वाई: नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी चुकीचे आरोप करून मला गुंतवण्याचा आणि कपटाने अटक करण्याचा प्रयत्न विरोधक करत असले तरी, माझी बाजू सत्याची आहे. जर मी ४ हजार कोटीचा भ्रष्टाचार केला असता तर तो दडपण्यासाठी केव्हाच भाजपमध्ये प्रवेश केला असता. मात्र मी माझ्या पक्षात ठाम आहे, हेच माझ्या प्रामाणिक व पारदर्शक कारभाराचे द्योतक आहे, असेही शशिकांत शिंदे यावेळी म्हणाले.

महेश शिंदे आज चुकीच्या पद्धतीने आरोप करत आहेत. ते फार स्वच्छ असल्याचं दाखवत असले तरी त्यांचे असली रूप आता सर्वांनाच दिसू लागले आहे. खोटे बोल पण रेटून बोल हा त्यांचा स्वभाव आहे. हिम्मत असेल तर रडीचे डाव खेळण्यापेक्षा जनतेसमोर येऊन त्यांनी खरे -खोटे करावे. मात्र यांच्या थापेबाजीमुळे जनता आता विश्वास ठेवणार नसल्याची खात्री त्यांना पटली आहे. मला मतदारांकडून वाढता पाठिंबा मिळत असल्याने ते सर्वजण माझ्यावर बेछुट आरोप करत आहेत असे शिंदे म्हणाले सुरुवातीच्या काळात ज्यांनी महेश शिंदे यांना उभे केले, त्या शरद पवारांवर बोलण्याची महेश शिंदे यांची लायकी नाही. त्यांनी त्यांच्या लायकीतच राहावे, असा प्रतिहल्ला करून बापाला विसरण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांकडून वेगळी काय अपेक्षा बाळगावी, असा प्रश्न आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला.

हेही वाचा…सातारा: शरद पवारांना यशवंत विचारांवर बोलायचा अधिकार नाही-महेश शिंदे

शरद पवारांवर टीका केली तर काय होते हे आजवर अनेकांनी पाहिलं आहे. त्यामुळे महेश शिंदे यांच्या टीकेला आपण फारसे महत्त्व देत नाही. मी माझ्या पक्षाशी,नेत्याशी आणि जनतेशी प्रामाणिक आहे. त्यामुळे यशवंत विचारांच्या जिल्ह्यात चुकीच्या वृत्तींना बळ मिळू नये, म्हणून आम्ही लढाई लढत आहोत आणि ही लढाई आम्ही जिंकणारच असे शशिकांत शिंदे म्हणाले. मी सर्व आरोप सहन करेन मात्र शरद पवारांवरील टीका सहन करणार नाही असेही शशिकांत शिंदेंनी आ.महेश शिंदेंना सुनावले.