नागपूर : राज्यात महायुती सक्षम असल्यामुळे राज ठाकरे यांच्या पाठिंब्याची गरज नव्हती आणि महायुतीला त्यांची आवश्यकता नव्हती. मात्र त्यांनी पाठिंबा दिला आहे तर लोकसभा निवडणुकीत त्यांचा किती फायदा होईल, हे दिसेलच, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

रामदास आठवले नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. राज ठाकरे यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला, त्यामुळे त्यांचे स्वागत करतो. मात्र त्याचा किती फायदा होईल हे आताच सांगता येणार नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांना महायुतीमध्ये जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले असेल त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिला असावा, असेही आठवले म्हणाले.

हेही वाचा – “भाजपला मनसेच्या पाठिंब्यामुळे उत्तर भारतीयांमध्ये असुरक्षिततेची भावना”, प्रकाश आंबेडकरांचे विधान; म्हणाले, “भाजपने…”

लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने दोन जागांची मागणी केली होती. त्यात शिर्डी मतदारसंघाचा समावेश होता. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले, मात्र आम्हाला संधी मिळाली नसली तरी केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळावे, अशी मागणी आम्ही केली आहे. महायुतीमध्ये असल्यामुळे निवडणुकीच्या काळात भूमिका बदलविणे अतिशय अयोग्य आहे. आम्ही राज्यात महायुती आणि केंद्रात एनडीएसोबत राहणार असल्याचे आठवले म्हणाले.

इंडिया आघाडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचे काम करत आहे. मात्र जनता मोदींच्या सोबत आहे. त्यांना परिवार नसला तरी देशातील १४० कोटी जनता हाच त्यांचा परिवार आहे. संविधान बदलविण्याचा कोणालाही अधिकारी नाही. विरोधकांकडून संविधान बदलविणार अशी अफवा पसरविली जात आहे. काँग्रेस आणि राहुल गांधींच्या भुलथापाना बळी पडू नका. संविधान बदलवण्याची जी वक्तव्ये विरोधकांकडून केली जात आहे, अशांकडून संविधानाला जास्त धोका असल्याचे आठवले म्हणाले.

हेही वाचा – “अपघाताच्या घटनेवरून राजकारण करणे चुकीचे”, बावनकुळेंनी काँग्रेसचे आरोप फेटाळले; म्हणाले, “महाराष्ट्रात घातपात…”

विधानसभेत आम्हाला ९ ते १० जागा मिळेल. याबाबत चर्चा केली जाईल. बाळासाहेब आंबेडकर यांनी मल्लिकाजुर्न खर्गे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली मात्र त्यांना त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यांचा अपमान करण्यात आला त्यामुळे त्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि तो योग्य असला तरी यावेळी वंचितला फारसा प्रतिसाद मिळणार नाही असेही आठवले म्हणाले.