What is Golden Ticket: बीसीसीआयचे सचिव जय शाह सध्या काही सेलिब्रिटी मंडळींना ‘गोल्डन तिकीट’ देत असल्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. ही मंडळीही साधीसुधी नसून आपापल्या क्षेत्रातील नामवंत प्रथितयश मंडळी आहेत. त्यामुळे त्यांना बीसीसीआय नेमकं हे तिकीट का देत आहे? हे तिकीट नेमका काय प्रकार आहे? हा कुठला पुरस्कार आहे की खरंच हे कशाचं तिकीट आहे? अशा अनेक प्रश्नांचा सध्या सोशल मीडियावर भडिमार होऊ लागला आहे.

रजनीकांत यांना दिलं ‘गोल्डन तिकीट’!

नुकतंच BCCI चे सचिव जय शाह यांनी सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना गोल्डन तिकीट दिलं असून त्याचे फोटोही बीसीसीआयनं आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत. “चित्रपटाच्याही पलीकडील महान व्यक्तीमत्व! बीसीसीआयचे मानद सचिव जय शाह यांनी श्री रजनीकांत यांना गोल्डन तिकीट दिलं. भाषा व संस्कृतीच्याही पलीकडे जाऊन या महान अभिनेत्याने लाखो चाहत्यांच्या मनांवर अमिट छाप उमटवली आहे”, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

बीसीसीआयनं रजनीकांत यांच्याआधी गेल्या महिन्याभरात बॉलिवुडचे सुपरस्टार बिग बी अमिताभ बच्चन यांना अशाच प्रकारे गोल्डन तिकीट दिलं आहे. त्याव्यतिरिक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही हे गोल्डन तिकीट देण्यात आलं आहे.

काय आहे हे गोल्डन तिकीट?

बीसीसीआयनं केलेल्या ट्वीटमध्ये वर्ल्डकप २०२३ चा उल्लेख करण्यात आला आहे. अवघ्या महिन्याभरात क्रिकेटचा महामेळा भारतात भरणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी असताना बीसीसीआयनंही त्यासाठी कंबर कसली आहे. स्पर्धेच्या नियोजनासोबतच आपापल्या क्षेत्रात दिग्गज ठरलेल्या व्यक्तिमत्वांना स्पर्धेसाठी आमंत्रित करून या स्पर्धेचा स्तर अधिक उंचावण्याचा प्रयत्न बीसीयीआयकडून करण्यात येत आहे.

विविध क्षेत्रातील मान्यवरांना वर्ल्डकप २०२३ साठी बीसीसीआयकडून आमंत्रित केलं जात आहे. त्यासाठी हे ‘गोल्डन तिकीट’ या मान्यवरांना दिलं जात आहे. आत्तापर्यंत सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन व रजनीकांत या तिघांना हे देण्यात आलं असून या यादीत आणखीही काही नावं जोडली जाण्याची शक्यता आहे.

गोल्डन तिकीट आणि विशेष सवलती…

गोल्डन तिकीट असणारी व्यक्ती ही बीसीसीआयची विशेष आमंत्रित पाहुणी असते. स्पर्धेतील सामने बघण्यासाठी त्यांना खास आमंत्रण दिलं जातं. या व्यक्तींची बसण्याची सोय स्टेडियममधील व्हीआयपी बॉक्समध्ये केली जाते. त्यांची एखाद्या पाहुण्याप्रमाणेच स्टेडियमवर बडदास्त ठेवली जाते. या व्यक्तींनी त्यांच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाच्या प्रीत्यर्थ आदरभावना व्यक्त करण्यासाठी त्यांना हे ‘गोल्डन तिकीट’ दिलं जातं. मात्र, दुसरीकडे या सेलिब्रिटी व्यक्तींच्या उपस्थितीमुळे स्पर्धेची प्रसिद्धी साध्य करण्याचा आयोजकांचा हेतू असल्याचंही सांगितलं जातं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्थात, गोल्डन तिकीट असणाऱ्या व्यक्तीला स्पर्धेतील सर्व सामन्यांना प्रवेश असला, तरी प्रत्यक्ष काही निवडक सामन्यांना ही सेलिब्रिटी मंडळी उपस्थिती लावतात. अशा वेळी त्यांच्या उपस्थितीची बरीच चर्चाही होते. त्यामुळे यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबरोबरच सेमीफायनल, फायनल अशा महत्त्वाच्या सामन्यांमध्ये यंदाचे गोल्डन तिकीटाचे मानकरी दिसण्याची शक्यता आहे!