शिवप्रताप दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही मंत्री प्रतापगडावर पोहचले आहेत. या ठिकाणी विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आलेले आहेत. दरम्यान, या ठिकाणी भाषण करताना भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या एका विधानाने आता आणखी एक नवा वाद उफाळण्याचे चिन्हं दिसत आहेत. राज्यपाल कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते त्रिवेदींनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आता मंगलप्रभात लोढांचं वक्तव्य समोर आलं आहे. यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना(ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रिया देताना शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “दु:ख हेच आहे की एका माणसाच्या राक्षसी महत्त्वकांक्षेसाठी महाराष्ट्र मागे पडतोय”; मुख्यमंत्री शिंदेंवर आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र!

या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “ज्यांना महाराष्ट्र गद्दार म्हणून ओळखतो, ज्यांना महाराष्ट्र खोके सरकार म्हणून ओळखतो त्यांच्यासोबत महाराजांची तुलना करणं, हा काही चुकून आलेला शब्द नाही. हे पूर्णपणे नियोजित आहे. हे या सरकारचं आणि पक्षाचं नियोजन दिसतंय की, महाराष्ट्राचं खच्चीकरण करावं.”

हेही वाचा – “आमच्या सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही, पण…”; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान!

याचबरोबर “राज्यपाल जे बोलतात तेच हे मंत्री आज बोलले आहेत. ही सगळी वस्तूस्थिती लोकांसमोर आलेली आहे. म्हणजे तुम्ही महाराजांची तुलना अशी करता का? हा महाराजांचा अपमान आहे, महाराष्ट्राचा अपमान आहे. हे मंत्री मुंबईची reality ओळखणारे नाहीत, तर मुंबईची realty ओळखणारे आहेत. आवाज नक्की कोणाचा आहे हे नक्की ओळखून घ्या. पक्षाचा एक कलमी कार्यक्रम झालेला आहे”, असंही आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

हेही वाचा – “अशा मुख्यमंत्र्यांना गडावर जाऊन…”; संजय राऊतांचं विधान!

याशिवाय, “विरोध करण्याची वेळ तरी का यावी. खरंतर याच खोके सरकारने त्यांना परत पाठवलं पाहिजे होतं, पदमुक्त केलं पाहिजे होतं. अजुन कुठेही तशी प्रतिक्रिया एका सुद्धा मंत्र्याकडून आलेली नाही. उलट ते वक्तव्य झाकावं म्हणून वेगवेगळी वक्तव्य यावर होत आहेत. कदाचित कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचं वक्तव्य यांना वाचवण्यासाठीच असेल. दुसरी बाजू अशीदेखील असू शकते की जसं निवडणुकीच्या अगोदर गुजरातला उद्योग पळवले, तसं आमच्या महाराष्ट्रातून कर्नाटकाला गावं पळवतील. कारण आता निवडणूक तिकडची पण आलेली आहे. पण हे सगळं आपण जे बघतोय हे महाराष्ट्राचं खच्चीकरण व्हावं, आर्थिक अलगीकरण व्हावं, या दृष्टीकोनातून सगळं सुरू आहे. ” असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकार आणि भाजपावर टीका केली.

मंगलप्रभात लोढा नेमकं काय म्हणाले? –

सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर आज शिवप्रतापदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या कार्यक्रमात भाषण करताना लोढा यांनी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत केलेल्या बंडाची थेट शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना केली. “शिवराय आग्र्यातून बाहेर पडले, तसेच शिंदे बाहेर पडले. औरंगजेबाने शिवरायांना रोखलं तसंच शिंदेंनाही कुणीतरी रोखलं होतं. शिवराय स्वराज्यासाठी बाहेर पडले, तर शिंदे महाराष्ट्रासाठी”, असं विधान लोढा यांनी केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackerays reaction to londhas statement comparing eknath shindes rebellion with shivaji maharajs escape from agra msr
First published on: 30-11-2022 at 14:35 IST