बदलाचा वेग किती? मालकाच्या वाडय़ावर पहाटे पाणी भरण्यापासून ते रात्री सर्वाची अंथरुणे टाकण्यापर्यंतची कामे करत ढोर कष्ट करणारा शेतमजूर आता बहुतेक वेळा मोबाईलवरच भेटतो. दबलेल्या व पिचलेल्या स्थितीतील मजुरांचे जीवनमान दिवसेंदिवस सुधारले आहे. कारणे अनेक आहेत. त्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका आणि आरक्षण या दोन कारणांमुळे जीवनमान सुधारल्याचे चित्र दिसते. सालदाराच्या आयुष्यात ही नव्या युगाची गुढी उभारल्याचे चित्र आहे. गुढीपाडव्या दिवशी ‘साल’ निश्चित होते. मोबदला ठरवला जातो. नव्या काळाची नवी हाक शेतमजुरांचे शोषण थांबविणारी तर ठरली आहे. शिवाय कामाला नकार देण्याचा अधिकारही शेतमजुरांनी मिळविला आहे.
पूर्वी सालदार हा शेतीत राबणारा, म्हणजे शेतीधंद्यातला सर्वात तळाचा घटक असे. त्याचे जगणे म्हणजे ढोर कष्ट. शेतमजुराच्या पिचलेपणाचे चित्रण योगीराज वाघमारे आणि प्रभाकर हरकळ यासारख्या कथाकारांच्या कथांमधून दिसते. आता मात्र शेतमजुरांच्या जगण्यात मोठा बदल झाल्याचे जाणवत आहे. पूर्वी या घटकाच्या कष्टाला फारशी मिळकत नसायची. दिवसभर राब-राब राबल्यानंतरही दोन वेळच्या अन्नाची सोय होत असे. पावसाळ्याच्या दिवसांत काम नसायचे. अनेकदा अनेकांची उपासमार घडायची. आता या जगण्यात मोठा बदल दिसून येतो.
यंदा मराठवाडय़ातल्या ज्या भागात दुष्काळी स्थिती आहे, तेथे ४५ हजार रुपयांपेक्षा कमी ‘साल’ दिसते. ज्या जिल्ह्य़ात पीकपाण्याची स्थिती बरी आहे, अशा भागात ४५ ते ५० हजार रुपयांपर्यंत मजुरांच्या सालाचा मोबदला ठरतो आहे. बागायती शेती असणाऱ्यांनी शेतमजुराला ६० ते ७० हजार रुपयांपर्यंत यंदा साल निश्चित केले आहे. परभणी जिल्ह्य़ास लागून असलेल्या
वसमतसह अन्य तालुक्यांमध्ये हा दर सुरू आहे. बागायती भागात गहू आणि ज्वारी ‘चंदी’ च्या रूपात मजुरांना दिली जाते. कोरडवाहू क्षेत्रात मात्र चंदीची पद्धत बऱ्यापैकी बंद झाल्याचे दिसून येते. ज्या ठिकाणी मजुरांना मोबदल्यात चंदी दिली जात नाही, त्याला ‘कोरडे साल’ म्हटले जाते.
आता मोबाईलविना शेतमजूर ही कल्पना जवळपास अशक्य आहे. ज्या शेतकऱ्याकडे मजूर कामाला आहे, त्या शेतकऱ्याकडूनच मजुराला मोबाईल दिला जातो. त्यामुळे काम सांगणे सोपे जाते. शेतमालक कोठेही असला तरी तो शेतमजुराच्या संपर्कात असतो. गेल्या ५ वर्षांत ग्रामीण भागातले स्थलांतरही मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. पूर्वी हे स्थलांतर जवळपासच्या गावांमध्ये असायचे. आता मजुरीसाठी शेतमजूर महानगरांपर्यंत पोहोचलेले दिसतात. हे अंतर पार करण्याची जोखीम मजूरही उचलताना दिसतात. मजुरीसाठी गाव सोडायचे म्हणजे आधी मोठे दिव्य वाटायचे. आता कामधंद्यासाठी गाव सोडताना फारशी भावनिक घालमेल दिसून येत नाही.
शेतीधंद्यात यांत्रिकीकरण मोठय़ा प्रमाणावर आले. ही यंत्रे हाताळण्याचे कौशल्यही मजुरांनी मिळवल्याचे दिसते. मजुरांमध्ये आलेल्या या कौशल्यामुळेही त्यांची पत वाढली. मळणी यंत्र ते ट्रॅक्टर चालविण्यापर्यंतची कामे यात येतात. हे यांत्रिकीकरण वाढल्यामुळे मजुरांच्या जगण्यातले ढोर कष्ट कमी झाले, हेही तितकेच खरे.
पूर्वी शेतमजुरांना दबून राहावे लागायचे. गावातल्या एखाद्या मातब्बर शेतकऱ्याला नकार देण्याचीही मजुरांची हिंमत होत नसे. आता मात्र नकाराचा अधिकार मजुरांनी मिळविला आहे. समाधानकारक मोबदला नसेल तर स्पष्टपणे नाही म्हणण्याइतपत मजुरांचे जीवनमान बदलले आहे. पूर्वी सालदारांच्या संदर्भात शिवीगाळ, मारहाणीपर्यंत घटना घडत. आता गावागावांत अपवादानेच अशी एखादी घटना घडू शकते.
शेतमजूर हा घटक आता दबलेल्या किंवा पिचलेल्या अवस्थेत न राहण्याचे आणखी एक कारण म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे बदलते स्वरूप. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आता शेतमजूर या घटकाला महत्त्व प्राप्त झाले आहे. आरक्षणातूनही वेगवेगळ्या समाजघटकातले मजूरही उमेदवाराच्या रूपात दिसतात. गावपातळीवर निर्णायक ताकद मजुरांमध्येही आलेली दिसते. जोडीला अनेक सरकारी योजनांमुळेही मजुरांचे जीवनमान सुधारल्याचे दिसते. सालदारांच्या आयुष्यातही नव्या युगाची नवी गुढी आज उभारल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farm labour is no more compelled