अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढांनी गेल्यावर्षी २४ सप्टेंबरला लग्नगाठ बांधली. उदयपूरमध्ये यांचा शाही विवाहसोहळा थाटामाटात पार पडला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत परिणीतीने तिच्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.

बॉलीवूड हंमाला दिलेल्या मुलाखतीत परिणीतीने लग्नानंतर राजकारणातील घडामोडी फॉलो करण्यास सुरुवात केल्याचं सांगितलं. अभिनेत्री म्हणाली, “आता फॉलो करावंच लागेल ना…पण, माझी तक्रार अशी आहे की, राघव अजिबात मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी फॉलो करत नाही. त्याला काय सुरू आहे हे माहितीच नसतं. बरीच गाणी त्याला माहिती आहेत. पण, अनेकदा ती गाणी माझ्या चित्रपटातील आहेत हे सुद्धा त्याला माहिती नसतं.”

हेही वाचा : “माझं अजून लग्न झालेलं नाही त्यामुळे लोक…”, ‘रमा राघव’ फेम अभिनेत्रीने शेअर केला अनुभव

“अगदी खरं सांगायचं झालं, राघवला सिनेमातलं नी मला राजकारणातलं काहीही कळत नाही. त्यामुळे आम्ही नेहमी आमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल गप्पा मारत असतो आणि मला वाटतं तेच सगळ्याच जास्त छान आहे. आता हळुहळू मला त्याच्या कामाबद्दल माहिती होतेय.” असं परिणीतीने सांगितलं.

हेही वाचा : ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत ‘जोगवा’ फेम अभिनेत्री घेणार एन्ट्री, साकारणार ‘ही’ भूमिका, जाणून घ्या…

राजकीय क्षेत्राशी निगडीत असलेल्या राघव चड्ढांबरोबर झालेल्या लग्नाबद्दल परिणीती सांगते, “इंडस्ट्रीशी संबंधित नसलेल्या व्यक्तीशी लग्न झालं ही खरंच खूप छान गोष्ट आहे. कारण, माझं वैयक्तिक जीवन हे चित्रपटसृष्टीपेक्षा फार वेगळं आहे. राघवमुळे माझं आयुष्य अधिक सामान्य आणि सुखकर झालं.”

दरम्यान, नुकताच परिणीतीचा अमर सिंग चमकिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये तिच्याबरोबर अभिनेता दिलजीत दोसांझने प्रमुख भूमिका साकारली आहे.