चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांचा नियोजित बेळगावचा दौरा लांबणीवर टाकण्याची नामुष्की येताच शिंदे- फडणवीस सरकारने आम्हाला बेळगावात जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही, अशी सारवासारव सुरू केली. दरम्यान, यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली असून हे नेभळट सरकार असल्याचं म्हटलं आहे. मुंबईत पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारही उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनी यावेळी माईक खेचण्याचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करत अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोलाही लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय झालं?

उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेला पोहोचले तेव्हा अजित पवार तिथे उपस्थित होते. अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंना आसनस्थ होण्यासाठी खुर्चीकडे हात दाखवला. यावर उद्धव ठाकरेंनी ‘दादा, तुम्हाला माईक खेचायला कुठून बरं पडेल?’ अशी विचारणा केली. यावर अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह उपस्थितांमध्ये हशा पिकला.

विरोधकांचा आरोप, सत्ताधाऱ्यांची सारवासारव; मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द झाल्याने वाद

नेमकं प्रकरण काय?

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माईक खेचून घेत उत्तर दिलं होतं. संतोष बांगर कोणत्या पक्षातून तुमच्याकडे आले? अशी विचारणा एकनाथ शिंदेंना करण्यात आली होती. त्यावर एकनाथ शिंदे यांनी कोणत्या म्हणजे शिवसेनेच्या असं उत्तर दिलं होतं. ते बोलत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या समोरचा माईक काढून घेतला आणि ‘ते त्या शिवसेनेतून खऱ्या शिवसेनेत आले आहेत. आतापर्यंत ते चुकीच्या गटात होते’ असं उत्तर दिलं होतं.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोरील माईक खेचून घेतल्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. नेमकं मुख्यमंत्री कोण आहे? अशी विचारणा यावेळी विरोधकांनी केली होती.

उद्धव ठाकरेंनीही त्यावेळी या घटनेवरुन टीका केली होती. उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर असलेला माईक आपल्याकडे खेचला, पुढे काय काय खेचतील ते माहित नाही, असा टोला त्यांनी लगावला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena uddhav thackeray targets cm eknath shinde devendra fadnavis mike belgaon sgy
First published on: 06-12-2022 at 08:50 IST