Aaditya Thackeray : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. मात्र, अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. १५ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला किती आणि कोणते खाते मिळते? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. यातच कोणत्या मंत्र्यांला कोणतं खातं मिळणार? हे देखील मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर स्पष्ट होईल. दरम्यान, यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. आज पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्ता घोटाळ्याच्या संदर्भातील विषयावर भाष्य केलं. यावरून त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला. तसेच देवेंद्र फडणवीस यांना स्वच्छ सरकार चालवायचं असेल तर एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

दादरमधील हनुमान मंदिर हटवण्याच्या निर्णयाला रेल्वे प्रशासनाकडून स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, “ही स्थगिती घाईने दिलेली आहे. मात्र, यावरून भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व हे नकली असल्याचं दिसून आलं. तसेच भाजपाचं हिंदुत्व हे निवडणुकीपुरतं असतं. निवडणुकीत हिंदुंना पुढे केलं जातं. मात्र, निवडणुका झाल्या की यांच्याच राज्यात हिंदू सुरक्षित नसतात”, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी भाजपावर केला.

हेही वाचा : संविधान ते महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेता व्हाया स्वा. सावरकर; श्रीकांत शिंदे आणि राहुल गांधी यांच्यात संसदेत तुफान खडाजंगी!

मुंबईतील रस्ता घोटाळ्याच्या आरोप करत आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, “गेले दोन वर्ष आम्ही रस्त्याच्या घोटाळ्यासंदर्भात आवाज उठवत आलोत. २०२२, २०२३ आणि २०२४ मध्ये रस्त्याचा ६ हजार कोटींचा घोटाळा लोकांसमोर आणला. त्यानंतर मुंबई महापालिकेला मान्य करावं लागलं आणि ६ हजार कोटीवरून ५ हजार कोटीवर आले. तेव्हा देखील मी सांगत होतो की तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा (एकनाथ शिंदे) त्यामध्ये हात आहे का? तसेच जे दोन पालकमंत्री होते, त्यामध्ये दीपक केसरकर यांनी घोटाळा केला की नाही हे मला माहिती नाही. मात्र, त्यामध्ये अनियमितता नक्की आहे. त्यावरून त्यांची अकार्यक्षमता दिसली. दीपक केसरकर आणि लोढा यांचा यात काही हात आहे का? याचं उत्तर सरकारकडून आलं नव्हतं. मात्र, जेव्हा मी हे घोटाळे लोकांसमोर आणले त्यानंतर आता मुंबईतील भाजपा बोलायला लागलं. मुंबईतील रस्ता घोटाळ्यात एसआयटी चौकशी लावा असं आता भाजपा म्हणत आहे. मग हेच मी दोन वर्षांपासून सांगत होतो की खोके सरकारच्या या घोटाळ्याची चौकशी करा”, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.

‘शिंदे, केसरकर आणि लोढांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा’

“यासंदर्भात भारतीय जनता पक्षाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता संधी आहे की जर त्यांना स्वच्छ सरकार चालवायचं असेल तर एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांना रस्ता घोटाळ्याची एसआयटी चौकशी होईपर्यंत मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा. जोपर्यंत त्यांचा त्यात हात नाही हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवा. मग आम्ही समजू की हे सरकार वॉशिंगमशीनचं सरकार नाही”, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaditya thackeray on devendra fadnavis eknath shinde deepak kesarkar mangal prabhat lodha maharashtra cabinet expansion gkt