नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोग युवकांचे आयुष्य घडवणारे आहे की त्यांची कत्तल करणारा जनावरांसारखा कत्तलखाणा आहे. १८ व २५ ऑगस्ट रोजी आयबीपीएसने देशपातळीवर परीक्षा आयोजित केलेल्या असताना त्याच तारखांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही परीक्षा आयोजित केल्या आहेत, यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. एमपीएससीने परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करुन दोन तीन दिवसांनी परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा न्यायालयात दाद मागू, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.

अतुल लोंढे म्हणाले की, राज्य आयोग परिक्षांच्या तारखा ठरवताना सर्व परिक्षांच्या तारख्यांचा अंदाज घेऊन ओव्हरलॅप होणार नाहीत अशा पद्धतीने तारखा ठरवण्याचा प्रघात चालत आला आहे. पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्याची दखल घेतल्याचे यावेळी तरी दिसत नाही. एमपीएससी विद्यार्थ्यांवर सुड उगवण्याचे काम करत आहे. एकतर जागा निघत नाहीत आणि जागा निघल्या तर त्याचे नियोजन व्यवस्थित नसते. परीक्षा फक्त रविवारीच घ्यावी असा काही नियम नाही, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने या प्रकरणी लक्ष घालून परिक्षांच्या तारखा ओव्हरलॅप होत असल्याचे दिसताच विद्यार्थ्यांचे हित पाहून आयोगाच्या परिक्षांची तारिख बदलण्याचे निर्देश दिले. जे कर्नाटक सरकार करू शकते ते महाराष्ट्र सरकार का करु शकत नाही. सर्वसामान्यांचे सरकार आहे असा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाकाखाली एमपीएससी मनमानी कारभार करते त्यात लक्ष लागण्याची गरज आहे.

हेही वाचा : Narali Purnima 2024: नारळी पौर्णिमेचे महत्त्व नेमकं काय? का केली जाते समुद्राची पूजा?

आयोगाचे म्हणणे काय?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या(एमपीएससी) वतीने घेण्यात येणारी समाजकल्याण विभागाची परीक्षा व आयबीपीएस आरआरबीआय परीक्षा आणि राज्यसेवा व आयबीपीएस लिपीक बँक ही परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने दोन्ही परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अडचणी वाढल्या आहेत. ‘आयबीपीएस’च्या तारखांची घोषणा जानेवारी २०२४ मध्ये झाली असतानाही ‘एमपीएससी’ने तारखांचा घोळ केल्याची ओरड होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २५ ऑगस्ट रोजी होणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून ही परीक्षा आधीच दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. त्याच दिवशी बँकिंगमधील आयबीपीएस लिपीक परीक्षा होणार आहे. तर दुसरीकडे १८ ऑगस्ट रोजी ‘एमपीएससी’कडून समाजकल्याण विभागाच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही जाहिरात गेल्या वर्षीची असून परीक्षेची तारीख गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. पण त्याच दिवशी आयबपीएस आरबीआय परीक्षाही नियोजित आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी हे दोन्ही परीक्षांसाठी अर्ज करतात. असे असताना दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने विद्यार्थ्यांना कुठल्याही एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.

हेही वाचा : शरद पवारांकडून नितीन गडकरी यांची भरभरून प्रशंसा; म्हणाले…

हे आहे कारण

समाज कल्याण अधिकारी गट- ब व इतर मागास बहूजन कल्याण अधिकारी गट-ब या पदाची चाळणी परीक्षा १८ ऑगस्ट आणि राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही २५ ऑगस्टला होणार आहे. या तारखांमध्ये कुठलाही बदल करण्यात आला नसून नियोजित वेळेतच परीक्षा होणार असल्याने संभ्रम ठेऊ नये.

डॉ. सुवर्णा खरात, सचिव, एमपीएससी