India vs Ireland 1st T20 Playing 11 : भारतीय टी २० संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर गेला आहे. भारत आणि यजमान संघात दोन सामन्यांची टी २० मालिका खेळवली जाणार आहे. यातील पहिला सामना आज डबलिनमधील ‘द व्हिलेज स्टेडियम’वर होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ९ वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघातील काही खेळाडू सध्या इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे बहुतेक नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला संघ आर्यलंडमध्ये दाखल झाला आहे. आयपीएल विजेता कर्णधार हार्दिक पंड्याकडे भारतीय टी २० संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. तर, व्ही व्ही एस लक्ष्मण संघाला मार्गदर्शन करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरचा कसोटी संघात समावेश झाल्याने संजू सॅमसन आणि दीपक हुड्डा या खेळाडूंना आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळण्याची संधी मिळू शकते. मनगटाच्या दुखापतीतून पुनरागमन करणारा सूर्यकुमार यादव तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची शक्यता आहे. ईशान किशनसोबत ऋतुराज गायकवाड किंवा व्यंकटेश अय्यरला सलामीला येण्याची संधी मिळू शकते.

ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत दिनेश कार्तिक, ईशान किशन आणि संजू सॅमसन हे यष्टिरक्षणासाठी पर्याय आहेत. ही जबाबदारी कार्तिकला मिळण्याची जास्त शक्यता आहे. याखेरीज भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि युझवेंद्र चहल हे तीन प्रमुख गोलंदाज असतील. चौथा गोलंदाज म्हणून आवेश खान, अर्शदीप सिंग किंवा उमरान मलिक यांना संधी मिळू शकते.

हेही वाचा – IND vs ENG: कर्णधार रोहित शर्माला झाला करोना; एजबस्टन कसोटीमध्ये कोणाकडे असणार नेतृत्व?

दरम्यान, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत तीन टी-२० सामने झाले असून तिन्हीमध्ये भारताला विजय मिळाला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. ‘द व्हिलेज स्टेडियम’वर साधारणपणे १८० ते १८५ धावसंख्या अपेक्षित आहे. भारताने यापूर्वी येथे खेळलेल्या सामन्यात २००पेक्षा जास्त धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला होता. दरम्यान, आजच्या सामन्यावर हवामानाचा थोडाफार परिणाम होऊ शकतो. हवेमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असेल. तर, दिवसभरात एक किंवा दोनदा पावसाची सरही कोसळू शकते.

संभाव्य भारतीय संघ – ईशान किशन, ऋतुराज गायकवाड/व्यंकटेश अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन/दीपक हुड्डा, हार्दिक पंड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, अवेश खान/अर्शदीप सिंह/उमरान मलिक, युझवेंद्र चहल.

आयर्लंड संभाव्य संघ – पॉल स्टर्लिंग, अँड्रयू बालबर्नी (कर्णधार), गॅरेथ डेलानी, हॅरी टेक्टर, लोर्कन टकर (यष्टिरक्षक), कर्टिस कॅम्फर, अँडी मॅकब्राईन, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅकार्थी, जोशुआ लिटील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs ireland 1st t20 know the possible playing 11 and weather conditions vkk
First published on: 26-06-2022 at 15:58 IST