NCP News राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ( NCP ) जनसन्मान यात्रेत अजित पवारांचा ताफा निघाला होता, त्यावेळी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे आलेल्या अजित पवारांना भाजपा कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवले, तसेच त्यांनी कार्यक्रमस्थळी निदर्शनं केली. भाजपाच्या या विरोधामुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं बोललं जातं आहे. सुनील तटकरेंनी याबाबत नाराजी व्यक्त केली असतानाच आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याबाबत देवेंद्र फडणवीसांकडे उत्तर मागितलं आहे.
सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?
“माझ्या जिल्ह्यातही भाजपाचे नेते, मंत्री येतात. आम्ही त्यांच्या कार्यक्रमांवर कधीही आक्षेप घेत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने कोणी महायुतीच्या एकतेला गालबोट लावण्याचं काम करत असेल तर त्याला सक्त ताकीद दिली पाहिजे, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे.” असं परखड मत सुनील तटकरेंनी व्यक्त केलं.
हे पण वाचा- Ajit Pawar : अजित पवार यांचं संजय राऊतांना उत्तर, “आई बापाने जन्म दिलाय म्हणून उचलली जीभ..”
“वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे पालकमंत्री आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपाचे पालकमंत्री आहेत. त्या जिल्ह्यांमध्ये त्यांच्या पक्षांचे कार्यक्रम होत असतात. आम्ही कधी त्यावर आक्षेप घेत नाही. तसाच हा आमच्या पक्षाचा कार्यक्रम आहे. हा कोणत्याही प्रकारचा शासकीय कार्यक्रम नाही. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ( NCP ) जनसन्मान यात्रा आहे. त्यामुळे कोणीही गैरसमजातून किंवा राजकीय हेतूने अशी निदर्शने करू नये. घटक पक्षाने अशा प्रकारे काळे झेंडे दाखवू नये.”
रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?
अजित पवार हे कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत, त्यांच्या दौऱ्याच्या फ्लेक्सवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो नाहीत, ते स्थानिक कार्यकर्त्यांचे ऐकत नाहीत असं आंदोलनाच्या वेळी आशा बुचके म्हणाल्या. अजित पवार यांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यांचा रोख अतुल बेनकेंकडे होता. त्यांच्या या आंदोलनावर रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे. रुपाली चाकणकर म्हणाल्या, “आशा बुचके यांनी अजित पवारांच्या विरोधात काळे झेंडे दाखवण्यापेक्षा त्यांचं म्हणणं मांडायला हवं होतं, दादांनी त्यांचे बोलणं ऐकून घेऊन त्यावर कृती केली असती.”
अमोल मिटकरी काय म्हणाले?
दुसरीकडे आमदार अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणी भूमिका मांडली आहे, “जनसन्मान यात्रा हा आमच्या पक्षाचा ( NCP ) स्वतंत्र कार्यक्रम आहे. ज्यांनी काळे झेंडे दाखवले त्यांनीही स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा. आता आमचं म्हणणं हे आहे की भाजपा कार्यकर्त्यांनी असं का केलं? त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं पाहिजे.”
रोहित पवारांची भाजपावर टीका
या सगळ्या वादात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावर टीका केली आहे. “भाजपाचं हे धोरण आहे. ते आधी बलशाली नेत्याला भाजपाशी हात मिळवणी करायला लावतात, त्यानंतर त्या नेत्याला कमकुवत करतात.”
© IE Online Media Services (P) Ltd