IND vs NZ 3rd ODI: 3rd match of series canceled due to rain! New Zealand pocketed the series 1-0 | Loksatta

IND vs NZ 3rd ODI: पावसामुळे मालिकेतील तिसरा सामना रद्द! न्यूझीलंडने १-० ने मालिका घातली खिशात

भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला असून यजमान न्यूझीलंडने १-० ने मालिका जिंकली.

IND vs NZ 3rd ODI: पावसामुळे मालिकेतील तिसरा सामना रद्द! न्यूझीलंडने १-० ने मालिका घातली खिशात
सौजन्य- आयसीसी (ट्विटर)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा व अखेरचा एकदिवसीय सामना बुधवारी म्हणजेच आज ख्राईस्टचर्च येथे खेळवला गेला. न्यूझीलंड दौऱ्यातील संपूर्ण सामन्यांवर पावसाचे सावट दिसून आले. दोन्ही संघांपैकी कोण जिंकणार यापेक्षा पाऊस पडणार का यावरच बरीच चर्चा झाली. मालिकेतील तिसरा सामना देखील पावसामुळे वाहून गेला आणि त्यामुळे न्यूझीलंडने १-० अशी मालिका खिशात घातली.

तत्पूर्वी, सामन्याआधीही पावसाने हजेरी लावल्याने नाणेफेकीला थोडा विलंब झाला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी अभेद्य आघाडी घेत न्यूझीलंडने टी२० मालिकेतील उट्टे एकदिवसीय मालिकेत काढले. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन नाणेफेकीच्या बाबतीत पुन्हा नशीबवान ठरला, त्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या घातक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. सर्वबाद २१९ धावा करत भारताने विजयासाठी केवळ २२० धावांचे लक्ष किवी संघासमोर ठेवले होते.

आज भारतीय संघासमोर मालिका वाचवण्याच्या आव्हानासोबतच क्रमावारीत सुधारणा करण्याचे लक्ष्य असणार होते मात्र त्यात संघ सपशेल अपयशी ठरला. आजच्या सामन्यात तरी संजू सॅमसनला  संधी दिली जाईल अशी अपेक्षा होती, परंतु ती अपेक्षा पूर्ण झाली नाही. वॉशिंग्टन सुंदरच्या झुंजार अर्धशतकाने भारत सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचला. त्याने ५१ धावा केल्या.

हेही वाचा :  PAK vs ENG: अबब…! पाकिस्तानमध्ये पोहचताच इंग्लंड संघातील अनेक खेळाडू पडले आजारी; जाणून घ्या कारण 

सलामीवीर कर्णधार शिखर धवन आणि युवा फलंदाज शुबमन गिल यांनी भारतीय डावाची सुरुवात केली. पहिल्या १० षटकात भारताने ४३/१ धावा केल्या. पावसाळी वातावरण असल्याने चेंडू स्विंग होत होता. टिम साऊदीने चांगली गोलंदाजी केली . शुबमन गिलने २२ चेंडूत १३ धावा तर शिखर धवन २८ धावा करून बाद झाला. भारताचा इनफॉर्म फलंदाज श्रेयस अय्यरचे अर्धशतक हुकले त्याने ४९ धावा केल्या. मिस्टर ३६० सूर्यकुमार यादव देखील अवघ्या ५ धावा करून बाद झाला. बाकी कोणालाच मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

हेही वाचा :   FICA: धक्कादायक! पैसा की देश, फिकाच्या रिपोर्टने क्रिकेटविश्वात उडवली खळबळ

न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी ढगाळ हवामानाचा फायदा घेत शानदार गोलंदाजी केली. अॅडम मिल्ने आणि डॅरिल मिशेल या दोघांनी प्रत्येकी ३ गडी बाद करत भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले. तर टिम साऊदी २ गडी बाद त्यांना साथ दिली. मिचेल सँटनर आणि लॉकी फर्ग्युसन यांना एक गडी बाद करण्यात यश आले. भारतीय संघाने ठेवलेल्या २२० धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात शानदार झाली होती. सलामीवीर फिन ऍलन आणि यष्टीरक्षक डेव्हॅान कॉनवे यादोघांनी भारतीय गोलंदाजीवर हल्ला चढवत पॉवर प्लेचा पूर्ण फायदा घेतला.  फिन ॲलनने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. तर डेव्हॅान कॉन्वे ५१ चेंडूत ३८ धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडच्या डावाचे १८वे षटक पूर्ण होताच पावसाचे आगमन झाले आणि खेळ थांबला. प्रतिस्पर्धी संघाची ९७ धावसंख्या असताना भारताकडून उमरान मलिकने एक गडी बाद करत किवी संघाला पहिला झटका दिला. 

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 15:09 IST
Next Story
Video: तू गल्ली क्रिकेट…; ऋषभ पंतने हर्षा भोगलेंना दिलेलं ‘ते’ उत्तर ऐकून नेटकरी भडकले, पाहा ट्वीट्स