लोकसत्ता टीम

गडचिरोली : लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार भाजपात जाणार असा दावा केला होता. शुक्रवारी आत्राम यांनी पुन्हा वडेट्टीवार आणि भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक झाल्याचा उल्लेख केला. यावर वडेट्टीवार यांनी बैठकीचे पुरावे दिल्यास मी राजकरण सोडणार अन्यथा तुम्ही राजकारण सोडा, असे आत्राम यांना आव्हान केले आहे.

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात प्रचार शेवटच्या टप्प्यात असून राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार, असा दावा करून खळबळ उडवून दिली होती. बैठकीत आपण उपस्थिती असल्याचेही सांगितले होते. त्यांनतर हा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आला आहे. आता वडेट्टीवार यांनी बैठकीचे पुरावे सादर केल्यास आपण राजकारण सोडणार अन्यथा तुम्ही राजकारण सोडा, असे आव्हान आत्राम यांना केले आहे.

आणखी वाचा-गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केला बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…

निवडणुकीत काँग्रेसचे वाढते प्राबल्य बघून महायुतीचे नेते अस्वस्थ झाले असून यातूनच ते असे तथ्यहीन दावे आणि आरोप करत आहेत. माझ्या मुलीला तिकीट न देण्याचा निर्णय पक्षाचा होता. मी सत्तेसाठी नव्हे तर पक्षाच्या विचारधारेसाठी लढणार कार्यकर्ता असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. गडचिरोलीमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी थेट लढत आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यात असून उमेदवारांपेक्षा नेत्यांमध्येच सुरू असलेले आरोप प्रत्यारोप चर्चेचा विषय ठरत आहे.