प्रजासत्ताक दिनी भाषण करतानाचा एका चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ पाहून काहीजण पोट धरुन हसत आहेत, तर काहीजण या विद्यार्थ्यांच्या लोकशाहीच्या व्याख्येचं कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रात या भुऱ्या नावाच्या विद्यार्थ्याच्या जोरदार चर्चा आहे. आता त्याची दखल राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांनीही घेतली. तसेच या मुलाला आपल्या घरी बोलावून त्याचं भाषण ऐकलं. हे भाषण ऐकल्यानंतर त्यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजेश टोपे म्हणाले, “महाराष्ट्रभर गाजत असलेल्या भुऱ्या उर्फ कार्तिक वजीर या माझ्या मतदारसंघातील विद्यार्थ्याला मी घरी बोलवून त्याचे भाषण ऐकले आणि त्याचा सत्कार केला.”

भुऱ्याच्या भाषणात नेमकं काय?

आपल्या भाषणात हा विद्यार्थी त्याच्या संवैधानिक हक्काचं कसं आणि कोणाकडून उल्लंघन केलं जातं, हे सांगताना दिसत आहे. तो आपल्या भाषणात म्हणतो की, खरंतर आज लोकशाही दिन आहे. आजपासून लोकशाही सुरू झाली. मला लोकशाही खूप आवडते, कारण लोकशाहीमध्ये तुम्ही काहीही करु शकता. प्रेमाने राहू शकता, भांडू शकता, पण मला मोक्कार धिंगाणा करायला, माकडासारखे झाडावर उड्या मारायला, फिरायला खूप आवडते. माझे बाबा मला कधीही मारत नाहीत, कारण ते लोकशाही मानतात. मात्र, माझ्या गावातील लहान मुलं माझं नावं सरांना सांगतात आणि दहशतवादी जशी लोकशाही पायदळी तुडवतात तसे सर मला पायदळी तुडवतात.”

भाषणाच्या शेवटी हा विद्यार्थी म्हणतो, “माझ्यासारखा गरीब मुलगा आख्या तालुक्यात आढळणार नाही.” या मुलाच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये मजेशीर कमेंट केल्या आहेत. कोणी हा नक्कीच भावी राजकारणी होणार म्हटलं, तर काहींनी यालाच धमक म्हणतात असं म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mla rajesh tope meet bhurya student who get viral for his lokshahi speech pbs