Health Special अंशुमानला घेऊन आई बागेत गेली होती. गेल्या गेल्या त्याने झोपाळा पटकावला. झोके घेण्यात तो दंग झाला. काही वेळाने इतर मुले गडबड करू लागली. त्यांनाही झोपाळा हवा होता आणि अंशुमान तर झोपाळा सोडायला तयार नव्हता. कसेबसे आईने त्याला झोपाळ्यावरून उतरवले आणि घरी परत आणले. तो चांगलाच थयथयाट करत होता. घरी आल्यावर त्याची आवडती गाडी हातात मिळाली तेव्हा कुठे शांत झाला. आपल्या मुलाच्या अशा अनेक वेगळ्या, काहीशा विचित्र गोष्टी अंशुमानच्या आईला माहीत होत्या आणि ती त्या सगळ्याचा अर्थ समजून घ्यायला लागली होती. काही महिन्यांपूर्वी डॉक्टरांनी अंशुमानच्या आई-वडीलांना सांगितले होते की, अंशुमानला ‘स्वमग्नतेचा’ म्हणजे autism spectrum disorder असा आजार आहे.

वाढ व प्रगतीची माहिती

डॉक्टरांनी अनेक प्रश्न विचारले होते, माहिती घेतली होती. अगदी, ‘तुमच्या कुटुंबात आणखी कोणाच्या मुलाला किंवा मुलीला असे निदान केले गेले आहे का? गरोदर असताना रुबेलासारखे काही इन्फेक्शन वगैरे झाले होते का? डिलीव्हरीच्या वेळेस किंवा त्या नानंतर लगेच काही दिवसांमध्ये काही आजारपण आले होते का?’ इथपासून अंशुमानची वाढ आणि प्रगती या विषयी तर अनेक प्रकारची माहिती त्यांनी विचारली. अंशुमान एक वर्षाचा झाला तरी इतर बाळे जशी काही अक्षरे काही निरर्थक शब्द बोलत बडबड सुरू करतात तशी करत नव्हता. आणि सव्वा वर्षाचा होऊन गेला तरी शब्द शब्द बोलायला लागला नव्हता हे आईला पक्के माहीत होते.

हेही वाचा : Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?

स्वमग्नता म्हणजे काय?

कोणाच्या कडेवरही तो सहजासहजी जात नसे. घरी कोणी आले, त्याच्याशी गप्पा मारू लागले, तर तो काही प्रतिसाद देत नसे. त्याला त्याच्या ठराविक दोन खेळण्यांशी खेळत बसायलाच आवडे. त्याने अनेक गाड्या (cars) जमावल्या होत्या, तो सतत त्यांच्या चाकांशी खेळात बसे, नाहीतर त्या एका विशिष्ट क्रमाने रांगेत मांडत असे. त्यांना कोणी हात लावलेलाही त्याला चालत नसे. कधी कधी आईला वाटे, हा माझ्याकडेसुद्धा नीट बघत नाही, त्याचे लक्षच नसते, हाका मारल्या तरी ऐकू येत नाहीत. त्याचे खेळणे, इतर मुलांबरोबर वागणे, त्याचे रूटीन या प्रश्नांची उत्तरे देतानाच अंशुमानच्या आई वडीलांना हळू हळू ‘स्वमग्नता’ म्हणजे काय हे लक्षात येऊ लागले. खरेच होते, त्यांचा मुलगा स्वतःच्या विश्वात रमणारा असा होता. इतर मुलांबरोबर खेळणे त्याला जमायचे नाही. इतरांशी संवाद साधणे, मैत्री करणे जमायचे नाही. लहानपणी अनुकरणातून खेळ खेळले जातात, उदा. शाळा शाळा, असे खेळ तो खेळत नसे. एकटाच रमे, स्वतःभोवती गोल गोल रिंगण करी, बसला की पुढे मागे डोलत बसे…

स्वमग्नतेची लक्षणे

शाळेत जाऊ लागला तसे काही प्रश्न आणखी जाणवू लागले. इतर मुलांबरोबर जमवून घेणे, एखादी गोष्ट शेजारच्या मुलाला आवडली नाही, तो रागावला तर त्याचा अर्थ न समजणे, शिक्षकांनाही त्याच्याशी संवाद करणे कठीण जाई. हाताने जी कामे करायची, वस्तू बनवायच्या त्या तो करे, पण भाषेची प्रगती नव्हती. त्यामुळे शाळेतली प्रगती मागे पडू लागली. मात्र एकीकडे त्याला गाड्यांचे विविध प्रकार, त्यांची वैशिष्ट्ये यांची खूपच माहिती! अंशुमान वेळेच्या बाबतीत भलताच पक्का. सकाळी आठ वाजता अंघोळ म्हणजे आठ वाजताच अंघोळ, रात्री आठ वाजता जेवण म्हणजे ते त्याच वेळेस! बरे कपडेही ठराविक प्रकारचे आवडायचे त्याला, केवळ टी शर्ट! छानसा शर्ट, कुर्ता घालू म्हटले तर तो अंगाला स्पर्शही होऊ देत नसे. प्रत्येक गोष्टीत नियम! फटाके, शिट्टी, यंत्रांचे चर्र… असे येणारे आवाज त्याला अजिबात सहन होत नसत आणि मग तो भलताच अस्वस्थ होई. अंशुमानच्या आई-वडीलांनीही डॉक्टरांना आपल्या शंका विचारल्या. आपले कुठे काय चुकले? आपण आपल्या मुलाला प्रेम देण्यात कमी पडतो आहोत का? आपण दोघेही नोकरी-व्यवसाय करणारे म्हणून असे झाले का? काय कारण आहे ‘स्वमग्नतेचे?

हेही वाचा : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कांदा कसा ठरतो फायदेशीर; जाणून घ्या उन्हाळ्यात कांदा खाण्याचे फायदे

दोष देत बसू नका

गर्भ वाढत असताना आणि जन्मल्यावर चेतासंस्थेचा विकास (neurodevelopmental disorder) होताना काही अडथळे निर्माण झाले तर हा आजार होतो. आनुवांशिकता आणि बाळाच्या वातावरणातील वेगवेगळे घटक उदा. काही विषारी रसायने, गर्भावर परिणाम करणारी रसायने, जन्मल्या जन्मल्या आजारपण या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून स्वमग्नता येऊ शकते. परंतु अजूनही या विकारामागचे कारण संपूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. या पैकी कोणतीच गोष्ट पालकांच्या हातात नाही. आपल्या बाळावर अतोनात प्रेम करणाऱ्या आई बाबांनी स्वतःला अजिबात दोष देऊ नये, हा महत्त्वाचा मुद्दा डॉक्टरांनी स्पष्ट केला, तेव्हा अंशुमानच्या आई वडीलांना हायसे वाटले.

निदानानंतर वेळीच उपचार महत्त्वाचे

एकदा निदान झाल्यावर मात्र अंशुमानच्या पालकांनी त्याचे वागणे, बोलणे, शाळेतली प्रगती, लोकांमध्ये वावरणे, इतरांशी नाते निर्माण करणे या संगळ्यासाठी विविध उपाय करण्याचा चंग बांधला. वाचा उपचार(speech therapy) लगेच सुरू केले, हळू हळू अंशुमानचे बोलणे सुधारू लागले. शब्दसंपदाही वाढू लागली. व्यवसायोपचार (occupational therapy) सुरू केले. आठवड्यातून तीनदा व्यवसायोपचारासाठी न्यायचे आणि तिथे शिकवलेले घरीसुद्धा अमलात आणायचे. त्यामुळे, अंशुमानला हळू हळू दुसऱ्याला प्रतिसाद देणे जमू लागले, त्याचे स्वतःभोवती रिंगण घालणे कमी झाले, मोठ्ठा आवाज झाला तर काय करायचे ते तो शिकला. काही तास विशेष शाळेमध्ये तो जाऊ लागला. त्याच्या आवश्यकतेप्रमाणे, प्रगतीप्रमाणे त्याला शिकवले जाऊ लागले.

हेही वाचा : मद्यपान न करताही होतो फॅटी लिव्हर; भूक, लघवीचा रंग व त्वचेसह ‘या’ ८ बदलांमधून शरीर देतं संकेत, उपचार काय?

उपचारांना चांगला प्रतिसाद

आता आई त्याला वाढदिवसाच्या पार्टीला नेऊ लागली. कोणी काही भेट दिली तर तो ‘थॅंक यू’ म्हणू लागला, दुसऱ्या मुलाशी हात मिळवू लागला. कणाकणाने होणारी अंशुमानमधली प्रगती पाहून कधी कधी आईला भरून येई. ती नोकरीहून घरी येईपर्यंत आजी किंवा आजोबा अंशुमानला बागेत घेऊन जात, थेरपिस्टकडे नेत. दिवाळी जवळ आली होती. आईने ठरवले होते, यंदा अंशुमानला हाताशी धरून ग्रीटिंग कार्ड करायची, सगळ्या नातेवाईकांना पाठवायची, पणत्या रंगवायच्या आणि धम्माल करायची!