Statements devendra fadanvis well planned conspiracy Sushma Andhare Criticism Nagpur news ysh 95 | Loksatta

“महापुरुषांच्या विरोधातील वक्तव्ये, हा तर फडणवीस यांचा…”, सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांना खोचक टोला

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी असतील, मंत्री मंगलप्रभात लोढा असतील किंवा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड असतील, यांनी केलेली वक्तव्ये हे सर्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुनियोजित कटाचा भाग आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

“महापुरुषांच्या विरोधातील वक्तव्ये, हा तर फडणवीस यांचा…”, सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांना खोचक टोला
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

नागपूर : सातत्याने महापुरुषांच्या विरोधात होणारी वक्तव्ये हा काही योगायोग नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी असतील, मंत्री मंगलप्रभात लोढा असतील किंवा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड असतील, यांनी केलेली वक्तव्ये हे सर्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुनियोजित कटाचा भाग आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी येथे केला.

नागपूरवरून भंडारा-गोंदिया जिल्ह्यात बैठका व सभेच्या निमित्ताने जात असताना सुषमा अंधारे नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. गेल्या काही दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपनेते व मंत्री मंगलप्रसाद लोढा, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आदींनी आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. त्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पाठीशी घालत आहेत. फडणवीसांच्या मनात खरच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत सन्मान असता, तर त्यांनी याचा निषेध केला असता. याबाबत आगामी हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकार पक्षाकडून राज्यपालांच्या विरोधात निंदाव्यंजक ठराव अपेक्षित आहे. मात्र आता कोश्यारींची गच्छंती अटळ आहे हे लक्षात आल्यावर भारतीय जनता पक्ष वातावरण निर्मिती करीत आहे. कोश्यारी स्वतःच पायउतार होण्याची इच्छा व्यक्त करीत असल्याचे सांगितले जात आहे. यातून भाजपची छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची आस्था जनतेला दिसून आली आहे, असे अंधारे म्हणाल्या.

हेही वाचा >>> नागपूर: आता श्रीमंत मुधोजी राजे भोसलेही मैदानात, लोढा यांच्या राजीनाम्याची मागणी

सीमा भागातील वेगवेगळी गावे दुसऱ्या राज्यात जाण्याची भाषा करीत आहे. हा सुद्धा भाजपने ठरवून केलेला आणखी एक कट आहे. गुजरात निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेले, पुढच्या काळात कर्नाटकमध्ये निवडणुका असल्याने या राज्याला अनेक गावे देण्याचा भाजपचा कट आहे. मात्र भाजपचा हा कट शिवसेना हाणून पाडेल, असा इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा >>> ‘हॅलो… मी नितीन गडकरी बोलतोय!’

उत्तर प्रदेशात एक महिला पाच वेळा मुख्यमंत्री झाली असेल, तर महाराष्ट्रातही महिलांना संधी मिळायला हरकत नाही. मात्र ही संधी कोणाला द्यायची हा प्रश्न आहे. मी त्यात शेंडेफळ आहे. मला संघटनात्मक पातळीवर काम करायचे आहे. मी जिथे आहे तिथे मला सुखाने जगू द्या. महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री होऊ शकतील अशी अनेक नावे आहेत. त्यामध्ये सुप्रिया सुळे, पंकजा मुंडेंचा समावेश आहे. शिवसेनेमध्येही अशा अनेक महिला नेत्या आहेत, ज्यांच्यामध्ये क्षमता आहे, असे अंधारे म्हणाल्या.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 16:41 IST
Next Story
नागपूर: आता श्रीमंत मुधोजी राजे भोसलेही मैदानात, लोढा यांच्या राजीनाम्याची मागणी