शिवसेनेच्या ठाणे जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आलेले माजी महापौर नरेश म्हस्के यांनी नौपाडा भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणारे एक फलक लावले आहे. या फलकावर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही छायाचित्र आहे. ठाणे शहरात एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र फलकावर लावणे टाळल्याचे शहरात दिसून येते. परंतु म्हस्के यांनी फलकावर छायाचित्र लावल्याने शहरात विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष म्हणजे या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आनंद दिघे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसहीत देवेंद्र फडणवीसांचाही फोटो दिसत आहे. या बॅनरवर ‘गर्जत राहील आवाज’ असं लिहिण्यात आलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ठाणे जिल्ह्यात शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आहे. माजी महापौर नरेश म्हस्के यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ समाजमाध्यमावर एक मजकूर प्रसारित केला होता. त्यानंतर त्यांनी ठाणे जिल्हाप्रमुख पदावरून राजीनामा दिला होता. मल्हार सिनेमाजवळच्या उड्डाण पुलावरील हे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे.

मला पक्षाच्या पदावरून हटविण्यात आले असले तरी मी आजही शिवसैनिक आहे. त्यामुळे मी पक्षप्रमुखांचा फोटो फलकावर लावला आहे, असं नरेश म्हस्के यांनी सांगितलं.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane ex mayor put congratulations banner with photo of modi shah uddhav balasaheb eknath shinde and fadanvis scsg
First published on: 02-07-2022 at 15:01 IST