अभिनयासह निर्मिती क्षेत्रातही उत्तम कामगिरी बजावणारी कलाकार म्हणजेच शर्मिष्ठा राऊत. करिअरमधलं अभिनेत्री म्हणून पहिलं काम ते निर्मिती क्षेत्रात पदार्पण करण्यापर्यंतचा शर्मिष्ठाचा प्रवास काही सोपा नव्हता. स्ट्रगल प्रत्येकाच्याच आयुष्यात येतो; परंतु वाईट अनुभव देणारा स्ट्रगल सगळ्यांनाच नकोसा वाटतो. शर्मिष्ठाच्या आयुष्यातदेखील असाच वाईट अनुभव आला होता. ऑडिशनदरम्यान एकदा तिला कॉम्प्रोमाईजसाठी विचारलं गेलं होतं.

शर्मिष्ठानं नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान तिच्या आयुष्यातले अनेक चांगले-वाईट अनुभव तिनं शेअर केले. जेव्हा मुलाखतकारानं तिला विचारलं की, तिच्या करिअरमध्ये एक चांगलं आणि एक वाईट आॉडिशन, असे काही अनुभव आहेत का? जे शर्मिष्ठाच्या कायम लक्षात राहिले आहेत.

हेही वाचा… “तुमच्या भारत मातेला त्रास देऊ नका”, लोकसभा निवडणुकीदरम्यान सलमान खानने शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…

त्यावर शर्मिष्ठा म्हणाली, “एक जे चांगलं ऑडिशन आहे आणि ते म्हणजे ‘मन उधाण वाऱ्याचे’. ते ऑडिशन झालं तेव्हा मला कळतच नव्हतं की नक्की काय झालंय. ती एक प्रक्रिया होती, जी घडायला लागली होती. जेव्हा तुमच्या आयुष्यात काही मिळणार असतं ना तेव्हा त्या गोष्टी आपोआप घडायला लागतात. मी ती ऑडिशन दिली आणि माझी निवड झाली तेव्हा मला असं झालेलं की, अरे, बापरे हे काय झालं अचानक.”

शर्मिष्ठा वाईट ऑ़डिशनबद्दल सांगत म्हणाली, “दुसरी एक वाईट ऑडिशन होती. खरं तर ऑडिशन छान झाली होती; पण तिकडे वाईट अनुभव आला होता. मी त्या प्रॉडक्शन हाऊसचं नाव नाही घेणार. ते प्रॉडक्शन हाऊस हिंदी आहे की मराठी तेही आता मी इथे उघड नाही करणार. पण त्यांनी मला कॉम्प्रोमाइजसाठी विचारलं होतं. त्यामुळे आपल्याकडे हेही घडतं. कारण- कास्टिंग काऊच हा प्रकार सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे तो कास्टिंग काऊचचासुद्धा प्रकार माझ्याबरोबर घडला होता. तेव्हा मी म्हणाले धन्यवाद! आपण घरी बसू. काही नाही झालं, तर आपल्याकडे नोकरी आहे. आपण नोकरी करू; एवढे तर सुशिक्षित नक्कीच आहोत. त्यामुळे मी म्हटलं की, मला हे काही करायचं नाही.”

हेही वाचा… ‘बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो

दरम्यान, शर्मिष्ठा राऊतनं निर्मिती केलेला ‘नाच गं घुमा’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. सहा निर्माते असणारा हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. शर्मिष्ठा झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ आणि ‘नवरी मिळे हिटलरला’ या दोन मालिकांची निर्माती आहे.