजत आहे. कोल्हापुरातील एक जागा भाजपला मिळण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा केली आहे. त्यांनी आदेश दिल्यास शौमिका महाडिक या हातकणंगले मतदारसंघातून लढण्यास तयार आहेत, असे स्पष्टीकरण खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी केले. 

हेही वाचा >>> संकटकाळात शाहू छत्रपतींनी जिल्ह्याचे पालकत्व निभावले- आमदार ऋतुराज पाटील

पत्रकारांशी संवाद जाताना ते म्हणाले, कोल्हापुरातील दोन्ही मतदारसंघ शिंदे गटाच्या शिवसेनेकडे आहेत. भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांच्या दौऱ्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेची दोन्हीपॆकी एक जागा पक्षाला मिळावी अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली होती. सोलापूर, सातारा, सांगली येथे भाजपच्या उमेदवारांनी अनेकदा विजय मिळवला आहे . हेच वारे कोल्हापुरात असल्याने शौमिका महाडिक यांच्यासाठी आदेश दिला तर निवडणूक लढवण्याची तयारी आहे.  महाविकास आघाडीने जागा वाटपाचा दिलेला फॉर्मुला बहुजन वंचित आघाडीला मान्य असल्याचे दिसत नाही. प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर लढण्याचा नारा देताना काही ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.  त्यापेक्षा त्यांनी महायुतीला पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षाही महाडिक यांनी व्यक्त केली.