"उसाच्या २६५ बेण्याच्या नादाला लागू नका", भाव हवा असेल तर कोणता ऊस लावावा? अजित पवारांनी दिली यादी... | Ajit Pawar suggest best sugarcane variety of farmer to get more yield price | Loksatta

“उसाच्या २६५ बेण्याच्या नादाला लागू नका”, भाव हवा असेल तर कोणता ऊस लावावा? अजित पवारांनी दिली यादी…

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेतकऱ्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. “माझी तुम्हाला विनंती आहे की इथून पुढे २६५ उसाच्या बेण्याच्या नादाला लागू नका,” असं मत पवारांनी व्यक्त केलं.

“उसाच्या २६५ बेण्याच्या नादाला लागू नका”, भाव हवा असेल तर कोणता ऊस लावावा? अजित पवारांनी दिली यादी…
अजित पवार

बेभरवशाच्या शेतीमध्ये सध्या ऊस हे असं पीक आहे की ज्यातून शेतकऱ्याला दोन पैसे मिळतात. मात्र, अशातही उसाचा कोणता वाण लावला जातो त्यावर त्या उसाला किती दर मिळणार हे ठरतं. उसाच्या प्रत्येक वाणानुसार टनामागे मिळणारं साखरेचं प्रमाण म्हणजेच साखरेचा उतारा बदलतो. त्यावरूनच उसाचे दर ठरतात. या पार्श्वभूमीवर साखर उद्योगात अनुभवी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेतकऱ्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. “माझी तुम्हाला विनंती आहे की इथून पुढे २६५ उसाच्या बेण्याच्या नादाला लागू नका,” असं मत पवारांनी व्यक्त केलं. तसेच कोणता ऊस लावावा यादीच सांगितली आहे. ते शनिवारी (१ ऑक्टोबर) उस्मानाबादमध्ये बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “सध्या रानं ओली आहेत, वापसा नाही. त्यामुळे आत्ता लगेच उसाची तोडणी झाली तर रिकव्हरी चांगली होणार नाही. रिकव्हरी चांगली आली तरच उतारा चांगला पडतो, साखर जास्त निघते. साखर जास्त निघाली, तर भाव चांगला मिळतो. एका टन ऊसातून किती साखर निघते यावर ते अवलंबून असतं. काही ठिकाणी १० टक्के, ११ टक्के, १२ टक्के निघते. कोल्हापुरात तर टनामागे ११४ किलो साखर निघते. म्हणजे १४ टक्के साखर निघते. एवढा विरोधाभास आहे.”

“इथून पुढे २६५ उसाच्या बेण्याच्या नादाला लागू नका”

“एका टनातून किती साखर निघणार हे जमिनीच्या पोतावर, उसाचं बेणं कोणतं आहे यावर अवलंबून असतं. माझी तुम्हाला विनंती आहे की इथून पुढे २६५ उसाच्या बेण्याच्या नादाला लागू नका. तुमचा ऊस वेळेवर जायचा असेल, भाव चांगला मिळवायचा असेल तर ८६-०-३२ , ८०-०५, १०-००१, १२-१२-१ ही उसाची बेणी वापरा,” असा सल्ला अजित पवारांनी दिली.

“कमी पाण्यात उसाचं जास्त उत्पादन होईल यावर संशोधन”

अजित पवार पुढे म्हणाले, “आम्ही शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली वसंतदादा शुगर इन्स्ट्युट ही संस्था चालवतो. तिथं नवीन उसाचं बेणं तयार करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. कमी पाण्यात त्या उसाला दशी न पडता उसाचं टनेज जास्त येईल यावर संशोधन करत आहेत. त्यातून काही वाणांचा शोध लगाला.”

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना गुरुमंत्र, म्हणाले, “अजितदादा जसे १०-१२ कारखाने चालवतात…”

“पाडेगावमध्ये काही प्रसिद्धीला आणल्या. कोल्हापूरमध्ये आजरा म्हणून तालुका आहे. त्याही भागात नवीन बेणं शोधलं,” असंही त्यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-10-2022 at 15:24 IST
Next Story
“बिके हुये क्या जाने निष्ठा, गुमराह कर रहे खाकर…,” अरविंद सावंतांची शिंदे गटावर आक्षेपार्ह टीका