Archaeological Wonders of Prayagraj: प्रयागराज किल्ल्याच्या आत एक स्तंभ आहे. जो त्या प्रदेशाच्या इतिहासाचा जिवंत पुरावा मानला जातो. हा स्तंभ मूलतः मौर्य सम्राट अशोकाचा असून त्यावर त्या काळातील शिलालेख कोरलेले आहेत. मौर्य साम्राज्यानंतर गुप्तकालीन एका तितक्याच सामर्थ्यवान सम्राटाने हा स्तंभ पाहिला आणि त्यावर आपले शिलालेख कोरले. सुमारे काही हजार वर्षांनंतर मुघल सम्राटांनी हा स्तंभ पाहिला. जहांगीरने फक्त त्यावर आपले शब्द कोरले नाहीत, तर तो स्तंभ मूळ ठिकाणाहून प्रयागराज किल्ल्यात हलवण्याचा आदेश दिला. सध्या प्रयागराज हे महाकुंभ मेळ्याच्या उत्साहाने भरून गेले आहे. महाकुंभाच्या निमित्ताने प्रयागराजचे धार्मिक महत्त्व, इतिहास अशा विविध पैलूंवर चर्चा सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर या प्रदेशातील पुरातत्त्वीय पुरावे नेमकं काय सांगतात याचा घेतलेला हा आढावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कौशाम्बी एक प्राचीन नगरी

उत्तर प्रदेशातील कौशाम्बी हे प्राचीन अवशेषांचे प्रसिद्ध स्थळ आहे. कौशाम्बी जिल्हा हा १९९४ साली प्रयागराजपासून वेगळा करण्यात आला. प्राचीन कौशाम्बी यमुना नदीवर प्रयाग (आधुनिक प्रयागराज) येथे गंगेच्या संगमाच्या नैऋत्येस होते. प्रयागराज किल्ल्यात उभा असलेला स्तंभ कौशाम्बीतून आणला आहे. यमुना नदीच्या काठी असलेल्या या उत्खनन स्थळावर अजून एक स्तंभ आजही उभा आहे. १८६१ साली भारतीय पुरातत्त्व खात्याचे पहिले संचालक अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी येथे शोधकार्य सुरू केले. तेव्हापासून येथे अधूनमधून उत्खनन सुरूच आहे. त्यामुळे एका मोठ्या नागरी केंद्राचा शोध लागला. या उत्खननादरम्यान तब्बल १५ वस्तींचे थर सापडले होते. त्यामुळे या भागातील मानवी वस्तीचा इतिहास इसवी सनपूर्व १००० ते ८०० इतका जुना असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रयागराजच्या नैर्ऋत्येस सुमारे ४५ किमी. वर यमुनेच्या काठी वसलेले आधुनिक कोसाभ म्हणजेच प्राचीन कौशाम्बी असे अलेक्झांडर कनिंगहॅम आणि इतर पुरातत्त्ववेत्त्यांचे मत आहे.

प्राचीन हिंदू, जैन व बौद्ध वाङ्‍मयांत, कोरीव लेखांत व परकीय प्रवाशांच्या वर्णनांत कौशाम्बीसाठी किऔ-शँग-मि, कौशाभ्यपुर, कौशाम्बीपुर, कोसंब पट्टल, कौशाम्ब मंडल, वत्सपटन, भीम-की-गदा वगैरे भिन्न भिन्न नामांतरे आढळतात. बौद्ध ग्रंथांनुसार कौशाम्बी ही कधीकाळी वत्स राज्याची राजधानी होती. या भागात राजा उदयन किंवा वत्सराज राज्य करत होता. म्हणून त्यास वत्सपटन म्हणत. उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. या ग्रंथांमध्ये असेही नमूद आहे की, इ.स.पू. ५२१ आणि ५१८ मध्ये भगवान बुद्ध स्वतः कौशाम्बीला आले होते. पौराणिक संदर्भानुसार पुरुरव्याचा दहावा वंशज कुशांब याने ही नगरी वसविली. हस्तिनापूर वाहून गेल्यानंतर अर्जुनाचा आठवा वंशज निमिचक्र इथे रहावयास आला होता. याशिवाय प्रसिद्ध चिनी प्रवासी ह्यूएन त्सांगने सातव्या शतकात या नगरास भेट दिली होती. तो तेथील दहापंधरा बौद्ध मठांचा व पन्नास मंदिरांचा उल्लेख करतो. चिनी भाषेतील बौद्ध ग्रंथ अंगुत्तर निकायाच्या आवृत्तीनुसार राजा उदयनाने भगवान बुद्धांची प्रतिमा तयार करण्याचे आदेश दिले होते. ही प्रतिमा कदाचित भगवान बुद्धांची तयार केलेली सर्वात पहिली प्रतिमा असावी असे अभ्यासक मानतात. काही नोंदींनुसार ह्यूएन त्सांग कौशाम्बी येथून भगवान बुद्धांची प्रतिमा घेऊन चीनला परत गेला होता.

प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ शां. भा. देव यांनी नमूद केल्याप्रमाणे १९३७ पासून या भागात उत्खननास सुरुवात झाली. त्यानंतर १९५० साली अलाहाबाद विद्यापीठानेही येथे उत्खनन केले. येथील प्राचीन किल्ल्याभोवती १२२ मी. रुंद व ८·५ मी. खोल खंदक होता. उत्खननात सापडलेला इ. स. पू. सातव्या शतकातील १३ मी. उंचीचा, विटांचे आच्छादन असणारा मातीचा प्राकार, तसेच बुद्धकालीन राजांचा दगडी प्रासाद (हा उदयन राजाचा प्रासाद असावा असे मानले जाते), घोषिताराम विहार व पुरुषमेधाकरिता बांधण्यात आलेली ‘श्येन चिति’ हे अवशेष अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. घोषिताराम विहार ही वास्तू गौतम बुद्धांना दान दिल्याचा ब्राह्मी लिपीतील लेखही मिळाला आहे, तर श्येन पक्ष्यासारखी रचना असलेली श्येन चिती आपस्तंब शुल्ब सूत्रानुसार तयार केलेली असून ती इ. स. पू. २०० वर्ष जुनी आहे. या चितीत बळी दिलेल्या मानवाच्या कवट्याही सापडल्या आहेत. या अवशेषांव्यतिरिक्त मातीच्या मूर्ती, मृत्पात्रे, नाणी, साचे, मणी, बांगड्या, मुद्रा इ. अनेक वस्तू सापडल्या आहेत. त्यांच्या अभ्यासावरून त्या ताम्रपाषाणयुगीन असाव्यात, असा तज्ज्ञांचा कयास आहे. भिन्न प्रकारच्या मुद्रा व मृत्पात्रे यांवरून येथील वेगवेगळ्या काळातील कलेची प्रचिती येते. येथील एका मुद्रेवरील हूण राजांचे अभिधान व दुसऱ्या एका मुद्रेवरील तोरमाण हूण यांच्या उल्लेखावरून ही नगरी हूणांनी पादाक्रांत करून उद्ध्वस्त केली असावी, असे दिसते.

गढवा

गढवा येथे एक प्राचीन मंदिरसमूह मध्ययुगीन किल्ल्याच्या संरक्षित भिंतींच्या आत आहे. या किल्ल्याच्या भिंती १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात स्थानिक बघेल शासक विक्रमादित्य यांनी बांधल्या होत्या. तर, मंदिरे गुप्त कालखंडातील आहेत. जरी ही मंदिरे आता भग्नावस्थेत असली तरीही त्यामध्ये मूर्तीशिल्प आणि काही शिलालेखांचे अंश दिसून येतात. १८७० च्या दशकात कनिंगहॅम यांनी केलेल्या उत्खननात इ.स. ५ व्या शतकातील संस्कृत शिलालेख सापडले आहेत. त्यामुळे या स्थळाचा इतिहास गुप्तकालीन असल्याचे सिद्ध झाले आहे.

भीता

भीता हे आणखी एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. या स्थळाचा पहिला शास्त्रीय अभ्यास १८७० च्या दशकात कनिंगहॅम यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. कनिंगहॅम यांच्या कालखंडात झालेल्या प्राथमिक उत्खननामुळे पुढील तीन दशकांनंतर अधिक सखोल अभ्यासासाठीचा मार्ग मोकळा झाला. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे महासंचालक (१९०२-२८) जॉन एच. मार्शल यांनी भीतातील उत्खननाबद्दल म्हटले आहे की, “भीताचे उत्खनन हे भारतीय पुरातत्त्वशास्त्राच्या इतिहासातील एक नवा टप्पा दर्शवतो. कारण हा पहिला प्रसंग आहे, ज्यावेळेस प्राचीन भारतीय नगराच्या अवशेषांचे उत्खनन करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला.” येथील उत्खननात संपूर्ण गृहसमूह आढळले आहेत. या घरांमधील सांडपाण्याची व्यवस्था, विहिरी आणि साठवणुकीसाठीचे मोठे माठ हे त्या काळातील शहरी जीवनमानाचे संकेत देतात असे अभ्यासक सांगतात. भीता येथील घरं मौर्य आणि उत्तर-मौर्य काळातील असल्याचे सांगितले जाते. ही घरं भारताला आजच्या काळातही अनुकरणीय ठरतील अशा उल्लेखनीय नगररचनेचे धडे देतात. भीता येथील उत्खननातील महत्त्वाचा शोध म्हणजे मुखलिंग (पाच मुख असलेला शिवलिंग).

गिंजा टेकडी

गिंजा टेकडी गरवा येथून सुमारे १२ किमी दक्षिणेस आहे. गिंजा टेकडीचा वारसा पूर्णतः हरवलेला आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार गिंजा टेकडीच्या दक्षिण बाजूस असलेल्या दगडी सभागृहात इंडो-स्किथियन कालखंडातील तीन ओळींचा लाल रंगात लिहिलेला शिलालेख आढळतो. त्याच्याबरोबर काही रेखाचित्रेही आहेत. हे स्थळ गूगल मॅपवर नाही, पण शोध घेतल्यास मिळू शकते. गिंजा टेकडीचे ठिकाण गूगल मॅपवर उपलब्ध नाही. त्यामुळे या ठिकाणाबद्दल सातत्याने विचारपूस करावी लागते. या ठिकाणी बारा खास गावातून जाता येते. गिंजा ही केवळ काहीशे लोकसंख्या असलेली एक छोटी वस्ती आहे. हे ऐतिहासिक स्थळ वस्तीबाहेर एका छोट्या टेकडीवर आहे. इंडो-स्किथियन किंवा शक हे इसपूर्व दुसऱ्या शतकापासून ते इसवी सन चौथ्या शतकापर्यंत भारतीय उपखंडात प्रभावशाली होते. परंतु, टेकडीवरील कोणतीही गोष्ट त्यांच्या काळातील कोरलेल्या शिलालेखाच्या वर्णनाशी जुळत नाही. टेकडीच्या शिखरावर दोन मंदिरं आहेत. त्यापैकी एक मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झालेले असून ते १० व्या-१२ व्या शतकातील चंदेल काळातील असावे आणि दुसरे हनुमान मंदिर आहे हे अलीकडच्या काळात बांधले गेले आहे. परंतु, सद्यस्थितीत प्राचीन शिलालेखाच्या तीन ओळी शोधणे केवळ व्यर्थ ठरते.

प्रयागराजच्या इतिहासाचे जिवंत साक्षीदार

श्रृंगवेरपूर, सुजावन देव आणि इतर ठिकाणांसह ही स्थळं प्रयागराजच्या इतिहासाचा महत्त्वपूर्ण भाग आहेत. या भागाला भेट देणारे पर्यटक प्रसिद्ध अलाहाबाद संग्रहालय वगळता प्राचीन इतिहासाविषयी फारशी दखल घेत नाहीत. कुंभमेळ्याच्या निमित्ताने संगम नगरीला लाखो लोक भेट देतील. परंतु, यात या विस्मृतीत गेलेल्या या स्थळांना भेट देणाऱ्या लोकांचा समावेश खचितच असेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahakumbh 2025 prayagraj archaeological history ancient monuments and cultural heritage svs