कल्याण जिल्हाप्रमुख पदी डोंबिवलीचे ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांचे नाव आघाडीवर | The name of senior Shiv Sainik Sadanand Tharwal of Dombivali is in the forefront for the post of Kalyan District Chief msr 87 | Loksatta

कल्याण जिल्हाप्रमुख पदी डोंबिवलीचे ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांचे नाव आघाडीवर

शिवसेनाप्रमुखांचा कडवट शिवसैनिक आणि आनंद दिघे यांच्या तालमीतील निष्कलंक, निष्ठावान अशी थरवळ यांची ओळख

कल्याण जिल्हाप्रमुख पदी डोंबिवलीचे ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांचे नाव आघाडीवर
(संग्रहीत छायाचित्र)

कल्याण जिल्हाप्रमुख पदाचा गोपाळ लांडगे यांनी राजीनामा देऊन शिंदे गटात सामील झाल्याने, रिक्त झालेल्या कल्याण जिल्हाप्रमुख पदासाठी डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिक आणि ‘मातोश्री’च्या खास विश्वासातील सदानंद थरवळ यांचे नाव आघाडीवर आहे. डोंबिवली, कल्याण ग्रामीण भागातील अनेक शिवसैनिकांनी थरवळ यांच्या नावाला पसंती दिल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता शिवसेनेतील एका वरिष्ठ सुत्राने व्यक्त केली.

ठाणे जिल्ह्यामध्ये आनंद दिघे यांचे खास विश्वासू दूत –

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर अनेक शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तर कधी शिंदे गटाच्या भेटी घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला. डोंबिवलीतील निष्ठावान गटातील सदानंद थरवळ, प्रभाकर चौधरी, तात्यासाहेब माने, अजित नाडकर्णी, चंद्रशेखर कुलकर्णी, भय्यासाहेब पाटील यांसह इतर अनेक निष्ठावान शिवसैनिकांनी व्दिधा मनस्थितीत न जाता पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन आम्ही शिवसेनेतच राहणार असल्याचे जाहीर केले. निष्ठावान शिवसैनिक ही आपली ताकद असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कल्याण जिल्हाप्रमुख पदासाठी निष्ठावान गटातील डोंबिवलीतील थरवळ यांच्या नावाचा विचार मातोश्रीवर सुरू असल्याचे कळते. शिवसेनाप्रमुखांचा कडवट शिवसैनिक आणि आनंद दिघे यांच्या तालमीतील निष्कलंक, निष्ठावान अशी थरवळ यांची ओळख आहे. ते ४२ वर्ष शिवसेनेत आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये आनंद दिघे यांचे खास विश्वासू दूत होते. अशाच दूतांमधील दिघे यांची डोंबिवलीतील जोडगोळी म्हणजे सदानंद थरवळ, दिवंगत नितीन मटंगे होते. महत्वाची बैठक, पालिका निवडणुका, पालिका पदाधिकारी निवडणुकांमध्ये दिघे या दोघांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेत होते.

बालभवन प्रकल्प मार्गी लावण्यात सिंहाचा वाटा –

थरवळ हे पालिकेत नगरसेवक होते. स्थायी समिती सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. डोंबिवली उपजिल्हाप्रमुख म्हणून ते काम पाहत आहेत. डोंबिवलीत शिवसेनाप्रमुखांच्या स्वप्नातील रामनगर मधील बालभवन प्रकल्प मार्गी लावण्यात थरवळ यांचा सिंहाचा वाटा आहे. दोन वेळा ते डोंबिवली शहराचे शहरप्रमुख होते. या कालावधीत थरवळ यांनी शिवसेनेतर्फे लोकहिताचे अनेक उपक्रम राबविले.

अनेक निष्ठावान या पदासाठी इच्छुक –

थरवळ यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि डोंबिवलीकर असलेल्या रश्मी ठाकरे यांच्या बरोबर घरोब्याचे संबंध आहेत. येत्या काळात शिवसेनेला या भागात मजबूत करण्यासाठी निष्ठावान शिवसैनिकांची फळी उपयोगी येणार असल्याने या फळीतील एक हरहुन्नरी शिवसैनिक म्हणून थरवळ यांचे नाव जिल्हाप्रमुख पदासाठी मातोश्रीकडून निश्चित करण्याच्या हालचाली सुरू आहेत, असे एका विश्वसनीय सुत्राने सांगितले. अनेक निष्ठावान या पदासाठी इच्छुक असले तरी बहुतांशी मंडळींनी साठी पार केली असल्याने त्यांच्या नावाचा विचार कितपत होईल याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.

कल्याण लोकसभा हद्दीतील कळवा, मुंब्रा, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, कल्याण पूर्व, अंबरनाथ असे सहा विधानसभा मतदारसंघ विचारात घेऊन शिवसेनेचा नवीन कल्याण जिल्हाप्रमुख नियुक्त केला जाणार असल्याचे सुत्राने सांगितले.

शिवसेनेचा प्रभाव वाढविण्यासाठी प्रयत्न करीन –

“४२ वर्ष शिवसेनेत काम करतो. शिवसेनाप्रमुख, आनंद दिघे यांचा निष्ठावान शिवसैनिक म्हणून आतापर्यंत महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यामुळे जिल्हाप्रमुख पदासाठी आपला विचार होत असेल, तर नक्कीच या पदाला न्याय देऊन या भागातील शिवसेनेचा प्रभाव वाढविण्यासाठी प्रयत्न करीन.” अशी प्रतिक्रिया शिवसेना उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-07-2022 at 14:03 IST
Next Story
विजेच्या धक्क्याने एका व्यक्तीसह तीन म्हशींचा मृत्यू; बदलापुरजवळची घटना, महावितरणाच्या ढिसाळ कारभाराचा फटका