लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेली गोळीबाराची घटना निंदनीय आहे. पण, या घटनेवरून बोध घेऊन, ठाणे जिल्ह्यातील शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील पक्षातील असलेला अंतर्गत तणाव, संघर्ष, धुसफुस दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा, असे मत राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेली गोळीबाराची घटना निंदनीय आहे. पण ठाणे जिल्ह्यात खासकरुन शिवसेना आणि भाजप यांच्यात अंतर्गत धुसफुस असल्याचे या घटनेने उघड केले आहे. ठाण्यातही भाजप आमदार संजय केळकर आणि शिवसेना नेते यांच्यात सतत अंतर्गत तणावाचे दर्शन घडत असते. तर हाच प्रकार मिरा-भाईंदर, नवीमुंबई, कल्याण, उल्हासनगर याठिकाणी भाजप आणि शिवसेनेत अंतर्गत संघर्ष वारंवार दिसून आलेला आहे.

आणखी वाचा-कल्याण : गोळीबार घटनेमुळे हिललाईन पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची चौकशी?

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील तीनही जागा जिंकणे महत्वाचे आहे. अशावळी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील घटक पक्षातील मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन महायुतीतील पक्षांतील तणाव, संघर्ष, धुसफुस दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे मत आनंद परांजपे यांनी व्यक्त केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde should take the initiative and stop the conflict in mahayuti says anand paranjape mrj