Allu Arjun Arrest : ‘पुष्पा २’च्या प्रीमियर शोदरम्यान संध्या थिएटर परिसरात मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी होऊन यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ४ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी शुक्रवारी ( १३ डिसेंबर ) सकाळी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रीमियर शोदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुन, संध्या थिएटर व्यवस्थापन आणि अल्लू अर्जुनच्या सुरक्षा पथकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. याच पार्श्वभूमीवर, हैद्राबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला त्याच्या ज्युबली हिल्सच्या राहत्या घरातून अटक केली होती. यानंतर अभिनेत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनचा अंतरिम जामिन मंजूर केला आहे. याप्रकरणी राजकीय तसेच कलाविश्वातून विविध कलाकारांच्या प्रतिक्रिया येत आहेत. ‘पुष्पा २’मधली अल्लू अर्जुनची सहकलाकार रश्मिका मंदानाने देखील याप्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. आता नुकतीच इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने या प्रकरणाबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

हेही वाचा : अल्लू अर्जुनच्या अटकेवर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हस्तक्षेप करणार नाही…”

विवेक लिहितो, “कोणाचाही मृत्यू होणं ही अतिशय वेदनादायी आणि दु:खद घटना आहे. पण, यासाठी अल्लू अर्जुनला अटक करणं योग्य आहे का? आम्ही सगळे कलाकार आमच्या चाहत्यांवर खूप मनापासून प्रेम करतो. अल्लू अर्जुनला आणि त्याच्या कुटुंबीयांना मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. तो कायम कायद्याने चालतो, याशिवाय अल्लू अर्जुन सामाजिकदृष्ट्या सुद्धा एक जबाबदार नागरिक आहे. त्याचं व्यक्तिमत्व कसंय हे मी फार जवळून अनुभवलं आहे. माणूस म्हणून तो खूपच चांगलाय… या दुर्घटनेबाबत माहिती मिळाल्यावर त्यालाही निश्चितपणे वाईट वाटलं असणार… पण, आज त्याच्या अटकेनंतर काही प्रश्न उपस्थित करावेसे वाटतात.”

“जर अशाप्रकारचा अपघात एखाद्या राजकीय प्रचारसभेत झाला असता तर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अटक केली असती का? कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी त्यांना जबाबदार धरलं असतं का? अल्लू अर्जुनवर ज्याप्रकारे कारवाई करण्यात आली तशी कारवाई, एखाद्या प्रतिष्ठित सरकारी व्यक्तीवर केली जाणार का? हे योग्य आहे का? हा न्याय आहे का? मला माहितीये पोलीस फक्त त्यांचं कर्तव्य बजावत आहेत. पण, अशा घटना रोखण्यासाठी सर्वात आधी व्यवस्था सुधारली पाहिजे.”

हेही वाचा : बॉलीवूडने बहिष्कार टाकूनही विवेक ओबेरॉय कसा झाला ३४०० कोटींचा मालक? भर कार्यक्रमात सांगितला बिझनेस प्लॅन

“माझा भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि मला याचीही खात्री आहे की, या प्रकरणात पूर्ण न्याय दिला जाईल. पण, या घटना टाळण्यासाठी कायमस्वरुपी उपाय करणं गरजेचं आहे नाही का? एक महान राष्ट्र म्हणून आपण स्वत:लाच हे प्रश्न विचारले पाहिजेत.”

अल्लू अर्जुनच्या अटकेवर विवेक ओबेरॉयचं मत ( Allu Arjun Arrest )

“बनी ( अल्लू अर्जुन ) माझ्या प्रिय भावा, तू ऑफस्क्रीन सुद्धा एक सज्जन माणूस आहेस हे मला अनेक वर्षांपासून माहिती आहे. तुझ्याबरोबर आम्ही कायम आहोत. या दुर्घटनेत बाधित झालेल्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदनात आहेत. देव तुमच्या पाठिशी आहे.” अशी पोस्ट शेअर करत विवेक ओबेरॉयने आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allu arjun arrest bollywood actor vivek oberoi shares post asked is this fair decision sva 00