बंडखोर शिंदे गटाकडून अजित पवार आणि राष्ट्रवादी लक्ष्य, नियोजनबद्ध प्रचार मोहीम

बंडखोरीचे समर्थन करत शिवसैनिकांची सहानुभूती मिळवण्याची आणि त्याचवेळी राष्ट्रवादीला जनमानसात खलनायक ठरवण्याची नियोजनबद्ध प्रचार मोहीम एकनाथ शिंदेगटाने सुरू केली आहे.

एजाजहुसेन मुजावर/ विजय पाटील

शिवसेनेच्या आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्या पक्षाचे नेते अजित पवार यांच्याकडून जाणीवपूर्वक त्रास देण्याचे राजकारण झाल्यामुळेच हे आमदार बंडाच्या पवित्र्यात आल्याचा राजकीय हल्ला चढवत आपल्या बंडखोरीचे समर्थन करत शिवसैनिकांची सहानुभूती मिळवण्याची आणि त्याचवेळी राष्ट्रवादीला जनमानसात खलनायक ठरवण्याची नियोजनबद्ध प्रचार मोहीम एकनाथ शिंदेगटाने सुरू केली आहे. एकानंतर एक बंडखोर आमदारांचे राष्ट्रवादीला व अजित पवारांवर टीका करणाऱ्या ध्वनीचित्रफिती याच प्रचारतंत्राचा भाग आहेत.

गुवाहाटी येथे असलेले ॲड. शहाजीबापू पाटील यांचे एका सहकाऱ्यासोबतचे भ्रमणध्वनीवरील संभाषण बाहेर प्रसारित झाले आहे. यामध्ये त्यांनी शिवसेना आमदारांच्या बंडाविषयी आणि त्यांच्या भूमिकेविषयी अनेक मते व्यक्त केलेली आहेत. हे संभाषण सध्या मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून चर्चेत आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड झाल्यावर त्यांच्यासोबत प्रथम गेलेल्या आमदारांच्या गटात पाटील यांचा समावेश आहे. सुरुवातीला सुरत आणि तिथून आसामची राजधानी गुवाहाटी येथे गेल्यावर तिथून त्यांनी आपल्या सांगोला मतदारसंघातील एका कार्यकर्त्यांला दूरध्वनी करत या बंडाची त्यामागच्या कारणांची चर्चा केली आहे. मागील अडीच वर्षे सत्तेत असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने होणारा कोंडमारा, पक्षाकडूनही होत असलेली उपेक्षा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना वेळोवेळी केलेली मदत, बंडखोरीला भाजपचा असलेला पाठिंबा याबाबत दिलखुलास गप्पा शहाजीबापू पाटील यांनी मारल्या आहेत.

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सांगोल्याचा विकास पूर्णपणे ठप्प झाला. या काळात आमचा सहकारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा शिवसेनेला संपवू पाहात आहेत तर वेळोवेळी सांगून शिवसेनेच्या नेतृत्वाकडून याची दखल घेतली जात नाही, असा आरोप पाटील यांनी केला आहे.

सरकार टिकविण्याचा प्रयत्न, विरोधातही बसण्याची तयारी, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका

शिवसेनेचा आमदार झाल्यानंतर सांगोला उपसा सिंचन योजनेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात सलग १२ वेळा पत्रे दिली. परंतु या साध्या मागणीकडेही दुर्लक्ष झाले. सांगोला नगरपालिकेच्या इमारतीसाठी १२ कोटींचा निधी मागितला असता त्याचीही दखल घेतली गेली नाही. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी आपणांस कधीही निराश केले नाही. सांगोल्याच्या विकासासाठी भरीव निधी दिला. देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्याशी भावाप्रमाणे नाते जोपासले. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी मात्र कायम अडथळे आणले. मी राष्ट्रवादीत नसल्याने त्यांनी माझ्यावर कायम राग धरला, असे पाटील म्हणतात.

तिकडे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी समाजमाध्यमांद्वारे आपली चित्रफीत प्रसारित केली. महाविकास आघाडी म्हणून सत्तेत एकत्र असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम सर्वत्र सुरू होते. अजितदादा मुख्यमंत्र्यांनाही जुमानत नव्हते. निधी वाटपातही राष्ट्रवादीला झुकते माप दिलेले होते. हे असेच सुरू राहिले असते तर राज्यातील शिवसेना लवकरच संपली असती, मग या परिस्थितीत आम्ही शिवसेना जगवण्यासाठी घेतलेला निर्णय चुकीचा कसा, असा प्रश्न विचारत या रागातूनच आम्ही सर्वांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे शिवसेनेचे नाराज आमदार महेश शिंदे यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar and ncp is on target of rebellion eknath shinde group print politics news pkd

Next Story
बंडखोरांच्या प्रचाराची नेपथ्य रचना ठाण्यातून, एकनाथ शिंदे आणि समर्थकांची भूमिका मांडण्यासाठी यंत्रणा सक्रीय
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी