मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी (२२ मे) पुणे येथे घेतलेल्या सभेत राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली. यानंतर आमदार रवी राणा यांनी राज ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत मॅच फिक्सिंग केल्याचा गंभीर आरोप केला. “हनुमान चालिसा पठनामुळे आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो, पण राज ठाकरेंवर नाही,” असं मत व्यक्त करत रवी राणा यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच राज्य सरकारच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रवी राणा म्हणाले, “राज ठाकरे यांना माझं विचारणं आहे की आमचा गुन्हा काय होता? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर, शेत मजुरांवर लोडशेडिंगचं संकट आलंय. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात महाराष्ट्रावर संकट आलंय. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालिसा वाचावा अशी आम्ही विनंती केली होती. मात्र, शिवसैनिकांनी आमचा विरोध केला.”

“तुम्ही जेव्हा कोणतीही सभा घेता तेव्हा मॅच फिक्सिंग केली जाते”

“हनुमान चालिसावरून आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करत १४ दिवस तुरुंगात टाकण्यात आलं. महिला खासदारालाही तुरुंगात टाकतात. त्यावर राज ठाकरे एक शब्द बोलत नाहीत. माझा राज ठाकरे यांना प्रश्न आहे. तुम्ही जेव्हा औरंगाबादमध्ये सभा घेता, भडकाऊ भाषण देता तेव्हा तुमच्यावर कोणताही गुन्हा दाखल होत नाही. कारण तुम्ही जेव्हा कोणतीही सभा घेता तेव्हा मॅच फिक्सिंग केली जाते. त्यामुळे तुमच्यावर कोणतीही कारवाई होत नाही,” असं रवी राणा यांनी सांगितलं.

“आमचा जन्म ठाकरे कुटुंबात झाला नाही त्यामुळे कारवाई”

रवी राणा पुढे म्हणाले, “औरंगजेबाच्या कबरीवर जे लोक फुलं वाहतात त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. आमचा सर्वसामान्य कुटुंबात जन्म झाला, आमचा जन्म ठाकरे कुटुंबात झाला नाही. त्यामुळे आमच्यावर कारवाई करताना कुठेही मागेपुढे पाहिलं जात नाही. तेव्हा तुम्हाला हिंदूंची आठवण येत नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.”

हेही वाचा : “एवढंही यांना समजत नसेल तर…”; राज ठाकरेंनी लडाख दौऱ्यावरुन टीका केल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया

“देशात दोनच हिंदुहृदयसम्राट”

“राज ठाकरे तुम्ही टीका करताना विचार करा. तुम्ही केलं ते सत्य आणि आम्ही केलं ते असत्य असं नसतं. देशात दोनच हिंदुहृदयसम्राट आहेत, एक बाळासाहेब ठाकरे व दुसरे पंतप्रधान नरेंद्र मोदी,” असं म्हणत रवी राणांनी राज ठाकरेंना टोला लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Serious allegations of match fixing by ravi rana on raj thackeray uddhav thackeray pbs
First published on: 22-05-2022 at 22:28 IST