कुटुंबियांना सोडून ४२ महिने कारागृहात घालवावे लागत असल्याने आलेला चेहऱ्यावरचा ताण आणि न्यायालयाकडून काही सुविधांसाठी परवानगी मिळाल्याने मध्येच झळकणारे स्मित अशा संमिश्र भावनांनी अभिनेता संजय दत्तने गुरुवारी कारागृहात प्रवेश केला. पत्नी मान्यता आणि चित्रपट निर्माता महेश भट यांच्यासह पांढरा कुर्ता आणि जीन्स असा पेहराव केलेला आणि कपाळावर टिळा लावलेला संजय दुपारी अडीचच्या सुमारास न्यायालयाच्या आवारात दाखल झाला. संजय दत्तला पाहण्यासाठी गर्दी लोटणार हे लक्षात घेऊन पोलिसांनी केवळ एलफिन्स्टन महाविद्यालयासमोरील न्यायालयाचे प्रवेशद्वार खुले ठेवले होते. तसेच त्याच्या जिवाला असलेल्या कथित धोक्याच्या पाश्र्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. परंतु पोलिसांच्या या योजनेचा प्रत्यक्षात अक्षरश: फज्जा उडाला.
न्यायालयही प्रतिक्षेत
संजय दत्त न्यायालयात कधी येणार याची वाट पाहात प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी न्यायालयाच्या आवारात सकाळी १० पासून ताटकळत उभे होते. विशेष म्हणजे खुद्द न्यायालयानेही अन्य खटल्यांचे कामकाज तहकूब करीत सव्वाबाराच्या सुमारास संजय कधी येणार याची विचारणा केली. तो भोजनाच्या वेळेनंतर हजर होणार आहे, असे वकिलांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने याच प्रकरणी स्वतंत्रपणे चालविण्यात येणाऱ्या खटल्याच्या कामास सुरुवात केली.
‘नो स्मोकिंग’
आपण ‘चेन स्मोकर’ आहोत. त्यामुळे आपल्याला इलेक्ट्रॉनिक सिगारेटची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी संजयने न्यायालयाकडे केली. एवढेच नव्हे, तर इलेक्ट्रॉनिक सिगारेट वा स्मोकिंग म्हणजे काय हेही त्याच्या वकिलांनी न्यायालयाला समजावून सांगितले. मात्र त्यानंतरही संजयची ही मागणी न्यायाधीश जी. ए. सानप यांनी फेटाळून लावली व ‘स्टॉप स्मोकिंग’चा सल्ला दिला. न्यायालयाच्या या सल्ल्यावर संजय अगदी खळखळून हसला.