Mumbai Indians Celebration on Win vs PBKS : मुंबई इंडियन्स संघ पंजाब किंग्जचा नऊ धावांनी पराभव केला. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघ आता IPL 2024 मध्ये सात सामन्यांत सहा गुणांसह सातव्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यात पंजाब संघाचा जरी पराभव झाला असला तरी त्यांच्या प्रत्येक खेळाडूची संघाला विजय मिळवून देण्यासाठी सुरू असलेली धडपड वाखाणण्याजोगी होती. त्यात पंजाब किंग्सचा आशुतोष शर्मा व शशांक सिंह यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. कारण- या दोन्ही खेळाडूंमुळे पंजाबने मुंबईकडून सामना जवळपास हिसकावून घेतल्यासारखा होता. मात्र, शेवटच्या ओव्हरमध्ये मोहम्मद नबी आणि इशान किशन या जोडीने अत्यंत हुशारीने या जोडीला चमत्कार घडविण्यापासून रोखले.

शेवटच्या ओव्हरमध्ये पंजाबला विजयासाठी १२ धावांची गरज होती. त्यात कागिसो रबाडाने ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर शॉट खेळून दोन धावा काढण्याचा प्रयत्न केला; पण हे काम त्याला यशस्वीपणे पार पाडता आले नाही. नबीचा रॉकेट थ्रो व ईशान किशन यांच्या हुशारीसमोर तो चुकला आणि धावबाद झाला. त्यामुळे नबी-किशनच्या ‘हुशारी’मुळे आशुतोष-शशांकची मेहनत वाया जाऊन, शेवटच्या ओव्हरमध्ये डावाची बाजी पालटली आणि विजयाची माळ मुंबई इंडियन्सच्या गळ्यात पडली.

या विजयानंतर आता मुंबई इंडियन्स संघाचा सेलिब्रेशन करताना एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. त्यातील ईशान किशनच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा आहे.

ईशान किशन, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या यांनी विजयानंतर ‘असे’ केले सेलिब्रेशन

रबाडा बाद झाल्यानंतर ईशान किशन सर्वांत आनंदी दिसला, तो मैदानातच आकाशात हात उंचावत धावत संघाच्या दिशेने आला. यावेळी संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मानेही हार्दिक पांड्याचे अभिनंदन केले. आयपीएलकडून पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये हे दृश्य तुम्ही पाहू शकता. मुंबई इंडियन्स जिंकल्यानंतर हिटमॅन रोहित शर्मा आकाशात हात उंचावत मैदानात सेलिब्रेशन करताना दिसतोय. तर ईशान किशन धावत खेळाडूंना टाळ्या देत जोरात उड्या मारताना दिसतोय.

पण, या सगळ्यात हार्दिक पांड्या व रोहित शर्मा यांनी विजयानंतर आनंदात एकमेकांना मारलेली मिठी ही मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आणि या स्पर्धेतील आगामी सामन्यांसाठी शुभ संकेत म्हणून पाहिली जात आहे.

नबी आणि ईशानने मुंबईसाठी कसा जिंकला सामना?

वेगवान गोलंदाज आकाश मधवाल मुंबई इंडियन्ससाठी पंजाब किंग्जच्या डावातील शेवटची ओव्हर टाकत होता. यावेळी कागिसो रबाडा पंजाबसाठी स्ट्राइकवर होता. रबाडाने शॉट खेळत चौकार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला चार धावा करता आल्या नसल्या तरी अशा स्थितीत त्याने दोन धावा मिळविण्याचा कसोशीने प्रयत्न केला; पण ते करण्यातही तो अपयशी ठरला. मोहम्मद नबीने बाउंड्रीजवळील चेंडूवर वेगाने उडी मारली आणि वेगवान थ्रो फेकला.

नबीचा तो अचूक थ्रो ईशान किशनने शानदारपणे झेलला आणि तो चेंडू झटपट विकेटवर मारला. रबाडा क्रीजवर पोहोचल्याचे दिसत होते; पण रिप्ले पाहिल्यावर काय घडले ते समोर आले. कागिसो रबाडा धावबाद झाला आणि मुंबई इंडियन्सने हा सामना नऊ धावांनी जिंकला.