मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सरकारला नाकेनऊ आणणारे मनोज जरांगे पाटील यांना आता ओबीसी समाजाचे नेते व अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी थेट आव्हान दिल्याने यापुढील काळात भुजबळ विरुद्ध जरांगे असा सामना होण्याची चिन्हे आहेत. भुजबळांच्या नव्या भूमिकेमुळे भाजप नेत्यांना साहजिकच आनंद झाला असणार हे मात्र निश्चित.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मान्य करीत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करणे किंवा त्यांच्यावर जरांगे यांच्याकडून करण्यात येणाऱ्या टीकेमुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या जरांगे यांच्यासमोर मुख्यमंत्री शिंदे शरण जात असल्याने भाजप नेते खासगीत नाराजी व्यक्त करू लागले आहेत. जरांगे हे नेहमीच मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक करतात.

हेही वाचा : शिंदे सरकारच्या निर्णयाने ओबीसी समाजात अस्वस्थता ?

जरांगे यांच्या कलाने मराठा आरक्षणाचा सरकारचा कारभार सुरू झाल्याने ओबीसी समाजात अस्वस्थता होती. नेमके यावर छगन भुजबळ यांनी बोट ठेवले. मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देणे म्हणजे मागील दाराने ओबीसींमध्ये प्रवेश देण्यासारखे आहे, हे भुजबळ यांचे वक्तव्य बरेच बोलके आहे. बीड दौऱ्यात भुजबळांनी स्वपक्षीय सरकारलाच घरचा आहेर दिला. ओबीसींचे नेते म्हणून भुजबळ यांनी स्वत:चे नेतृत्व अधिक भक्कम करण्याचा यातून प्रयत्न केला आहे. जरांगे पाटील यांच्यासमोर सरकार नमते घेत असताना त्यांच्यावर भुजबळांनी थेट हल्ला चढविल्याने भविष्यात भुजबळ विरुद्द जरांगे पाटील यांच्यात वाकयुद्द वाढण्याची चिन्हे आहेत. कारण भुजबळांनी जरांगे पाटील यांना लक्ष्य केल्यावर त्यांनीही लगेचच प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा : खासदार धैर्यशील माने यांना अडचणीत आणण्याची खेळी ?

मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली होती. त्यानुसार गंभीर स्वरुपाचे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन शिंदे सरकारने दिले आहे. पण त्यालाही भुजबळांनी सक्त विरोध दर्शविला. जरांगे पाटील यांच्या प्रत्येक मागणी किंवा कृतीला भुजबळ यांनी आक्षेप घेतला आहे.

हेही वाचा : ‘मोदींनी जिथे प्रचार केला, तिथे भाजपाचा पराभव झाला’, पंतप्रधान मोदींच्या विधानावर सिद्धरामय्यांचा पलटवार

ओबीसींच्या मागण्यांवर भुजबळांनी घेतलेल्या आक्रम भूमिकेला भाजपच्या नेतृत्वाचा साहजिकच पाठिंबा मिळेल. कारण भाजपला जरांगे पाटील यांना मोठे होऊ द्यायचे नाही. तसेच ओबीसी ही हक्काची मतपेढीही भाजपला अधिक आवश्यक आहे. पण जरांगे पाटील यांच्याबाबत कोणी अवाक्षर काढण्यास तयार नसताना भुजबळांनी थेट जरांगे पाटील यांना आव्हान दिले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clashes between chhagan bhujbal and manoj jarange patil will increase in upcoming time on the issue of obc and maratha reservation print politics news css