सांंगली : राहुल गांधी यांची चायना गॅरंटी आहे, तर नरेंद्र मोदी यांची विकासाची गॅरंटी आहे. यामुळे विकासाला प्राधान्य देणारे मतदार नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करतील असा विश्‍वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी विटा येथे झालेल्या प्रचार सभेत व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आज विटा येथे भाजपच्यावतीने महाविजय सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री भागवत कराड, रामदास आठवले, पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, पश्‍चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, नीता केळकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

हेही वाचा – पीडित ढवळे कुटुंबाला न्याय का दिला नाही? उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचा सवाल

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री शहा म्हणाले, मोदींनी देश विकासाची गॅरंटी देत देशाच्या कल्याणासाठी साथ मागितली आहे, विरोधक मात्र, परिवार कल्याण समोर ठेवून सत्तेसाठी एकत्र आले आहेत. एनडीएकडे पंतप्रधान पदासाठी केवळ मोदी यांचा एकमेव चेहरा आहे. विरोधकाकडे मात्र एक चेहरा नसून अनेक चेहरे आहेत. यदाकदाचित इंडियाच्या हाती सत्ता गेलीच तर बारी-बारीने पंतप्रधान पद देण्याचे ठरविले जाईल. पंतप्रधान म्हणजे काय दुकान आहे का असा सवाल करत त्यांनी देश सुरक्षित आणि समृद्ध करण्यासाठी कणखर नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले.

अमित शहा पुढे म्हणाले, नकली शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे लक्ष आता नव्या मतपेढीकडे लागले असून त्यांना देशाची अस्मिता, धर्म याबद्दल काहीच वाटत नाही. पाचशे वर्ष रखडलेला राममंदिर जन्मभूमीचा प्रश्‍न निकाली काढत त्या ठिकाणी भव्य मंदिराची उभारणी मोदींच्या काळात झाली. देशाची अस्मिता जोपासण्याबरोबरच देशविकासाचे मोठे काम गेल्या दहा वर्षात केले असून यामध्ये महामार्गाचे जाळे असो व गरीब कल्याण कार्यक्रम असो. येत्या काही दिवसात देशाची अर्थव्यवस्था जगात तिसर्‍या स्थानी पोहोचविण्याचे काम मोदींच्या नेतृत्वाखाली होणार असून महिलांनाही संसद व विधी मंडळात ३३ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. सुरक्षित व समृद्ध देश घडविण्यासाठी मोदींना पर्याय होऊच शकत नाही असेही शहा यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा – “एका अब्जाधीश गोल्ड माफियाला…”, खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अविनाश जाधवांचा मोठा दावा; म्हणाले…

जिल्ह्यात पाच महामार्ग उभारण्यात आले असून लवकरच पुणे- बंगळुरू हरित महामार्गही कार्यान्वित होईल. यापुढील काळात सांगली जिल्ह्यात एक हजार कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प उभा करण्यात येणार असून यासाठी भाजपला संधी मिळणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi development and rahul gandhi china guarantee says amit shah ssb