नाशिक : ‘जे गिरीश महाजन आपल्या विरोधात बोलतात. त्यांच्याबरोबर सर्व जण छायाचित्र काढतात. हे बरोबर नाही‘ अशा शब्दांत शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी उपनेते सुधाकर बडगुजर यांना भ्रमणध्वनीवर संदेश पाठविला होता. पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर बडगुजर यांनी त्यांना संदेशाद्वारे प्रत्त्युतर दिले. राऊत आणि बडगुजर यांच्यातील हकालपट्टीदरम्यानचा अखेरचा संवाद चर्चेचा विषय झाला आहे.

शिवसेनेत फूट पडण्याआधीपासून संजय राऊत आणि सुधाकर बडगुजर यांचे अतिशय निकटचे संबंध होते. एकसंघ शिवसेनेत इतरांना डावलून खासदार राऊत यांनी नेहमी बडगुजर यांना झुकते माप दिले होते. त्यामुळे जेव्हा शिवसेना दुभंगली, तेव्हाही बडगुजर यांनी राऊत यांची साथ सोडली नव्हती. उभयतांमध्ये वितुष्ट आले ते बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट आणि विवाह सोहळ्यात गिरीश महाजन यांच्यासमवेत काढलेल्या छायाचित्रामुळे.

सोमवारी ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही हजेरी लावली होती. महाजन यांच्या भेटीवेळी बडगुजर हे मंगल कार्यालयातच होते. नवदाम्पत्यास शुभेच्छा देताना उपस्थितांचे एकत्रित छायाचित्र टिपले गेले. त्यात महाजन यांच्या समवेत बडगुजर होते. यावरून वादाची ठिणगी पडल्याचे उभयतांमधील संवादातून लक्षात येते. मंगळवारी खासदार राऊत यांनी आपल्याला भ्रमणध्वनीवर संदेश पाठविला होता. महाजन यांचा संदर्भ देऊन त्यांच्याबरोबर छायाचित्र काढता, हे बरोबर नसल्याचे म्हटले होते, असे बडगुजर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

लग्न सोहळ्यात राजकीय पक्षांचे नेतेमंडळी एकत्रित येणे, छायाचित्र काढणे यात काही वावगे नाही. यावेळी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतही होते. पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर आपण खासदार राऊत यांना लघुसंदेशाद्वारे उत्तर दिल्याचे बडगुजर यांनी सांगितले.

खरे बोलणे, नाराजी व्यक्त करणे, हा गुन्हा असेल तर तो मी केला आहे. त्याची शिक्षा पक्षातून हकालपट्टी असेल तर तीही मला मान्य आहे. कोणत्या पक्षात जायचे हे अजून ठरवलेले नाही. सध्या थांबून वाट पाहणार आहे. सुधाकर बडगुजर (हकालपट्टी झालेले शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते)