सोमवार २६ फेब्रुवारीपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला. या कार्यक्रमानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर सरकारकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना लक्ष्य करताना त्यांच्या पत्रावर खोचक शब्दांत टिप्पणी केली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीसांनी यावेळी बोलताना विरोधी पक्षांना लक्ष्य केलं. “विरोधी पक्षांची पत्रकार परिषद आज मला कुठे पाहायला मिळाली नाही. पण त्यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. अंतिम आठवडा प्रस्तावाचा मसुदा त्यांनी पत्रात कळवला आहे. नेमकं कशावर लक्ष केंद्रीत करावं, हे विरोधी पक्षांना लक्षात येत नाहीये. त्यामुळे त्यांची स्थिती गोंधळल्यासारखी आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“मराठा आरक्षणाचा शब्द पूर्ण केला”

“राज्यासमोरच्या प्रश्नांवर सरकार सातत्याने काम करत आहे. विकासाची कामं वेगाने चालू आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकही येत आहे. मराठा समाजाच्या संदर्भात १० टक्के आरक्षणाचा कायदा तयार करून सरकारने दिलेला शब्द पूर्ण केला आहे”, असंही फडणवीसांनी नमूद केलं.

“हे पत्र आमच्यासाठी की त्यांच्यासाठी?”

दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षांकडून देण्यात आलेल्या पत्राचा उल्लेख केला. “विरोधकांच्या पत्रात एक वाक्य मला मनोरंजनात्मक वाटलं. त्यात म्हटलंय सभांमध्ये अर्वाच्य भाषा, शिवीगाळ यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लागलंय. आता हे पत्र आमच्यासाठी लिहिलंय की रोज सकाळी ९ वाजता जे पत्रकार परिषद घेतात, त्यांच्यासाठी लिहिलंय? हा माझा पहिला प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीची जर एवढीच चिंता असेल, तर एक पत्र त्यांनाही द्या. ते कुठले कुठले शब्द वापरतात? काय काय बोलतात? सध्या विरोधी पक्ष निराशेतून जात आहेत”, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी यावेळी लगावला.