देवळा एज्युकेशन सोसायटी संचलित कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना तसेच इतर शैक्षणिक विभागातील १४ विद्यार्थ्यांची अग्निवीर म्हणून निवड झाली आहे. सैन्य दलात भरतीसाठी केलेले अथक परीश्रम अखेर फळास आले. अग्निपथ योजनेत निवड झाली. अग्निवीर झाल्याचा स्वत:सह कुटुंबीयांनाही गर्व वाटत आहे. या योजनेंतर्गत चार वर्षे देशाची सेवा करता येईल. सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर तुकडीतील केवळ २५ टक्के अग्निवीरांना पुढे स्थायी सेवेची संधी मिळेल. या बदलामुळे लष्करात निवड झाल्याचा आनंद असला तरी सेवाकाळ कमी झाल्याची खंत आहे, अशी भावना देवळा तालुक्यातील अग्निवीरांनी व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- कुक्कुटपालन केंद्रातील २०० कोंबड्या बिबट्याकडून फस्त? वन विभागाचा विश्वास बसेना

हे सर्व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आहेत. सैन्य दलातर्फे मुंबई येथे आयोजित मेळाव्यात देवळा महाविद्यालयातील हे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातील रोशन शिरसाट (मेशी), नीलेश वाघ (ठेंगोडा), चेतनानंद धोंडगे (गुंजाळनगर), सुरेश गिरासे (वासोळ), ओमकार जाधव (मकरंदवाडी), वैभव आहेरराव (मकरंदवाडी), मयूर शिंदे (वरवंडी), सुधीर पवार (भऊर), ज्ञानेश्वर सोनवणे (वडाळा), राहुल ठाकरे (पिंपळगाव) यांच्यासह तुषार पवार, सचिन पवार, सौरभ चव्हाण, प्रविण जाधव या खर्डे येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा- लव्ह जिहाद विरोधी कायद्यासाठी हिंदू संघटनांचा नाशिकमध्ये मूक मोर्चा

अग्निवीर म्हणून निवड झाल्याबद्दल संस्थेचे प्रमुख प्राचार्य हितेंद्र आहेर यांच्या हस्ते छात्रांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोसायटीच्या प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. मालती आहेर यांनी देशसेवा ही सर्वोच्च सेवा असून अग्निविरांची ही निवड म्हणजे केवळ महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब नसून संपूर्ण देवळा तालुक्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले. या प्रसंगी उपप्राचार्य विजयकुमार जोशी, उपप्राचार्य पी. एन. ठाकरे , डॉ. संजय बनसोडे, डॉ. डी. के. आहेर, प्रा. वामन काकवीपुरे, प्रा. जालिंदर कडू, डॉ. दीपिका शिंदे आणि राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख लेफ्टनंट बादल लाड यांनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा- नाशिक: वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ७० फूट पोहत जाऊन प्रयत्न; महावितरणच्या कर्मचाऱ्याची कामगिरी

अग्निवीर झालेल्या सर्वच छात्रांना सैन्य दलात दाखल झाल्याचा मनस्वी आनंद झाला आहे. कुटुंबासह आप्तमित्रांनाही अतिशय गर्व वाटत असल्याचे प्रवीण जाधव आणि सचिन पवार यांनी सांगितले. खर्डे गावातील १४ विद्यार्थी अग्निवीर भरती प्रक्रियेत सहभागी झाले होते. लष्करी भरतीसाठी गावातील विद्यार्थ्यांची आधीपासून संयुक्तपणे तयारी सुरू होती. पहाटे १६०० मीटर धावणे, जोर बैठका मारणे, नंतर लेखी परीक्षेसाठी सामान्य ज्ञानावर चर्चा, असे वेळापत्रक ठरलेले होते. प्रत्यक्ष भरतीत काहींची छातीचा निकष वा वैद्यकीय कारणास्तव निवड होऊ शकली नाही. सैन्य दलाच्या नियमित भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेत अपयशी ठरल्याने सचिन पवारने राष्ट्रीय छात्र सेनेत प्रवेश घेऊन सी प्रमाणपत्र मिळवले. या प्रमाणपत्राचा उपयोग अग्निवीर भरतीत झाला. त्या प्रमाणपत्रामुळे लेखी परीक्षा द्यावी लागली नसल्याचे तो सांगतो. निवड झालेले सर्व विद्यार्थी लवकरच सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहेत.

हेही वाचा- सुषमा अंधारे यांचे मोठे विधान! शिंदे गटात अनेकजण नाराज असल्याचे म्हणत थेट नेत्यांची घेतली नावे, म्हणाल्या “लवकरच…”

रुखरुख अन् अपेक्षा

सैन्य दलाची सेवा खडतर असली तरी प्रतिष्ठेची मानली जाते. या माध्यमातून देश सेवेची संधी मिळते. अग्निवीरांसाठी निश्चित केलेली चार वर्षाची कालमर्यादा मात्र अनेकांना रुचलेली नाही. ही योजना लागू होण्यापूर्वी सैन्य दलाच्या नियमित भरतीत निवड झालेले नशीबवान ठरल्याची प्रतिक्रिया अग्निवीरांमधून उमटते. चार वर्षांच्या सेवाकाळानंतर अग्निवीरांना नियमित संवर्गात समाविष्ट होण्यासाठी अर्ज करता येईल. त्यात प्रत्येकाची कामगिरी जोखली जाईल. वैद्यकीय तपासणी, शारीरिक, लेखी चाचण्यांमधून ती निवड होईल. तुकडीतील केवळ २५ टक्के अग्निवीरांना स्थायी सेवेची संधी मिळणार आहे. त्यामुळे तेव्हा प्रचंड स्पर्धा असेल. ज्यांना लष्करात स्थायी सेवा मिळणार नाही, त्यांना चार वर्षानंतर पर्यायी सेवेची व्यवस्था सरकारने करावी, ही माफक अपेक्षा ठेऊन अग्निवीर लष्करी सेवेसाठी उत्साहात सज्ज झाले आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Selection of 14 students of devla college nashik in agneepath scheme dpj