आवडता आसमंत

अनुभवासोबत शास्त्रीय माहिती छान मिळते आहे.

‘लोकप्रभा’चा अंक हाती घेतला की, लगेचच ‘आसमंतातून’ सदर शोधून काढावंसं वाटतं. रूपाली पारखे देशिंगकर यांचा हा स्तंभ.
फुलांचे हार मी पाहिलेत, पण लेखिका फुलं-पानं, झाडं-झुडपं, पशू-पक्षी, सूर्य-चंद्र-तारे, ऋतू-सण या सगळ्यांना आपल्या अनुभूतीमध्ये ओवतात. त्यातून केवढी भली मोठी माला होते तयार ते त्यांनाही कळत नसेल. त्यांच्याच आसमंतातल्या इंद्रधनूएवढी भव्य नि सुंदर!
‘सुंदर’ या शब्दापेक्षा जास्त काहीच नाही. ज्यांना छान बालपण मिळाले किंवा जे सौंदर्यदृष्टी ठेवून जगले तेच एवढे छोटे छोटे दाणे टिपू शकतात. अनुभवासोबत शास्त्रीय माहिती छान मिळते आहे. तुमची मुलगी भाग्यवान आहे, तेवढेच आम्ही वाचकही! आमचेच भावविश्व सुंदर होत आहे.
– संघर्ष सावरकर, अकोला.

बदक पाळणे फायदेशीर नाही
‘बदक आणि कोंबडी तुलना’ करणारे कानेटकर यांच्या पत्राबद्दल काही अधिक माहिती सांगू इच्छितो. बदकांच्या अंडय़ाला पाण्याचा एक विशिष्ट वास येतो तो अनेक लोकांना आवडत नाही. दुसरे असे की ते थोडं पाणचट लागतं, असं बरेच लोक सांगतात. बदक हे हंस कुळातील असेल व हंस सरस्वतीचे वाहन असल्याचे सांगितले जाते म्हणून अशी आवई कुणी उठवली असेल की, आपण हिंदू आहोत तरी आपण त्यास खाऊ नये, पण तर्कशुद्ध पाहाल तर असल्या गोष्टींचा विचार करू नये.
बंगाल, बिहार, ओडिशामध्ये बदकपालन आहे. त्याची अंडीपण विकायला येतात. बदकं पाळण्यात पाणी हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. महाराष्ट्रात खेडोपाडी छोटी डबकी, तलाव नाहीत. शेतीला पूरक धंदा म्हणून आपल्या शेतात छोटासा तलाव निर्माण करायला किती आटापिटा करावा लागतो ते दिसतेच. म्हणून बदकपालनचा व्यवसाय मागे पडला आहे.
– चंद्रकांत लेले, भोपाळ, म.प्र.

डॉ. पराग देशपांडे यांचे ‘स्वास्थ्यभान’ या सदरातील लेख माहितीपूर्ण असतात. आरोग्यविषयक गोष्टींबद्दल भरपूर ज्ञान मिळते. अशा लेखांसाठी लेखकाचे आभार.
– राधा मोहिते, ई-मेलवरून.
 या वैचारिक प्रदूषणातून लवकर बाहेर पडू या
‘थेट जेएनयूतून’ हे सुयश देसाईचे कथन ‘लोकप्रभा’त (१८ मार्च) वाचले. बहुसंख्य वृत्तपत्रे, मासिके, सोशल साइट्स आणि चोवीस तास बातम्यांचा रतीब घालणारे न्यूज चॅनल्स या घटनेकडे एक सुरस कथा या उद्देशाने पाहात असताना, ‘लोकप्रभा’ने ही कथा ‘सत्यकथा’ म्हणून समोर येण्यासाठी चांगला प्रयत्न या लेखाच्या निमित्ताने केला आहे. त्याचबरोबर लेखकाने कथन केलेल्या माहितीला एक प्रकारचा वास्तववादी स्पर्श असल्याने, जेएनयूतील घटनांवर यामुळे चांगलाच प्रकाश पडला आहे.
खरंतर हा लेख वाचण्यापूर्वी माझ्या मनातदेखील ‘जेएनयू आणि तेथील विद्यार्थी संघटना’, ‘कन्हैयाकुमार’ यांविषयी अनेक प्रश्न मनामध्ये होते. मात्र, या लेखातील माहितीमुळे या देशाला ढवळून टाकणाऱ्या वादाची कारणमीमांसा करता येते. ‘कन्हैयाकुमारचं वक्तृत्व चांगले आहे, पण त्याच्या भूमिकांमध्ये विसंगती आहे’ या लेखकाच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. सध्या ‘जेएनयू’ वादाबद्दल जितके तर्कवितर्क लढवले जात आहेत, जितका धुरळा उडाला आहे याला कारणीभूत केवळ सरकारच नाही, तर सतत ‘स्टोरी’च्या शोधात असलेली प्रसारमाध्यमेही आहेत. सरकारने या प्रकरणात पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवून कारवाई केली हे सत्य आहे. किंबहुना या कारवाईसाठी सरकार कोणत्या तरी निमित्ताच्या शोधात होते की काय? असा संशय घेण्यास जागा आहे. त्याचबरोबर या प्रकरणात सरकार आपल्या अतिउत्साही धोरणांमुळे तोंडावर आपटले हेही तितकेच खरे! सरकारने या वादाला काडी लावली असेल तर त्याला सढळहस्ते इंधन पुरवण्याचं काम प्रसारमाध्यमांनी केले. सुरुवातीला ‘देशप्रेम-देशप्रेम’ खेळणारी माध्यमे ‘आझादी’कडे कधी वळली ते कळलेच नाही. खरं म्हणजे लोकशाहीतला हा चौथा खांब! त्यालाच आता थांब म्हणायची वेळ आली आहे. नायक आणि खलनायक या टोकांमध्येही बरेच काही असू शकते हे इथल्या माध्यमांबरोबरच जनताही विसरू लागली आहे. त्यामुळे आपल्याकडच्या काही गटांना ‘मोदी’ हे नायक वाटतात, तर काहींना खलनायक. या दोन बिरुदांच्या मध्ये मध्यम असे काहीच नाही. काहीसा असाच प्रकार कन्हैयाकुमारच्या बाबतीत घडत आहे. गुजरातमधील आरक्षण आंदोलनाच्या बातम्या देणारी माध्यमे आता त्या मुद्दय़ाकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत. विविध माध्यमे अशा धरसोड स्वरूपाच्या भूमिका घेत असताना ‘लोकप्रभा’च्या या विशेष प्रयत्नांबद्दल अभिनंदन!
राहता राहिले विरोधी पक्ष! थिअरीमध्ये मेरिट मिळवणारा विद्यार्थी प्रॅक्टिकलमध्ये नापास व्हावा अशीच काहीशी गत विरोधी पक्षांची झाली आहे. तत्त्व आणि विचारांच्या पातळीवर उच्च असणारे हे पक्ष आचारांच्या बाबतीत अतिशय खाली घसरले आहेत. त्यामुळे कोणत्याही घटनेच्या वेळेस विवेकवादी भूमिका स्वीकारण्याची अपेक्षा या पक्षांकडून उरलेली नाही. अर्थात जेएनयूत गेल्या काही दिवसांमध्ये जे काही घडले ते आपल्या देशाला भूषणावह नक्कीच नाही. या वैचारिकदृष्टय़ा दूषित वातावरणातून आपण लवकरच बाहेर पडू, हीच सदिच्छा!
– तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण).
अण्णा प्रयोगाचा ‘सिक्वेल’!
‘थेट जेएनयूमधून ..’ हा एका मराठी विद्यार्थ्यांने लिहिलेला आखों देखा हाल (१८ मार्च) वाचून आणि त्याबरोबर छापलेले आंदोलनाचे छायाचित्र पाहून या सगळ्या प्रकारातील लबाडी आणि पोकळपणा ठळकपणे पुढे येतो. छायाचित्रातील कन्हैयासह इतर विद्यार्थी / विद्यार्थिनी यांची देहबोली आणि चेहऱ्यावरचे सुहास्य पाहिले तर त्यांची ते वर्णन करतात तसली जीवघेणी गळचेपी झाली आहे किंवा होते आहे यावर शेंबडे पोरसुद्धा विश्वास ठेवणार नाही. कॉलेजच्या गॅदिरगकरिता एखाद्या नृत्याची / नाटकाची तालीम करताना वातावरणात जसा उत्साह आणि आनंद ओतप्रोत भरलेला असतो किंवा कॅमेरा आपल्यावर रोखला आहे असे समजले की गर्दीतील अनेक हवशागवशांचे चेहरे जसे कुतूहलमिश्रित आनंदाने फुलून येतात तसे सगळे दिसत आहेत. (कँडिड कॅमेरा म्हणतात तो असा!)
लोकसभेच्या निवडणुकीला काही वर्षांचा कालावधी असल्यापासूनच अण्णांच्या आंदोलनाने भ्रष्टाचाराविरोधात हवा तापवायला सुरुवात केली होती. अशा तापलेल्या वातावरणाचा फटका सत्ताधारी पक्षाला हमखास बसतो हे काँग्रेसच्या दारुण पराभवाने सिद्ध झाले. चित्रपटाचा एखादा फॉम्र्युला एकदा यशस्वी झाला की त्याला परत परत उकळ्या आणण्याचा मोह अनेकांना होतो. त्यामध्ये देशविरोधी विखारी वक्तव्ये करणे हा जसा संबंधितांचा बेजबाबदारपणा दर्शवतो तसेच त्याची ढिसाळपणाने केलेली हाताळणी भाजपची अपरिपक्वता अधोरेखित करते. काग्रेससारख्या मुरब्बी पक्षानेही अण्णा हजारे आणि बाबा रामदेवप्रकरणी जी धरसोडवृत्ती दाखवली होती त्याचाही हा सिक्वेलच म्हणावा लागेल!
– प्रसाद दीक्षित, ठाणे.

वस्तुनिष्ठ मांडणी
सुयश देसाई यांनी मांडलेला ‘थेट जेएनयूमधून’ हा लेख अतिशय उत्तम आहे. या वादाची त्यांनी अत्यंत वस्तुनिष्ठ मांडणी केली आहे. यातून एकच गोष्ट सिद्ध झाली. ती म्हणजे, जेएनयूमध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेकी वापर केला गेला आह आणि सरकारनेही विनाकारणच जास्त जोशात येऊन कारवाई केली आहे.
– योगेश भिडे, ठाणे.

 

 शोध – देवाचा!
‘देवांना रिटायर करणे उचित!’ हा प्रकाश बंद्रे यांचा ‘लोकप्रभा’च्या चर्चा सदरातील (२६ फेब्रु.) लेख वाचला. गरीब बिचाऱ्या परमेश्वराला रिटायर करण्याचा फंडा अधूनमधून येत असतो; कोणाला तरी ही हुक्की अधूनमधून येत असते! अशा प्रकारचे लिखाण वाचून कोणी परमेश्वर किंवा देव अशी व्यक्ती रोज लोकल वा बसचा प्रवास करून कार्यालयात जाते, असे दृश्य डोळ्यांसमोर येते आणि मग वर्षांनुवर्षे काम करून थकला असणार, कामाची क्षमता कमी झाली असणार, मग काय? साहेबाकडून मेमो, किंवा स्वेच्छानिवृत्ती; नाही तर मग असा रिटायरमेंटचा फंडा! अशी मग सक्तीची निवृत्ती झाली की, मग तो पुढे काय करेल, वगैरे वगैरे..
देवाला रिटायरमेंटचा हा फंडा आला, की आस्तिक, श्रद्धाळू, भाविक लोक अस्वस्थ होतात, कोठे तरी चिडतात! कारण देव- धर्म- परमेश्वर या शब्दांना असलेले अर्थ निराळेच आहेत, जे त्यांना भावलेले असतात व त्यांचे अनुभवही काही वेगळेच सांगतात! आणि मग असले फंडे निघाले की साहजिकच कोण्याही समंजस माणसाला अस्वस्थ वाटणारच! सुमारे दोन-तीन दशकांपूर्वी असला विचार प्रसिद्ध नाटय़कर्मी व अभिनेते डॉ. लागू यांनी मांडला. त्यातून थोडासा समाजवादी – साम्यवादी सूर डोकावत होता. हा प्रश्न पुन:पुन्हा उकरून काढणाऱ्यांचा एक समान प्रश्न असतो व तो हा की, परमेश्वर जगात आहे, तर मग इतकी विषमता का? इतके अन्याय का? इतके वेगवेगळे धर्म, पंथ, संप्रदाय का? का प्रत्येक धर्माचा परमेश्वर कोणी वेगळा आहे? आणि मग त्यांच्या परंपरांमध्ये इतके वाद, विसंवाद का असतात? इ. इ.
डॉ. लागू लहान असताना त्यांच्या घराजवळील राम मंदिरातील अनुभवामुळे, परमेश्वर असण्यावरचा त्यांचा विश्वास उडाला. त्यांनी ‘परमेश्वर या कल्पनेलाच रिटायर करा’ असे विचार मांडायला सुरुवात केली.
या पाश्र्वभूमीवर जागतिक स्तरावर काय घडले त्याचा मागोवा घेणे उचित ठरेल. रशियातील साम्यवादाचा विळखा थोडा सैल झाल्यानंतर तेथील अनेक जणांकडून चर्चेसची दारे पुन्हा उघडून देण्याची मागणी झाल्याचे वाचनात आले होते. ‘मे गॉड सेव्ह द किंग’ अशी प्रार्थना ब्रिटनच्या नोटांवर – गीतातही आढळते. अमेरिकेतील पहिला अंतराळवीर परतल्यानंतर चर्चमध्ये जाऊन आला होता. ज्या पाश्चात्त्य देशात विज्ञान-तंत्रविज्ञान इतके प्रगत आहे तेथील हे किस्से आहेत. मात्र मध्ययुगीन काळात तेथील धर्मसत्तेने मांडलेल्या अवास्तव कल्पनांचा उबग येऊन व विज्ञानाने नवनवीन कल्पना मांडायला सुरुवात केल्याने तेथील जनतेवर असलेला या अवास्तव कल्पनांचा पगडा बऱ्याच प्रमाणात कमी झाला. त्याचा काहीसा अनिष्ट परिणामही झाला व तो म्हणजे अर्निबध स्वातंत्र्य व स्वैरता बोकाळली!
विज्ञान व तंत्रविज्ञान हा एक शोधाचा प्रवास आहे; तो अजूनही पूर्णविराम नाही. हे जगातील मोठे वैज्ञानिक सांगत असतानाच या विश्वाची कोणी तरी नियामक शक्ती आहे, हेही मान्य करतात; त्यालाच आपण परमेश्वर म्हणतो; परंतु येथील काही जणांना या नियामक शक्तीलाच म्हणजे सर्व चराचरामागे असणाऱ्या चैतन्याला रिटायर करण्याची घाई झालेली असते!
‘ईश्वर एक तत्त्व आहे, एक शक्ती आहे; कोणी मूर्ती नाही वा गंडा-ताईत नाही. सूर्य-अग्नी त्याच्या तेजाचे साधारणसे नमुने आहेत; त्या सर्वव्यापी चैतन्यशक्तीची पूजा कोण व कशी करू शकेल?
– श्यामसुंदर दि. गंधे, पुणे.

डोळ्यात अंजन घालणारा लेख
२६ फेब्रुवारीच्या अंकातील ‘देवांना रिटायर करणे उचित’ हा प्रकाश बंद्रे यांनी लिहिलेला लेख डोळ्यात अंजन घालणारा आहे. मला व्यक्तिश: प्रथमपासून देव ही माणसानेच निर्माण केलेली संकल्पना वाटत आलेली आहे. धर्म ही एक जीवनपद्धती आहे जिच्या मार्गाने वागल्यास मनुष्यप्राणी हा चांगला माणूस बनू शकतो. म्हणजेच धर्म हे माणसासाठी बनविले आहेत ज्यात एकच समान सूत्र आहे. ते म्हणजे माणुसकी. परंतु इथे मनुष्यत्वापेक्षा धर्म आणि धार्मिक कर्मकांडाला महत्व आले आहे. या विषयावर लेख प्रसिद्ध केल्याबद्दल ‘लोकप्रभा’चे आभार.
– सोनाली तळेकर, ई-मेलवरून.
अमराठी शब्दखेळ
कुसुमाग्रजांच्या वाढदिवशी मराठी राजभाषा दिन साजरा झाला. त्याच्या आगेमागे सर्वच वर्तमानपत्रे, मासिकांनी ‘मराठीप्रेम’ आळविणारे लेखन प्रसिद्ध केले. सरकारी पातळीवर त्यापूर्वी वाचन संस्कृती दिन साजरा करण्यात आला. मायबोलीची दयनीय अवस्था व्यक्त करणारा नंदिनी महाजन यांचा ‘मायबोली’ हा लेख (लोकप्रभा ११ मार्च १६) वाचला. साधारणपणे भोवतालची परिस्थिती, तंत्रज्ञान, इंग्रजीचा प्रभाव आणि नाइलाज, अगतिकता ही कारणे मायबोलीच्या सद्य:स्थितीला कारणीभूत ठरतात असे दिसते. या पाश्र्वभूमीवर ‘लोकप्रभा’त प्रसिद्ध होणारे शब्दकोडे सोडविण्याचा प्रयत्न करताना, या कोडय़ाच्या रचनाकर्त्यांला अगतिक करणारी, नाइलाज व्हावा अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली असावी ? एवढय़ाशा शब्दखेळात त्यांना ८० बिगर मराठी शब्दांचा उपयोग का करावा लागला? शब्दकोडे सोडविण्यासाठी मूळ सूचक शब्द/सूचनांसाठीच इंग्रजी शब्द? बघा आडवे शब्द- क्र. १५-नशीब, लक, क्र १९ – पायनापल, क्र. २३- कलर. उभे शब्द- क्र. २१- कॉम्प्युटर. मार्गदर्शक शब्दच इंग्रजीत. उत्तरात येणारे शब्दही असेच. शब्दांच्या चमत्कृतीचा हा खेळ भाषेशी खेळायला लागला की वाईट वाटते.
– अनिल आोढेकर, नाशिक.
 लग्न विशेषांक आवडला
१२ फेब्रुवारीचा लग्न विशेषांक अतिशय सुंदर आहे. ‘लग्न आणि पर्यटनही’ हा सुहास जोशी यांचा लेख अप्रतिम. कलाकाराचे फोटो व त्यांच्या लग्नाच्या आठवणी लाजवाब आहेत. ‘संगीत सोहळ्यांचे बदलते वारे’ हा निहारीका पोळ यांचा व ‘आली लग्न घटिका समीप’ हा चैताली जोशी यांच्या लेखात माहिती छान आहे, पण छायाचित्रांचे वर्णन करणाऱ्या फोटोओळी हव्या होत्या. सव्वाई आणि ‘स्मार्ट कुकिंग’ हे लेख छानच आहेत. कलाकारांच्या आवडत्या रेसिपीज्देखील आपण प्रसिद्ध कराव्यात. गौरी बोरकरांचे पर्यटन हे सदर हे महिन्यातून एकदा तरी प्रसिद्ध करावे. त्या अगदी अचूक लिहितात. त्यांच्या लेखांचा आम्हा ज्येष्ठ नागरिकांना खूप फायदा होतो. कोठे व कसे जावे याचे पॅकेजच मिळते.
– प्रभाकर खरवडे, नागपूर.
१८ मार्चच्या अंकातील ‘थेट जेएनयूमधून..’ या लेखात ‘काश्मिरमध्ये दांतेवाडा इथे जो दहशतवादी हल्ला झाला..’ असे प्रसिद्ध झाले आहे, त्याऐवजी ‘छत्तीसगडमध्ये दांतेवाडा इथे जो दहशतवादी हल्ला झाला..’ असे वाचावे.

– कार्यकारी संपादक

मराठीतील सर्व वाचक प्रतिसाद ( Vachakpatre ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lokprabha vachakpatre readers

Next Story
सत्यकथन आवडलं
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी