हल्ली अगदी ५-६ वर्षांची चिमुकली मुलंही रिअॅलिटी शोजमधून आपल्या गयन कौशल्याची चुणूक दाखवताना दिसतात. इतक्या लहान वयात सूर-ताल-लयीच अगदी चपखलपणे गाणारे चमत्कारही या रिअॅलिटी शोजमधूनच जगासमोर येत आहेत. त्यामुळे पार्श्वगायनाची कला अंगी असणारे कलाकार मोठ्या संख्येनं आज घराघरात चित्रपटसृष्टीतील पदार्पणाच्या प्रतिक्षेत असल्याची असंख्य उदाहरणं आहेत. पण एक काळ असा होता, जेव्हा पार्श्वगायन हा प्रकारच अस्तित्वात नव्हता! आणि हा काळ होता आजपासून जवळपास ८५ वर्षांपूर्वीचा! मग जर पार्श्वगायन अस्तित्वात नव्हतं, तर मग काय होत होतं माहितीये?
कलाकारच गायचे गाणी!
१९३५चं साल उजाडेपर्यंत चित्रपटात काम करणारे कलाकारच चित्रपटातली त्यांच्यावर चित्रीत होणारी गाणी गायचे! चित्रीकरण चालू असतानाच ही गाणी गायलीही जायची आणि त्यासाठी लागणारं संगीतही वाजवलं जायचं. अनेकदा तर हे संगीत देणारे तबलजी किंवा संतूरवादक किंवा सनईवादक सेटवरच कुठल्यातरी झाडामागे किंवा सेटच्या मागे लपून संगीत देत असत. तसं सगळेच कलाकार उत्तम गात नसत. पण काही कलाकार त्यांच्या अभिनयापेक्षाही गायकीमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले. यातली सर्वात मोठी दोन नावं म्हणजे के. एल. सेहगल आणि नूरजहाँ.
त्या काळात आपल्या दिग्दर्शनाची छाप चाहत्यांवर उमटवणारं एक दिग्गद नाव म्हणजे नितीन बोस. चित्रपट निर्मितीमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्यांमध्ये नितीन बोस यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जात असे. नितीन बोस यांनीच भारतात पार्श्वगायनाला पहिला ‘ब्रेक’ दिला आणि पुढच्या ८ दशकांमध्ये हे क्षेत्र अफाट वेगानं फोफावलं!
Golden Ticket: BCCI नं रजनीकांत, सचिन तेंडुलकर, बिग बींना दिलेलं ‘गोल्डन तिकीट’ नेमकं आहे तरी काय?
पार्श्वगायनासाठी ऐतिहासिक १९३५ साल!
१९३५ साली नितीन बोस यांनी त्यांच्या ‘धूप-छाँव’ या चित्रपटासाठी पहिल्यांदा पार्श्वगायन करून घेतलं आणि एका नव्या क्षेत्राचा जन्म झाला! याचा किस्साही मोठा रंजक आहे पिनाकी चक्रवर्ती यांनी यासंदर्भातला किस्सा सांगितला आहे. “एकदा शूटिंग चालू असताना नितीन बोस पंकज मलिक यांच्याकडे गेले तेव्हा पंकज मलिक चित्रपटाचं गाणं गुणगुणत होते. त्याचवेळी ते गाणं रेकॉर्डवर चालू होतं. झालं..नितीन बोस यांच्या डोक्यात एका भन्नाट कल्पनेनं जन्म घेतला नितीन बोस यांनी लागलीच त्यांची रेकॉर्ड घेऊन पंकज मलिक यांना स्टुडिओत बोलवलं. रायचंद मलिक यांनाही बोलवलं. एकाचवेळी गाणं आणि संगीत रेकॉर्ड करण्याची कल्पना त्यांना ऐकवली. बोराल यांनी होकार दिला आणि भारतातलं पहिलं पार्श्वगायन प्रत्यक्षात उतरलं!”
लता मंगेशकर…पार्श्वगायनाच्या स्टार!
नूरजहाँ यांच्या गायकीचे तेव्हाही लाखो चाहते होते. पण १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर नूरजहाँ पाकिस्तानात गेल्या. त्यांनी भारत सोडल्यामुळे निर्माण झालेल्या पोकळीमध्ये लता मंगेशकर हे नाव फक्त चपखलच नाही, तर ती संपूर्ण पोकळी व्यापून बसलं! तसं तर लता मंगेशकर यांनी पहिलं गाणं १९४६ साली ‘जीवन यात्रा’ चित्रपटासाठी रेकॉर्ड केलं. पण १९४९ साली दिग्दर्शक कमल अमरोही यांच्या ‘महल’ चित्रपटातून २० वर्षांच्या लता मंगेशकर यांचं खऱ्या अर्थाने प्रचंड लोकप्रियतेच्या लाटांवर लाँचिंग झालं. त्यानंतर लता मंगेशकर यांनी पार्श्वगायनाच्या क्षेत्रात कधीच मागे वळून पाहिलं नाही.
मुस्लीमबहुल देशाच्या चलनी नोटांवर आहे गणपती बाप्पाचा फोटो; जाणून घ्या रंजक कथा
महल चित्रपटाचा ‘तो’ किस्सा आणि लता दीदींचं नाव!
महल चित्रपटात लता मंगेशकर यांनी आयेगा आनेवाला गाणं गायलं. पण रेकॉर्डवर त्यांचं नावच देण्यात आलं नव्हतं. त्याऐवजी चित्रपटाच कामिनीची प्रमुख व्यक्तीरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री मधुबाला यांचं नाव तिथे देण्यात आलं होतं. तेव्हा असंख्य चित्रपटप्रेमींनी ऑल इंडिया रेडिओच्या कार्यालयात पत्रव्यवहार करून मूळ गायकाचं नाव जाहीर करण्याची मागणी केली. खुद्द लता मंगेशकर यांनीही तेव्हा आपलं नाव दिलं जावं, यासाठी पाठपुरावा केल्याचं सांगितलं जातं. हिंदुस्तान टाईम्सनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. ही चूक दुरुस्त करत चित्रपटाच्या दुसऱ्या रेकॉर्डिंगमध्ये लता मंगेशकर यांचं नाव पार्श्वगायक म्हणून झळकलं! अमेरिकन म्युझिक प्रोफेसर जेसन बीस्टर-जोन्स यांनी २०१५ साली प्रकाशित केलेल्या आपल्या बॉलिवुड साऊंड्स या पुस्तकात इतिहास अभ्यासक रचेल ड्वायर यांच्या दाखल्याने ही बाब नमूद केली आहे.
मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How does playback singing started in india dhoop chhav by nitin bose punkaj mullik pmw