कोल्हापूर : ‘कोल्हापूर जिल्ह्यात ज्या -ज्या वेळी संकटे कोसळली, अडीअडचणी निर्माण झाल्या, त्या त्या वेळी शाहू छत्रपतींनी पालकत्व निभावले. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारकार्याचा वारसा खऱ्या अर्थाने जपणारे हे व्यक्तिमत्व आहे. समतेचा, सुधारणावादी विचार आणखी बुलंद करण्यासाठी शाहू छत्रपतींना प्रचंड मताधिक्क्यांनी निवडून दिल्लीला पाठवू या ’ असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील समाविष्ठ गावांत प्रचार दौऱ्यात ते बोलत होते. उचगाव येथील श्री मंगेश्वर देवालय येथे प्रचार मेळावा झाला. याप्रसंगी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती व आमदार पाटील यांनी श्री मंगेश्वर देवालयाचे दर्शन घेतले. या दोघांचा कोल्हापुरी फेटा, घोंगडे देऊन सत्कार करण्यात आला. ‘उचगाव आणि पंचक्रोशीने नेहमीच आमदार सतेज पाटील व मला पाठबळ दिले आहे. हा एकोपा कायम ठेवून लोकसभा निवडणुकीत शाहू छत्रपतींना दुप्पट मताधिक्क्य देऊ. महापूर, कोरोना या आपत्तीच्या काळासह ज्या ज्या वेळी जिल्ह्यात अडचणी उद्भवल्या, त्यावेळी शाहू छत्रपतींनी पालकत्व निभावले. संकटसमयी लोकांना आधार दिला. ’असेही आमदार पाटील यांनी नमूद केले.
हेही वाचा >>> हातकणंगलेतून मराठा समाजाचे नेते वसंतराव मुळीक यांनी निवडणूक लढवावी; प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत मागणी
उमेदवार शाहू छत्रपती म्हणाले, ‘देश सध्या वेगळया वळणावर आहे. राज्यात आणि देशातच अस्थित वातावरण आहे. विकासासाठी स्थिर वातावरण आवश्यक आहे. महाविकास आघाडी हा सर्वोत्तम पर्याय आहे. महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांनी मला उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. लोकांचे सहकार्य आहे. यामुळे निवडणुकीत काही अडचण वाटत नाही.काँग्रेसच्या हात चिन्हावर बटण दाबून विजयी करा’ सरपंच मधुकर चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे राजू यादव यांची भाषणे झाली. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शीला मोरे, शिवानी पाटील, कावजी कदम, किर्ती मसुटे, महेश जाधव, दिनकर पोवार, संदीप पाटील, बाळासाहेब मन्नाडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील-चुयेकर, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. मणेर माळ येथील विकासकामांना चालना देऊ मणेर माळ येथे आयोजित प्रचार मेळाव्यात शाहू छत्रपती व आमदार ऋतुराज पाटील यांनी विकासकामांना चालना देऊ अशी ग्वाही दिली. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमदार ऋतुराज पाटील यांनी या भागाच्या विकासकामासाठी निधी दिला आहे. असे नागरिकांनी सांगितले. १३ गावांच्या पाणी पुरवठयासाठी ३४४ कोटी रुपयांची योजना राबवित असल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी सरपंच चव्हाण, सदस्या वैजयंती यादव, श्रीधर कदम, अजित माने, धनाजी कांबळे, संभाजी यादव, नासिर जमादार आदी उपस्थित होते. हिंदवी मित्र मंडळ येथे मेळावा झाला.