नागपूर : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहारात आता आठवड्यातून चार दिवस मोड आलेले कडधान्य दिले जाणार आहे. परंतु, जि. प. नागपूरच्या पाककृती समितीने निर्धारित केलेले अंकुरित कडधान्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन समितीकडून संताप व्यक्त केला जात आहे. या योजनेच्या बदलत्या स्वरूपाबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून नुकताच एक शासन निर्णय जाहीर करण्यात आला. त्यात एकूण १५ प्रकारच्या पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १२ पाककृती जेवणाच्या असून त्यात नाचणी सत्व, खीर व मोड आलेले कडधान्याचा समावेश आहे. जि.प. स्तरावर पाककृतीचे दिवस व आठवडानिहाय निर्धारण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने करायचे आहे. त्यानुसार, इयत्ता पहिली ते पाचवी च्या विद्यार्थ्यांकरिता चार ग्रॅम व सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता पाच ग्रॅम मोड आलेले कडधान्य निश्चित करण्यात आले आहे. ही बाब पूर्णता अव्यवहार्य व अनाकलनीय असून आमच्या मुलांची थट्टा चालवली काय, असा सवाल पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी विचारला आहे.
तांदळाची खीर आणि नाचणी सत्व
आठवड्यातून चार दिवस तांदळाची खीर तर एक दिवस नाचणी सत्व द्यायचे असून त्याकरिता लागणारी साखर आणि दूध पावडर मुख्याध्यापकांना खरेदी करायचे आहे. याकरिता महिनाभरासाठी दोन दिवसांच्या पूर्ण आहाराच्या अनुदानाएवढी रक्कम मिळणार असून त्यात एवढा खर्च भागवणे शक्य नसल्याने या अनुदानात वाढ व्हावी, अशी भावना मुख्याध्यापकांकडून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: हुल्लडबाजांना चाप… नागपूरच्या रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या दीड हजार वाहनचालकांचे…
पाककृती समितीचे काम काय?
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारात सुधारणा करून वैविध्यपूर्ण पोषक आहार दिला जाणार आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत (पूर्वीचे नाव शालेय पोषण आहार योजना) सद्य:स्थितीतील पाककृतींमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे. समितीमध्ये प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेचे डॉ. प्रसाद कुलकर्णी, व्यापारी महासंघ सिंधुदुर्गचे कार्यवाह नितीन वाळके, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना गडचिरोलीचे अधीक्षक वैभव बारेकर आदींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांवर अन्याय होत असेल तर या समितीचे काम काय असा प्रश्न केला जात आहे.
हेही वाचा: पैशांसाठी देहव्यापार : ‘त्या’ दाम्पत्याने गरजू विद्यार्थिनी, विवाहित महिलेला हेरले अन्…
सध्या निर्धारित केलेल्या पाककृतीमध्ये मोड आलेल्या कडधान्यांच्या प्रमाणाची मात्रा फारच अत्यल्प आहे. ती वाजवी स्वरूपाची व पोषक ठरणारी नाही. त्यामुळे पाककृतीचे पुनर्निर्धारण करून नव्याने प्रमाण निश्चित करण्यात यावे.
लीलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष, राज्य प्राथमिक शिक्षक समिती.
© The Indian Express (P) Ltd