नदी ओलांडताना काळजी घ्या असे अनेकदा सांगितले जाते. विशेषत: पावसाळ्यात नदी ओलांडणे थोडे भीतीदायक काम असते, कारण अनेक प्राणी नदीच्या प्रवाहाबरोबर वाहत येत असतात. अशावेळी नदीतील खडकाळ ठिकाणी पाय ठेवून नदी ओलांडण्याचा प्रयत्न केला जातो. अशाचप्रकारे एक तरुणही खडकाळ ठिकाणी पाय ठेवून नदी ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, दगड समजून त्याने चक्क एका प्राण्यावर पाय ठेवला, ज्यानंतर त्याच्याबरोबर जे घडलं ते फारच भयानक होतं. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये एक व्यक्ती धोकादायक नदी ओलांडत असताना त्याचा पाय एका जलचरावर पडतो. यानंतर त्याच्या पायाला तो जलचर अशाप्रकारे दुखापत करतो, जे पाहून कोणालाही धक्का बसेल.

व्हिडीओत पाहू शकता, एक व्यक्ती पाण्याचा अंदाज घेत एक एक पाऊल पुढे ठेवत नदी ओलांडत असतो. यावेळी अचानक त्याचा पाय नदीतील एका धोकादायक प्राण्यावर पडतो. तो दगड समजून त्या प्राण्यावर पाय ठेवून उभा राहण्याचा प्रयत्न करतो. काही वेळाने पायाने तो नेमका दगड आहे की दुसरं काही याचा अंदाज घेतो असतो. पण, तो दगड नव्हता तर नदीतील धोकादायक मासा स्टिंग्रे होता. ज्यावर तो व्यक्ती पाय ठेवत होता.

हा स्टिंग्रे मासा झटकन आपल्या शेपटीने व्यक्तीच्या पायाला दुखापत करतो की, ज्यामुळे व्यक्ती धाडकन नदीत कोसळतो आणि वेदनांनी कळवळत रडू लागतो.

स्टिंग्रे मासा अतिशय धोकादायक असून तो आपल्या दातांनी कोणत्याही व्यक्तीचा जीव घेऊ शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती चुकूनही या माश्यावर पाय ठेवते, तेव्हा हा मासा कोणतीही हालचाल करत नाही; पण नंतर आपली शेपटी वळवून तो त्या व्यक्तीला त्याने किती धोकादायक ठिकाणी पाय ठेवला याची जाणीव करून देतो.

अशाचप्रकारे त्या व्यक्तीने स्टिंग्रे माश्यावर पाय ठेवला, ज्यानंतर काही वेळाने त्या माश्याने शेपटीने हल्ला करून त्या व्यक्तीला जखमी केले, यानंतर ती व्यक्ती घाबरून जोरात किंचाळते आणि थेट उडून नदीत कोसळते, हा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा धक्कादायक व्हिडीओ @TheWorldOfFunny नावाच्या एक्स अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, अरे, हा स्टिंग्रे फिश आहे, ज्याने २००६ मध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रसिद्ध टीव्ही पर्सनॅलिटी आणि पर्यावरणवादी स्टीव्ह इर्विन यांची हत्या केली होती. दुसऱ्या युजरने लिहिले की, एखाद्या व्यक्तीला माहीत असले पाहिजे की तो जिथे पाऊल टाकणार आहे तिथे कोणता धोका असू शकतो. तर तिसऱ्या युजरने लिहिले की हे देखील ठीक आहे, किमान आता तो अशा गोष्टी करणार नाही.