लोकसभा उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्रासह देशात तीन दिवसांनी लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर कोल्हापुरात तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच ७ मे रोजी मतदान होणार आहे. कोल्हापुरात भाजपा (महायुती) उमेदवार संजय मंडलिक आणि काँग्रेस उमेदवार (महाविकास आघाडी) छत्रपती शाहू महाराज दुसरे यांच्यात लढत होणार आहे. कोल्हापुरात दोन्ही उमेदवारांचा जोरदार प्रचार चालू असतानाच काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच काँग्रेस आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सतेज पाटील काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले, पुढचे १४ दिवस, मतदान होईपर्यंत आपल्याला सजग राहावं लागेल. कारण पुढचे १४ दिवस ‘रात्र वैऱ्याची आहे’ अशी स्थिती असणार आहे. आपल्याला रात्रीचा पाहारा द्यावा लागेल. सोमवारी इथे गोळीबार झाला. राज्यात आणि देशात भाजपाचं सरकार आहे, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. त्यामुळे मी आपल्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की, हा कोल्हापूरचा किल्ला आणि तटबंदी आपली आहे, त्यामुळे चारही बाजूंना चांगला पाहारा ठेवा. कोणी तुमच्या वाटेला गेलं तर हा बंटी पाटील इथं काठी घेऊन यायला तयार आहे. तुम्हाला कसलीही अडचण येऊ द्या, काहीही मदत लागली तर सांगा, प्रचार करताना कुठलीही अडचण आली तर सांगा, मी इथं उभा आहे.

कोणी एखाद्या ठिकाणी दबावाचं राजकारण करत असेल तर त्याला या चौकातून माझं सांगणं आहे, मला विरोधकांना सांगायचं आहे की तुम्ही तुमचा प्रचार करा, माझी त्याला हरकत नाही. परंतु आमचा प्रचार करणाऱ्याला आडवं जायचा प्रयत्न केलात तर तुमची गाठ बंटी पाटलाशी आहे. महायुतीचा प्रचार करणाऱ्यांना मी एकच सांगेन की, ज्यांच्यासाठी तुम्ही आज झटताय, प्रचार करताय ते लोक येत्या ७ तारखेला मतदान झाल्यानंतर तुमचा फोनसुद्धा उचलणार नाहीत. ७ तारखेनंतर तुमच्यासाठी इथे बंटी पाटीलच असणार आहे, हे लक्षात ठेवा.

हे ही वाचा >> “रोहितच्या उमेदवारीला शरद पवारांचा विरोध, पण मीच…”, अजित पवारांच्या दाव्यावर रोहित पवार म्हणाले…

सतेज पाटील म्हणाले, विरोधकांचा प्रचार करणाऱ्यांना मी सांगेन की, तुम्हाला हवा त्याचा प्रचार करा. ज्याने-त्याने आपापल्या पार्टीचा प्रचार करावा. लोकशाहीत प्रचाराला आमची ना नाही. परंतु, आमचा माणूस प्रचार करत असताना त्याला कोणी आडवा येत असेल, कोणी वेगळी भाषा वापरत असेल तर मीसुद्धा गेली २५ वर्षे याच मातीत कसलेला पैलवान आहे हे लक्षात ठेवा. कोणाला कधी चितपट करायचं ते मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे इथल्या कुठल्याही बारक्या (लहान) कार्यकर्त्याने माझ्या नादाला लागू नये.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satej patil warning to mahayuti if anyone obstructs congress workers you have to face me kolhapur loksabha asc