माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करणार्‍या त्यांच्या सुरक्षा रक्षकांपैकी एक असणार्‍या बेअंत सिंग यांच्या मुलाने लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. सरबजित सिंग खालसा यांनी पंजाबमधील फरीदकोट मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, दिवंगत बेअंत सिंग यांचा मुलगा सरबजित सिंग खालसा यांनी दावा केला की, शहरातील असंख्य लोकांनी त्यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह केला, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सार्वत्रिक निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोण आहेत सरबजित सिंग खालसा?

‘एनडीटीव्ही’नुसार सरबजित सिंग खालसा यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. ते पंजाबच्या मोहालीचे रहिवासी आहेत. ‘द हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, ४५ वर्षीय सरबजित सिंग चंदीगडच्या खालसा कॉलेजमध्ये पदवीसाठी गेले होते, परंतु त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला नाही. खालसा यांनी यापूर्वीदेखील अनेकदा निवडणूक लढवली आहे. मात्र, त्यांना एकही निवडणूक जिंकता आली नाही. विशेष म्हणजे त्यांनी प्रत्येक निवडणुकीत आपला मतदारसंघ बदलला आहे.

हेही वाचा : १७ जागा, एकाच जातीचे उमेदवार विजयी; दशकभराहून अधिक काळ प्रचलित जातीय गणित आहे तरी काय?

खालसा यांनी २००४ ची लोकसभा निवडणूक भटिंडा मतदारसंघातून लढवली होती, ज्यात त्यांना १.१३ लाख मते मिळाली होती. त्यानंतर २००७ मध्ये त्यांनी पंजाब विधानसभा निवडणूक बर्नाला येथील भदौर मतदारसंघातून लढवली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बहुजन समाज पक्षाचे उमेदवार म्हणून फतेहगढ (राखीव) जागेवरून निवडणूक लढवली होती. मात्र, याही जागेवर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार खालसा यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर २०२२ ची विधानसभा निवडणूक लढवली नाही.

‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, २०१४ मध्ये त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात ३.५ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. खालसा हे राजकीयदृष्ट्या सक्रिय कुटुंबातून आलेले आहेत. त्यांचे आजोबा सुचा सिंग आणि आई बिमल कौर हे १९८९ मध्ये भटिंडा आणि रोपर मतदारसंघातील शिरोमणी अकाली दल (अमृतसर)चे खासदार होते.

निवडणूक लढवण्याचे कारण काय?

‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत खालसा म्हणाले की, अनेक गावकऱ्यांनी त्यांना आग्रह केल्यामुळे त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरु ग्रंथ साहिबच्या अपमानास जबाबदार असणार्‍यांना शिक्षा व्हावी, असा त्यांचा मानस आहे. २०१५ मध्ये फरीदकोटमध्ये कोटकपुरा आणि बेहबल कलान येथे गुरु ग्रंथ साहिबची विटंबना झाली होती आणि निदर्शकांवर पोलिसांनी गोळीबार केला होता. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला होता.

या घटनेचा परिणाम २०१७ च्या निवडणुकांवर झाला होता. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत शिरोमणी अकाली दल (अमृतसर) चा पराभव झाला होता आणि काँग्रेस सत्तेत आली होती. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला फक्त तीन जागा मिळाल्या होत्या. पंजाबमधील १३ लोकसभा मतदारसंघात १ जूनला मतदान होणार आहे. सत्ताधारी आम आदमी पक्षाने अभिनेता करमजित सिंग अनमोल यांना फरीदकोट जागेवरून उमेदवारी जाहीर केली आहे, तर भाजपाने गायक हंस राज हंस यांना उमेदवारी दिली आहे. फरीदकोट मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या काँग्रेसचे खासदार मोहम्मद सादिक करत आहेत.

इंदिरा गांधी यांची हत्या

२०२३ च्या ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे दोन अंगरक्षक, बेअंत सिंग आणि सतवंत सिंग यांनी ३१ ऑक्टोबर १८८४ रोजी पॉइंट ब्लॅक रेंजमधून इंदिरा गांधींवर ३० हून अधिक गोळ्या झाडल्या. त्याच वर्षी जूनमध्ये झालेल्या ऑपरेशन ब्लू स्टारदरम्यान शिखांच्या अपमानाचा आणि सुवर्ण मंदिराच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांनी हा हल्ला केल्याचे सांगितले.

१८८४ साली इंदिरा गांधी यांची त्यांच्या दोन अंगरक्षकांनी हत्या केली होती. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टारचा निर्णय घेतला आणि भारतीय सैन्यास मंदिराच्या आवारात जमलेल्या शीख फुटीरतावाद्यांना हटवण्याचे आदेश दिले. परिणामी भारतीय सैन्य आणि जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वाखालील फुटीरतावादी गटात हिंसक संघर्ष झाला. जरी ब्लू स्टार ऑपरेशन यशस्वी झाले, तरी यामुळे सुवर्ण मंदिराचे मोठे नुकसान झाले आणि दोन्ही बाजूंनी जीवितहानी झाली. ६ जून १९८४ साली या संघर्षात जर्नेल सिंह भिंद्रनवालेसह बरेच दहशतवादी मारले गेले.

हेही वाचा : काश्मिरी पंडितांना आता ‘फॉर्म एम’शिवाय करता येणार मतदान; आजवर का होती याची आवश्यकता?

‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, यामुळे जगभरातील शीख संतप्त झाले. शीख धर्मियांच्या अत्यंत पवित्र स्थानांपैकी एक असलेल्या सुवर्ण मंदिरात केलेली ही कारवाई अत्यंत वादग्रस्त ठरली. गांधींच्या हत्येने भारताला धक्का बसला आणि शीखविरोधी हिंसाचार भडकला. हा आजवरचा सर्वात भयंकर जातीय हिंसाचार असल्याचे सांगण्यात येते. सरकारी आकडेवारीनुसार केवळ तीन दिवसांत जवळ जवळ ३,३५० शीख मारले गेल्याचे माध्यमांनी सांगितले. त्यापैकी २,८०० हून अधिक शीख दिल्लीतील होते. बेअंत सिंग याला सुरक्षा रक्षकांनी ताबडतोब मारले, तर सतवंतला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Son of indira gandhi assassin contensting loksabha rac
First published on: 15-04-2024 at 16:51 IST