राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी २०१४ आणि २०१९ दरम्यान राज्यात भाजपा आणि शिवसेना युतीचं सरकार असताना एकनाथ शिंदेंनी काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. तसेच शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही एकनाक शिंदे १५ आमदारांसहीत काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत होते असं विधान केलं आहे. या दाव्यांवर भाजपाने पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. नागपूरमध्ये याच दाव्यांवरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं नाव घेतं या विधानांवर भाष्य केलं. इतकच नाही तर त्यांनी हा संपूर्ण प्रकार म्हणजे बदनामी करण्याचा प्रकार असल्याचंही म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनुसूचित जमातीच्या अधिसंख्य कर्मचाऱ्यांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्याने ऑर्गनायझेशन फॉर ऑफ ह्यूमन संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर अधिसंख्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरु आहे. नागपुरातील संविधान चौकातही सुरु असलेल्या या आंदोलनाला आज बावनकुळे यांनी भेट दिली. यावेळेस त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सरकार दरबारी मांडू असं सांगितलं. यानंतर बावनकुळे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद सादला. त्यावेळ आंदोलनासंदर्भातील प्रश्नानंतर अशोक चव्हाण आणि चंद्रकांत खैरेंनी केलेल्या विधानांवरुन प्रश्न विचारण्यात आले.

२०१४ ते २०१९ दरम्यान शिंदे काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा विचार करत होते असं विधान अशोक चव्हाणांनी केल्याचा संदर्भ देत यावर पत्रकारांनी बावनकुळेंची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर उत्तर देताना, “तेव्हा अ‍ॅप्रोच झाले असतील तर उद्धव ठाकरे अ‍ॅप्रोच झाले असतील. तेव्हा एकनाथ शिंदे सेना चालवत नव्हते. तेव्हा सेना चालवत होते उद्धव ठाकरे. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं नाव घेऊन अशोक चव्हाण संभ्रम निर्माण करत आहेत. उद्धव ठाकरे म्हटलं पाहिजे. उद्धव ठाकरे आमच्याकडे काँग्रेसचं सरकार बसवायला आले होते, असं म्हटलं पाहिजे होतं. उलटं म्हटलं त्यांनी,” अशी प्रतिक्रिया दिली.

१५ आमदारांसहीत एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते या चंद्रकांत खैरेंच्या दाव्यासंदर्भतही प्रश्न विचारण्यात आला. त्यावरुन बावनकुळे यांनी चंद्रकांत खैरेंना लक्ष्य केलं. “ते नरेटीव्ह सेट करत आहेत.चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरेंचे विश्वासू म्हणवून घेण्यासाठी मागील तीन महिन्यांमध्ये इतके सक्रीय झाले आहेत की आता उद्धव ठाकरेंचे तारक म्हणून काम करत आहेत. हे जे गौप्यस्फोट करावे लागतात ते कार्यकर्ते पक्षात असताना करावे लागतात. कार्यकर्ता पक्षातून बाहेर पडल्यानंतर असे आरोप करणे म्हणजे जाणीवपूर्वक प्रतिमा मलिन करण्यासारखं आहे,” असं बावनकुळे म्हणाले.

तसेच बावनकुळे यांनी शिंदे काँग्रेससोबत जाणार होते या विधानांवर मत व्यक्त करताना. “२०१४ मध्ये किंवा २०१९ मध्ये जे काही झालं, भाजपाविरोधात जे जे षड्यंत्र झालं त्याला जोपर्यंत प्रमुख नेत्याचं संरक्षण असणार. तसं नसेल तर तोपर्यंत हे शक्य होतं नाही. तो कट उद्धव ठाकरेंनी केला असेल म्हणून असं (चव्हाण म्हणतात तसं) झालं असेल,” असंही बावनकुळेंनी म्हटलं.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader ashok chavan claims eknath shinde met him with proposal for alliance during fadnavis rule bjp reacts rno news scsg
First published on: 29-09-2022 at 14:24 IST