लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघावर दावा करूनही मतदारसंघ मिळाला नसल्याने नाराज झालेल्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अखेर महिनाभरानंतर सक्रियपणे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा प्रचार सुरू केला आहे. भाजपने नमो संवाद सभा सुरू केल्या आहेत, तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी माजी नगरसेवकांची बैठक घेत बारणे यांच्या प्रचाराला सुरुवात केली.

मावळ लोकसभा मतदारसंघावर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला होता. मावळमध्ये १५ वर्षांपासून कमळ चिन्ह नाही. त्यामुळे कमळावर लढणारा उमेदवार देण्याची मागणी भाजपने केली होती. भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, तर राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. परंतु, मावळ मतदारसंघ महायुतीत शिवसेनेकडेच राहिला. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची २८ मार्च रोजी उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा झाला. पण, प्रत्यक्षात भाजप, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बारणे यांच्या प्रचाराला सुरुवात केली नव्हती. अखेरीस दोन दिवसांपूर्वी भाजपने प्रचाराला सुरुवात केली. नमो संवाद सभा घेतल्या जात आहेत. शंभरहून अधिक नमो संवाद सभा घेण्याचे नियोजन असल्याचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी सांगितले.

आणखी वाचा-“पाणी वाटपासाठी महिलांना पैसे दिले” म्हणणाऱ्या रवी राणांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “एवढा खर्च केला असेल, तर…”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची शुक्रवारी (२६ एप्रिल) रावेत येथे बैठक झाली. अजित पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बारणे यांच्या विजयासाठी जिवाचे रान करतील. पवारांची ताकत वाढली, तरच आपली ताकत वाढणार आहे. त्यामुळे विरोधकांकडून सुरू असलेल्या वेगळ्या प्रचाराला उत्तर द्या आणि फक्त धनुष्यबाणाचेच काम करा. अजित पवार, पार्थ पवार दोघेही सातत्याने मावळ मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. खासदार बारणे हे जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येतील यासाठी प्रयत्न करणे, हाच महायुतीचा धर्म असल्याचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले.

‘भविष्याची काळजी घ्या’

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विजयी होणाऱ्या उमेदवाराचेच काम करून स्वतःच्या राजकीय भविष्याची काळजी घ्यावी. मावळातील प्रत्येक घडामोडीवर अजित पवार आणि पार्थ पवार यांचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा एखादा कार्यकर्ता वेगळा विचार करीत असेल, तर त्याने फेरविचार करावा. विजयी होणाऱ्या उमेदवाराची साथ देणे कधीही फायद्याचे ठरते. त्यामुळे विजयी होणाऱ्या उमेदवाराचे काम करण्यास प्राधान्य द्या. विरोधी उमेदवाराने नुसतीच टीका करण्याऐवजी केलेली विकास कामे दाखवावीत, असे श्रीरंग बारणे यांनी सांगितले.