नीरज राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्णबधिर कन्येच्या भवितव्याच्या चिंतेतून एका पालकाने स्वत: पुढाकार घेऊन पालघरमध्ये तीन दशकांपूर्वी कर्णबधिर शाळेची मुहूर्तमेढ रोवली. आज पालघरबरोबरच डहाणू, वाडा आणि वसई तालुक्यांतील कर्णबधिर मुलांचा शिक्षण मार्ग या संस्थेने सुकर केला आहे.

गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हणतात़  पण, ती निर्मितीचीही प्रेरणा ठरते, याचा प्रत्यय पालघरमध्ये आला. आपल्या कर्णबधिर कन्येला स्वावलंबी आणि सक्षम कसे बनवायचे, या एका चिंताग्रस्त पालकाला सतावलेल्या प्रश्नातून एका कर्णबधिरांसाठीच्या शाळेचा जन्म झाला़  प्रतीक सेवा मंडळातर्फे पालघर येथे हे विद्यालय चालवले जात़े. गेल्या ३२ वर्षांपासून पालघर, डहाणू, वाडा आणि वसई तालुक्यांतील कर्णबधिर विद्यार्थ्यांचा शिक्षणमार्ग या संस्थेने सुकर केला आहे. हे त्यावेळचे चिंताग्रस्त पालक म्हणजे संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष सुरेश भट. १९८५ च्या सुमारास जव्हार येथील कर्णबधिर शाळेत त्यांच्या मुलीचे शिक्षण सुरू झाले. मात्र, पालघरमध्ये अशी शाळा सुरू करण्याचा निर्धार त्यांनी केला. पालघर येथे डॉ. जी. जी. जोशी यांचा बंद अवस्थेतील बंगला शाळेच्या वापरासाठी देण्यास त्यांच्या नातलगांनी परवानगी दिल्यानंतर अ‍ॅड. जी. डी. तिवारी, सुरेश भट, अशोक तळवळकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रतीक सेवा मंडळाची स्थापना करून हा निर्धार प्रत्यक्षात आणला.

हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : आशादायी भूतदया

 संस्थेचे पदाधिकारी, सदस्य तसेच नव्याने नेमलेल्या काही शिक्षकांनी पालघर तालुक्यातील सातपाटी, शिरगाव, माहीम, केळवे, मुरबा आदी भागांत दौरे करून घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटीद्वारे कर्णबधिर मुलांची माहिती संकलित केली. २ जुलै १९९० रोजी १५ कर्णबधिर मुलांचे शिक्षण पालघर येथे सुरू झाले. सुरुवातीला या विद्यार्थ्यांच्या भोजनाची सोय करणे कठीण होते. त्यावेळी पालघरमधील काही दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला. कर्णबधिर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे, ही समस्याही पुढे निर्माण झाली. त्यावेळी संस्थेला प्रमिला कोकड, लता उदावंत, देवका मराठे आदी शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. लता उदावंत या पहिल्या प्रशिक्षित विशेष शिक्षिका शाळेला लाभल्या आणि अध्यापनाची गाडी रुळावर आली. शिपाई नसल्याने अनेकदा शिक्षक आणि संस्थेचे पदाधिकारी हे आवाराची स्वच्छता राखत. नंतर देऊ अवतार आणि त्यांच्या पत्नी हिरा हे अनुक्रमे शिपाई आणि स्वयंपाकीण म्हणून विनामानधन सेवेत रुजू झाले. मुलींसाठी काळजीवाहक म्हणून गिरिजा गावित यांनीही सेवाभावी वृत्तीने वसतिगृहातील मुलींची जबाबदारी स्वीकारली.  विद्यार्थ्यांच्या प्रगतीत कसलाच अडसर येऊ नये, याची खबरदारी सर्व जण घेत होते.

सन १९९५ मध्ये केंद्र सरकारने या विद्यालयाला मान्यता दिली. मात्र, विद्यालय सुरू असलेली वास्तू मालकाला परत हवी होती. त्यामुळे ही शाळा प्रथम पालघरच्या साईनगरमध्ये आणि नंतर गिरीशनगर येथील भाडय़ाच्या जागेत स्थलांतरित करण्यात आली. यादरम्यान संस्थेला विविध अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर शाळा पूर्वेकडील बाफना कंपाऊंडमध्ये स्थलांतरित करण्यात आली.

हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : कर्करुग्णांच्या वेदनेवर मायेची फुंकर

पालघर येथील तत्कालीन विकासक विठ्ठलभाई शापरीया यांनी नवीन वास्तूसाठी सुमारे साडेचार गुंठे जागा दिल्याने लोकमान्य नगर येथे ऑक्टोबर १९९८ मध्ये १५०० चौरस मीटर क्षेत्रफळावर संस्थेच्या विद्यालयाची वास्तू उभी राहिली. या शाळेचे जमनाबेन विठ्ठलभाई शापरीया कर्णबधिर विद्यालय असे नामाकरण करण्यात आले. या शाळेत चार वर्ग, मोठा हॉल, तसेच मुलींसाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था करण्यात आली. दरम्यानच्या काळात विद्यार्थी संख्या आणि शिक्षकांची संख्याही वाढत गेली. २००२ पासून विद्यालयाला ५० विद्यार्थी शिकवण्याची मान्यता आणि राज्य शासकीय अनुदान मंजूर झाले. त्यावेळी शासनाच्या नियमानुसार शाळेच्या इमारतीची आणि वर्गरचनेची व्यवस्था असणे गरजेचे होते. अशा वेळी रायचंद प्रेमचंद शहा यांनी मदतीचा हात देत आणि तळमजल्यातील वर्गखोल्या व इमारतीचे आवश्यकतेनुसार नूतनीकरण करून दिले. 

पुढील काही महिन्यांत विद्यार्थी संख्या वाढू लागल्याने जागा अपुरी पडू लागली. वाढीव विद्यार्थ्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तारापूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रा. ही. सावे यांनी २००५ मध्ये संस्थेला पाच लाख, ५५ हजार, ५५५ रुपयांची देणगी दिली़  त्यातून संस्थेने पहिल्या मजल्यावर विस्तार करण्याची योजना तयार केली. पुढच्याच वर्षी ‘सुहासिनी रामचंद्र सावे कर्णबधिरांचे वसतिगृह’ सुरू झाले. त्यावेळी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या अधिक होती. 

या विद्यालयात आजही बालवर्ग ते सातवीपर्यंत विनामूल्य शिक्षण दिले जाते. आतापर्यंत सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी या विद्यालयाचा लाभ घेतला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी चित्रकला, नाटय़कला, नृत्य आदी स्थानिक व जिल्हा पातळीवरील स्पर्धामध्ये  नेत्रदीपक कामगिरी केली. अनेक विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये भाग घेऊन अनेक बक्षिसे पटकावली आहेत. क्रीडा स्पर्धामध्ये यश मिळवण्यामागे आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक स्नेहल राजपूत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्या रोज संध्याकाळी आर्यन ग्राउंडवर विद्यार्थ्यांचा सराव घेऊन विनामूल्य प्रशिक्षण देतात.

शाळेत पाठय़क्रमाबरोबर विद्यार्थ्यांना शिवणकाम, हस्तकला, बुक- बाईंडिंग आदींचे प्रशिक्षण दिले जाते. संगणकाचे पायाभूत शिक्षण देण्यात येते.  केंद्र शासनाच्या व्यवसाय पुनर्वसन केंद्र, मुंबई यांच्यामार्फत फिनाईल बनवणे, फाईल तयार करणे आणि इतर व्यावसायिक प्रशिक्षणाची शिबिरे आयोजित केली जातात. विद्यालयात आषाढी एकादशी, गोपाळकाला, दिवाळी, शैक्षणिक सहल, स्थळभेट यांच्यासह विविध कला आणि सांस्कृतिक उपक्रम नियमितपणे राबवले जातात. या सर्व उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभतो. या विद्यार्थ्यांना आयटीआय केंद्रामध्ये किंवा इतर ठिकाणी व्यावसायिक शिक्षणाची जोड देण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रशिक्षणाचा लाभ घेत अनेक माजी विद्यार्थी पुढील शिक्षण घेऊन, विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत.

सध्या या विद्यालयात विनामूल्य शीघ्र निदान आणि मार्गदर्शन, दहावीच्या परीक्षेसाठी अध्यापन व मार्गदर्शन, स्पीच थेरपीची सुविधा आहे. ऑडिओमीटरद्वारे श्रवण चाचणी करून योग्य श्रवण यंत्र देणे, वाचा दुरुस्तीसाठी स्पीच ट्रेनरचा वापर, भाषेसाठी व्हिडीओ व गोष्टींची पुस्तके, आधुनिक पद्धतीचा व तंत्राचा वापर करून स्पीच थेरपी रूममध्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिकवले जाते. विद्यार्थ्यांची वाचा (शब्दोच्चार) दुरुस्ती व भाषा कौशल्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून प्रत्येक वर्गात डिजिटल शिक्षणाची सोय आहे. विद्यालयात स्वतंत्र संगणक कक्ष आहे. कर्णबधिर मुला- मुलींसाठी स्वतंत्र व मोफत वसतिगृह उपलब्ध आहे. विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांला स्वत:चे साहित्य ठेवण्यासाठी लॉकर आहेत़. वसतिगृह आणि शाळेसाठी स्वतंत्र कर्मचारी कार्यरत आहेत. सध्या शाळेमध्ये मुख्याध्यापक, वसतिगृह अधीक्षक, वाचा उपचारतज्ज्ञ, पाच विशेष शिक्षक, दोन कला शिक्षक, क्लार्क, शिपाई, दोन स्वयंपाकीण, तीन काळजीवाहक कार्यरत आहेत.

संस्थेच्या आरंभीच्या काळात पालघर आणि लगतच्या तालुक्यांमध्ये दळणवळणाची सुविधा उपलब्ध नसल्याने कर्णबधिर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मर्यादा होत्या. आता प्रतीक सेवा मंडळाने त्यांच्यासाठी शिक्षणाचे दालन खुले केले आहे. शहरी भागात कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध असतात. मात्र, पालघरच्या कर्णबधिर शाळेने सर्व सुविधांद्वारे ग्रामीण भागातील अशा विशेष विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ दिले आहे.

प्रतीक सेवा मंडळ, पालघर

Pratik Seva Mandal,Palghar

संस्थेपर्यंत कसे जाल?

रेल्वे किंवा मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून पालघर येथे पोहोचल्यानंतर पालघर पंचायत समिती कार्यालयाकडून दक्षिणेकडे सुमारे एक किलोमीटर अंतरावर कर्णबधिर विद्यालय आहे. पालघर रेल्वे स्थानकापासून सुमारे दोन किलोमीटरच्या अंतरावर शाळा आहे.

या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा. संस्था ‘८०-जी’ करसवलतपात्र आहे.

ऑनलाइन देणगीसाठी

खाते क्र. 1160501030366

(कॉसमॉस बॅंक – वसई शाखा)

आयएफएससी कोड : COSB0000116

धनादेश येथे पाठवा.. : एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय  

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-६९१८९९२५

ठाणे कार्यालय    

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय      

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, शिवाजीनगर, पुणे- ४११००४.  ०२०-६७२४११२५

नागपूर कार्यालय       

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ झ्र् २२३०४२१

दिल्ली कार्यालय       

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००

More Stories onएनजीओNGO
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarva karyeshu sarvada 2022 pratik seva mandal palghar zws
First published on: 09-09-2022 at 02:11 IST