मुंबई : घाटकोपरमधील दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेने याच परिसरातील तीन भलेमोठे जाहिरात फलक हटविण्याचा निर्णय घेतला आहे. हे फलक हटविणे आव्हानात्मक असून यासाठी मोठ्या क्रेन, तज्ज्ञ आणि कर्मचाऱ्यांची गरज पालिकेला भासणार आहे. घाटकोपर दुर्घटनेनंतर सोमवारी बचावकार्यात सहकार्य करणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) महापालिकेला मदत केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घाटकोपर दुर्घटनेनंतर पूर्व द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. अशा वेळी अग्निशमन दल, पालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेची वाहने घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होतो. पण त्याआधीच एमएमआरडीएचे ६० जणांचे पथक आपल्या अत्याधुनिक यंत्रणांसह घटनास्थळी रवाना केले. पेट्रोल पंपवर जाहिरात फलक पडल्याने तो हटविण्याचे आव्हान पालिकेसमोर होते. एमएमआरडीएच्या मदतीमुळे बचावकार्य वेळेत आणि यशस्वीपणे पार पाडले. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त फलक उभारणाऱ्या कंपनीचे या परिसरात तीन मोठे जाहिरात फलक आहेत. हे फलक तात्काळ हटविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. एक-दोन दिवसांत हे फलक हटविण्यात येणार आहेत. हे फलक हटविण्यासाठी पालिकेने एमएमआरडीएकडे मदत मागितल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली.

हेही वाचा : मुंबई: रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप

एमएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पातील ‘वडाळा – घाटकोपर – ठाणे – कासारवडवली मेट्रो ४’ मार्गिकेचे काम घाटकोपर परिसरात सुरू आहे. या कामासाठी अत्याधुनिक उपकरणांचा, भल्या मोठ्या क्रेनचा वापर केला जात आहे. एमएमआरडीएकडे तज्ज्ञ अधिकारी, मोठा कर्मचारी वर्ग आहे. एमएमआरडीएच्या ६० जणांच्या पथकाची आणि उपकरणांची मोठी मदत पालिकेला झाली. त्यामुळे पालिकेने एमएमआरडीएकडे मदत मागितली आहे. त्यानुसार एमएमआरडीए पालिकेला आवश्यक ती सर्व मदत, उपकरणे, मनुष्यबळ पुरविणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mmrda helps bmc to remove 3 advertisement hoardings at ghatkopar area mumbai print news css
Show comments