*  गाळाच्या थरात १०० मिलिमीटरने घट
*  ५० वर्षांत १३ टक्क्य़ांनी उंची घटली
*  वातावरणीय बदल रोखण्याचे आव्हान
जगातील सर्वात उत्तुंग शिखर म्हणून प्रसिद्ध असलेल्या एव्हरेस्टवरील बर्फ वितळण्याच्या वेगात वाढ होऊ लागली आहे. हिमशिखरे वितळण्याच्या वेगाने धोक्याची पातळी गाठली असून गेल्या ५० वर्षांत शिखरांची उंची तब्बल १३ टक्क्य़ांनी घटली असल्याचे एका अभ्यासात पुढे आले आहे.
माऊंट एव्हरेस्टवरील हिम आच्छादनाचा अभ्यास मिलान विद्यापीठातील काही शास्त्रज्ञ करीत आहेत. या शिखराच्या तपमानातील बदल, त्यावरील बर्फाच्या थराची जाडी आदी घटकांवर जागतिक तपमान वाढीचा नेमका काय परिणाम होतो हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.
या अनुषंगाने संशोधन करतेवेळी काही
धक्कादायक बाबी पुढे आल्या.  बर्फाच्छादित प्रदेशातील शिखरांवर जमा होणाऱ्या हिमाच्या तुलनेत हिम वितळण्याचा वेग अधिक असल्यामुळे आता या शिखरांवरील खडकाळ भाग दर्शनी स्वरूपात आढळू लागला आहे, अशी माहिती सुदीप ठाकुरी या मिलान विद्यापीठातील संशोधकांनी दिली. या शिखरांवर बर्फाखाली लपलेले मातीचे-भग्नावशेषांचे ढिगारे हिम वितळण्याच्या प्रक्रियेमुळे स्पष्ट दिसू लागले आहेत, असा शास्त्रज्ञांच्या चमूचा दावा आहे. अमेरिकेच्या ‘जिओफिजिकल युनियन’ने आयोजित केलेल्या विज्ञान परिषदेत हे निष्कर्ष सादर करण्यात आले आहेत.
नेमकी सुरुवात कधीपासून?
संशोधकांच्या मते १९९० नंतर हिम वितळण्याचा वेग वाढू लागला. मानवनिर्मित हरित गृह वायू आणि त्यामुळे होणारे वातावरणीय बदल यांचा एव्हरेस्ट शिखरावर तसेच जवळच्या परिसरावर परिणाम झाला. मात्र अशा स्वरूपाची निरीक्षणे आढळली असली तरीही पर्वतीय बदल आणि वातावरणीय बदल यांच्यातील नाते असूनही पुरेसे उलगडलेले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आधार कोणते?
ठाकुरी यांच्या चमूने माऊंट एव्हरेस्ट आणि सुमारे ११४८ चौरस किलोमीटरवर पसरलेले सागरमाथा राष्ट्रीय उद्यान यांच्या उपग्रहांनी घेतलेल्या प्रतिमांचा अभ्यास केला. तसेच या परिसराचे भूपृष्ठ संरचनेविषयक नकाशे आणि हिम शिखरांच्या इतिहासाचाही त्यांनी संदर्भ म्हणून केला.

काय आढळले?
एव्हरेस्टच्या सरासरी तपमानात ०.६ अंशांनी वाढ झाली आहे. मान्सूनपूर्व आणि हिवाळ्यात या शिखरावर साचणाऱ्या गाळाच्या थरांमध्ये १०० मिलिमीटरने घट झाली आहे. परिसरातील एक चौरस किलोमीटरपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या शिखरांच्या पृष्ठफळात १९६० च्या तुलनेत ४३ टक्क्य़ांनी घट झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attention everest melting speedly