लोकसत्ता टीम
यवतमाळ : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. रात्री नऊ वाजतानंतर पावसाचा जोर वाढला. रात्रभर जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक गावांत पाणी शिरले. विदर्भ-मराठवाडा सीमेवरील महागाव तालुक्यातील धनोडा येथे पैनगंगा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने यवतमाळ-माहूर, किनवट हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला.
जिल्ह्यात शनिवार, रविवार हे दोन दिवस मुसळधार पावसाचे राहतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार, शनिवारी दुपारपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. सायंकाळी सहा वाजतानंतर पावसाने जोर पकडला आणि रात्री ९ ते आज रविवारच्या सकाळी ७ वाजेपर्यंत ढगांच्या गडगडाटात मुसळधार पाऊस कोसळला. सोसाट्याचा वारा, विजा आणि ढगांच्या गडगडाटात पाऊस कोसळत असल्याने ग्रामीण भागात नदी, नाल्यांच्या काठावरील गावांमध्ये धडकी भरली होती. दिग्रस तालुक्यातील वरंदळी गावात नाल्याचे पाणी शिरल्याने गाव जलमय झाले. रात्री गाव पाण्यात गेल्याने गावकऱ्यांची तारांबळ उडाली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या पावसामुळे सर्वत्र सायोबीन भूईसपाट झाले असून, कापूस, तूर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे सावट पसरले आहे.
आणखी वाचा-अजितदादांनी दुसऱ्यांदा संघ भूमीवर जाणे टाळले, काय आहे कारण?
यवतमाळ-माहूर मार्गावरील धनोडा येथे पैनगंगा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने पहाटेपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. यवतमाळ-दारव्हा मार्गावर बोरी अरब येथे अडाण नदीवरील रपटाही पाण्याखाली गेल्याने यवतमाळ – दारव्हा मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. पाऊस रात्रभर सारखा कोसळत असल्याने अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. शहरात बेसमेंटमधील दुकानांमध्ये पाणी साचल्याने व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळल्याने धरणातील जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे आज सकाळी प्रकल्पाचे १० दरवाजे ५० सेंमीने उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. बेंबळा, वर्धा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आणखी वाचा-चंद्रपुरातील पुरासाठी वेकोलि नव्हे महापालिका जबाबदार! वेकोलिचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र
मुसळधार पावसामुळे सोमवारी साजऱ्या होणाऱ्या पोळा सणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पोळ्यानिमित्त बाजारपेठ मोठ्या प्रमणात सजली आहे. यवतमाळच्या महादेव मंदिर, समता मैदान परिसराला यात्रेचे स्वरूप आले असून पावसाने लहान, मोठ्या व्यवसायिकांना फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पुसद येथे होणारी जनसन्मान यात्रा रद्द करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडले.